|Thursday, February 27, 2020
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » देवगडात फळलागवडीसाठी कृषी विभागाच्या कामांना मंजुरी

देवगडात फळलागवडीसाठी कृषी विभागाच्या कामांना मंजुरी 

देवगड  : देवगड तालुक्यामध्ये महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून 327 हेक्टर क्षेत्रामध्ये फळबाग लागवडीसाठी 627 लाभार्थ्यांच्या प्रस्तावाला प्रशासकीय मान्यता प्राप्त झाली आहे. आंबा लागवडीप्रमाणे जास्तीत जास्त काजू लागवड होण्यासाठी 195.19 हेक्टर क्षेत्रातील 373 प्रस्ताव प्राप्त झाले आहेत. या योजनेंतर्गत 271 कामांना सुरुवात करण्यात आली असून 149.03 हेक्टर क्षेत्रावर प्रत्यक्षात फळबाग लागवडीची कामे सुरू झाली आहेत.

देवगड पंचायत समितीच्यावतीने महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेच्या कामात तालुक्याने अव्वल स्थान प्राप्त केले आहे. देवगड तालुका हा खडकाळ असा भाग असून याठिकाणी फळबाग लागवड करणे अवघड आहे. तरीही या भागातील लागवडीच्या क्षेत्राची निवड करून या योजनेतून फळलागवड करण्यासाठी लाभार्थी निवड करण्यात आली आहे. आतापर्यंत 627 लाभार्थी निवडून त्यांचे प्रस्ताव पाठविण्यात आले आहेत. सुमारे 327 हेक्टर क्षेत्रास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. 2017-18 मध्ये पंचायत समितीच्या कृषी विभागाच्यावतीने जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग, जि. प. मुख्यकार्यकारी अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली तर गटविकास अधिकारी विजय चव्हाण व सहाय्यक गटविकास अधिकारी भरत चौगुले यांच्या नेतृत्वाखाली फळबाग लागवडीची कामे हाती घेण्यात आली आहेत. मागील वर्षी 118.75 हेक्टर क्षेत्रावर फळबाग लागवडीची कामे हाती घेण्यात आली. सुमारे 291 लाभार्थ्यांनी फळबाग लागवड केली असून त्यामध्ये आंबा 41.39 हेक्टर, काजू 74.59  हेक्टर, नारळ 2.53 हेक्टर व साग 0.24 हेक्टर क्षेत्रावर लागवड करण्यात आली. बदलत्या हवामानामुळे आंबा पिकातल्या उत्पादनावरही बदल होत आहेत. मात्र पर्यायी फळ उत्पादनामध्ये काजू हा महत्वपूर्ण ठरणार असून काजू लागवडीकडे आता बागायतदारांचा कल वाढू लागला आहे.

देवगड पंचायत समितीच्या कृषी विभागाकडून प्राप्त 627 प्रस्तावांना प्रशासकीय मान्यता प्राप्त झाली आहे. त्यापैकी सुमारे 373 प्रस्तावामधील 195.19 हेक्टर क्षेत्र काजू लागवडीसाठी लाभार्थ्यांनी प्रस्ताव सादर केले. तर आंबा लागवडीसाठी 262 म्हणजेच 130.02 हेक्टर लागवडीसाठी प्रस्ताव, नारळ लागवडीसाठी सात प्रस्ताव (1.92 हेक्टर) या कामांना तांत्रिक व प्रशासकीय मान्यताही देण्यात आली आहे. सुमारे 149 हेक्टर क्षेत्रावर फळलागवडीची कामे सुरू झाली आहेत.

महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेंतर्गत गटविकास अधिकारी श्री. चव्हाण यांनी जिल्हय़ात उत्कृष्ट कामगिरी केली. यामध्ये देवगड तालुका हा सतत अव्वल स्थानावर राहिला आहे. अधिकारी व जनता यांच्याशी थेट संवाद साधण्याचे काम देवगड पंचायत समितीच्या माध्यमातून झाले आहे. स्थानिकांना रोजगाराची संधी प्राप्त व्हावी तसेच पर्यावरण संवर्धनासाठी फळलागवडीच्या क्षेत्रात वाढ होण्यासाठी प्रयत्न केले आहेत. या योजनेंतर्गत फळबाग लागवडीसाठी पिकनिहाय एकूण तीन वर्षात मिळणारे प्रतिहेक्टरी अनुदान शेतकरी लाभार्थ्यास मिळणार आहे. यामध्ये आंबा एक लाख 43 हजार 198 रुपये, काजू 99 हजार 629, नारळ एक लाख 15 हजार 105 रुपये, साग एक लाख तीन हजार 31 रुपये एवढे अनुदान शेतकरी लाभार्थ्यास दिले जाणार आहे. देवगड तालुक्यामध्ये फळलागवडीखाली क्षेत्रात वाढ होण्यासाठी पंचायत समितीच्या कृषी विभागाकडून प्रयत्न केले जात आहेत. यासाठी गावातील सरपंच व ग्रामसेवक या योजनेची जनजागृती करीत आहेत.

Related posts: