|Saturday, February 29, 2020
You are here: Home » आवृत्ती » गोवा » भरपावसातही पंचायत प्रचार शिगेला

भरपावसातही पंचायत प्रचार शिगेला 

प्रतिनिधी/ पणजी

येत्या रविवारी होणार असलेल्या 186 ग्राम पंचायतीच्या निवडणुकांचा प्रचार आता शिगेला पोहोचला आहे. जाहीर प्रचाराचे आता केवळ 2 दिवस शिल्लक असून शुक्रवारी सायं 5 वा. प्रचार संपुष्टात येईल. राज्यभरातील 1521 प्रभागांसाठी 1286 मतदान केंद्रे स्थापन करण्यात येणार आहेत.

या निवडणुकीत एकूण 5 हजार 288 उमेदवार रिंगणात उतरलेले आहेत. बार्देश आणि सालसेतमध्ये सर्वाधिक प्रत्येकी 33 ग्रामपंचायती आहेत. संपूर्ण गोव्यातील पंचायतींचा विचार करता या दोन तालुक्यांतील पंचायतींचे प्रमाण एक तृतियांश एवढे आहे.

प्रचार अंतिम टप्प्यात

राज्यातील ग्राम पंचायत निवडणुकीच्या प्रचाराचा अंतिम टप्पा सुरु झाला आहे. मंगळवारी सायंकाळी जोरदार पावसामुळे प्रचारात थोडा व्यत्यय आला. मात्र अनेकांमध्ये चुरस सुरु झाली आहे. एकूण 1521 प्रभागांसाठी निवडणुका होत आहेत. त्यासाठी 5,288 उमेदवार रिंगणात आहेत. राज्यभरातून 7,86,164 मतदार रविवारी मतदान करू शकतात. राज्यात 3 लाख 86 हजार 310 पुरुष तर 3 लाख 99 हजार 854 महिला मतदार आहेत. पुरुषांच्या तुलनेत 13 हजार महिला मतदार जास्त आहेत.

उत्तर गाव्यात 97 पंचायती

उत्तर गोव्यातील 5 तालुक्यांमध्ये मिळून 97 पंचायती आहेत. 785 प्रभाग आहेत. 1 लाख 87 हजार 770 पुरुष तर 1 लाख 94 हजार 011 महिला मतदार आहेत. एकूण 3 लाख 81 हजार 781 मतदार 785 प्रभागांच्या भवितव्याचा फैसला करणार आहेत. उत्तर गोव्यात राज्य निवडणूक आयोगाने 716 मतदान केंद्रे स्थापन केली आहेत.

दक्षिण गोव्यात 89 पंचायती

दक्षिण गोव्यात 7 तालुके आहेत. 89 ग्रामपंचायती आहेत. 1 लाख 98 हजार 540 पुरुष तर 2 लाख 5 हजार 843 महिला मतदार आहेत. दक्षिण गोव्यातील 4 लाख 4 हजार 383 मतदार 737 प्रभागांच्या भवितव्याचा फैसला करणार आहेत. दक्षिण गोव्यासाठी 570 मतदान केंद्रे स्थापन करण्यात आलेली आहेत.

मंत्री आमदारांची प्रतिष्ठा पणाला!

दरम्यान, भाजपच्या विधानसभेच्या अनेक पडेल उमेदवारांनी पंचायत निवडणुकीसाठी पाठ फिरविली आहे. जनतेच्या फैसल्याने ते नाराज झाले आहेत. त्यातच भाजपच्या स्थानिक नेत्यांचा ज्यांनी पाडाव केला त्याच नेत्यांना मंत्री करण्यात आले आहे. यामुळे नाराज बनलेल्यांनी सध्या पंचायत निवडणुकीत बाहेर पडायचे नाही असे ठरविले आहे. विद्यमान मंत्री आणि आमदारांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे. सध्या सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील आमदार देखील आपल्या समर्थक उमेदवारांच्या प्रचारार्थ आपापल्या मतदारसंघातील पंचायतींचा दौरा करीत आहेत. सत्ताधारी गटातील भाजप आणि गोवा फॉरवर्ड या दोन पक्षांनी जास्तीत जास्त पंचायती आपल्या ताब्यात याव्यात यासाठी सारी ताकद पणाला लावली आहे.

शुक्रवारी सायंकाळी 5 वा. निवडणुकीचा प्रचार संपुष्टात येईल. शुक्रवार ते रविवार असे तीन दिवस ‘कोरडे दिवस’ असतील. पालिकाक्षेत्र वगळता राज्यातील इतर सर्व भागात मद्यार्क विक्री व वितरण शुक्रवारी सायंकाळपासून बंद राहील. प्रचाराचे आता केवळ दोनच दिवस राहिलेत. शुक्रवारी सायंकाळपर्यंत प्रचार करता येईल.

Related posts: