|Monday, September 23, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » पत्रकारांनी समाज सुधारणेचे काम करावे

पत्रकारांनी समाज सुधारणेचे काम करावे 

प्रतिनिधी/ चिकोडी

पुरातन काळापासूनच पत्रकारितेला अनन्यसाधारण महत्त्व असून विश्वातच पहिले पत्रकार म्हणून नारदमुनींना ओळखले जाते. देव, दानव व मानव या तिन्ही लोकात राहून वृत्त प्रसारित करण्याचे कार्य नारदमुनी करत होते. आजच्या पत्रकारांनी लेखणीद्वारे समाजसुधारण्याचे काम करणे आवश्यक आहे, असे मत प्रज्ञाप्रवाहक क्षेत्रिय संचालक रघुनंदनजी यांनी व्यक्त केले.

चिकोडी येथील केशव प्रतिष्ठानमध्ये केशव कलाप्रतिष्ठानच्यावतीने आयोजित नारद जयंती कार्यक्रमात ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. यावेळी व्यासपीठावर चिकोडी आरएसएसचे कार्यवाह संजय अडके व पत्रकार संघटनेचे तालुकाध्यक्ष उपस्थित होते.

रघुनंदनजी पुढे म्हणाले, समाजात पत्रकारितेला फार महत्त्व असून देशाच्या स्वातंत्र्यलढय़ात लोकमान्य टिळकांसह अनेकांनी पत्रकारितेच्या माध्यमातून मोठे योगदान दिले आहे. आज समाजातील चांगल्या व वाईट गोष्टीसाठी अर्थशक्तीशी सामना करत सतत परिश्रम घेण्याचे काम केवळ पत्रकारच करत असतो. सदर सेवा बजावताना कोणत्याही आमिषाला व अतिरेकाला पत्रकारांनी बळी न पडता पत्रकारितेचा मूळ उद्देश पार पाडावा, असेही सांगितले.

संजय आडके म्हणाले, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक डॉ. केशव हेगडेवारजी यांचे आगमन झालेले कर्नाटक राज्यातील एकमेव ठिकाण म्हणजेच चिकोडी होय. त्यांची आठवण म्हणून 1980 साली केशवस्मृती प्रतिष्ठानची स्थापना करून 35 वर्षापासून चिकोडी परिसरात विविध सांस्कृतिक व सामाजिक उपक्रम राबविले जात आहेत, असे सांगितले. यावेळी राजू संकेश्वरी, दीपक शिंदे यांनी मनोगत व्यक्त केले.

अमृत कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन व स्वागत केले. कार्यक्रमास श्रीकांत कुलकर्णी, प्रसाद औंधकर, कैलास पाटील, महेश बाकळे, विक्रम बनगे, अरुण नेर्ली यांच्यासह सर्व पत्रकार उपस्थित होते