|Sunday, September 22, 2019
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » टोचून बोलणे हा अधर्म

टोचून बोलणे हा अधर्म 

यज्ञ मंडपातून रागावून शिशुपाल बाहेर पडत आहे हे पाहताच युधि÷िर धावत धावतच शिशुपालाजवळ गेला. काही झालं तरी शिशुपाल त्याचा मावस भाऊ होता. त्याची समजूत घालण्याच्या हेतूने तो मृदु शब्दांनी त्याला म्हणाला-‘राजा शिशुपाला, तू आत्ताच जे कठोर शब्द उच्चारलेस ते योग्य नव्हते. राजा, दुसऱयाला विनाकारण कठोर शब्दांनी टोचून बोलणे हा फार मोठा अधर्म आहे. श्रे÷ धर्म कोणता हे शान्तनुपुत्र राजा भीष्माला माहीत नाही असे शक्मय आहे का? म्हणून काहीही कारण नसताना तू भीष्मांची अवहेलना करू नकोस. आपल्या भोवताली जरा नजर टाक. तुझ्यापेक्षा वयाने ज्ये÷ असलेले किती तरी राजे मी केलेली कृष्णाची पूजा प्रसन्न मनाने पाहत आहेत. त्यांची या पूजेला अनुमति आहे, हे उघड आहे. अशीच अनुमति तू सुद्धा द्यावीस हेच उचित ठरेल. चेदिराजा शिशुपाला, कृष्ण खरोखर कसा आहे हे भीष्मांना यथातथ्य माहीत आहे. भीष्मांना कृष्णाचे वास्तव स्वरूप जसे समजले आहे तसे तुला समजलेले नाही.’

त्यावेळी भीष्म म्हणाले ‘युधि÷िरा, त्रिभुवनामध्ये श्रे÷ असलेल्या कृष्णाची अग्रपूजा या शिशुपालाला बघवली नाही. त्याअर्थी याची मुळीच मनधरणी करू नकोस. याची समजूत घालावी अशी याची लायकीच नाही. समरांगणात पराक्रम गाजवणाऱया वीरांचा अग्रणी असलेला जो क्षत्रिय दुसऱया क्षत्रियाला पराभूत करतो तो त्या पराभूत झालेल्या क्षत्रियाचा अधीश्वर होतो. कृष्णाच्या सामर्थ्याने जो पराभूत झालेला नाही असा एकही राजा या सभेत असलेल्या राजांच्या समाजात मला दिसत नाही. हा कृष्ण केवळ आमच्याच दृष्टीने सर्वांत अधिक पूजनीय आहे असे नसून तो अखिल त्रैलोक्मयालाही पूजनीय आहे. कृष्णाने युद्धामध्ये अनेक श्रे÷ क्षत्रियवीरांचा पराभव केलेला आहे. किंबहुना हे सारे जग कृष्णामध्येच संपूर्णपणें सामावलेले आहे. म्हणून या सभेमध्ये अनेक वृद्ध असून सुद्धा आम्ही कृष्णाचीच पूजा करीत आहोत, इतरांची नाही!

शिशुपाला, तू जे बोललास ते बोलणे तुला शोभत नाही. तुझी बुद्धी इतकी विपरीत होणे बरे नाही. राजा, अनेक ज्ञानवृद्ध, प्रति÷ित पुरुषांचा सहवास मला लाभलेला आहे. ते एकत्र जमलेले असताना सज्जनांना आदरणीय वाटणारे जे अनेक स्पृहणीय गुण त्यांना गुणवंत कृष्णाच्या ठायी आढळले त्या गुणांची त्यांनी केलेली प्रशंसा मी ऐकली आहे. तसेच या बुद्धिमान कृष्णाने जन्मल्यापासून जी अघटित कृत्ये केलीं त्यांचे लोकांनी पुनः पुन्हा केलेले रसभरित वर्णनही मी अनेक वेळा ऐकले आहे.

चेदिराज शिशुपाला, अखिल विश्वाच्या कल्याणाला कारण होणाऱया आणि प्रति÷ित सज्जनांकडून पूजिल्या जाणाऱया कृष्णाची आम्ही जी पूजा केली ती याच्यापासून आमचा काही लाभ व्हावा म्हणून नव्हे, याचा व आमचा आप्तसंबंध आहे म्हणून नव्हे, अथवा याने आमच्यावर एखादा उपकार केलेला आहे म्हणूनही नव्हे! तर आम्ही याची पूजा का करत आहोत हे ऐक..’