|Monday, August 26, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » मंदसौर जिल्हय़ात आणखी एका शेतकऱयाचा मृत्यू

मंदसौर जिल्हय़ात आणखी एका शेतकऱयाचा मृत्यू 

अजूनही निदर्शने सुरूच, परिस्थिती निवळल्याने संचारबंदी आठ तासांकरीता शिथील

वृत्तसंस्था/  मंदसौर

 मध्यप्रदेशातील हिंसाचारग्रस्त मंदसौर जिल्हय़ातील बदवान गावात घनश्याम गायकवाड या 26 वर्षीय शेतकरी युवकाचा शुक्रवारी मृत्यू झाला आहे.स्थानिक नागरिकांनी पोलिसांच्या बळप्रयोगामुळे युवकाचा मृत्यू झाल्याचा आरोप केला आहे.

 गुरुवारी रात्री इस्पितळात आणण्यापूर्वीच या युकाचा मृत्यू झाला होता. तसेच त्याच्या मृतदेहावर हल्ल्याचे व्रण होते अशी माहिती युवकाला उपचारासाठी दाखल करण्यात आलेल्या एम वाय रूग्णालयाच्या व्यवस्थापनाने दिली आहे. मात्र या युवकाच्या मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून चौकशी सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या मृत्यूमुळे मंदसौरमध्ये मृत्यूमुखी पडलेल्या शेतकऱयांची संख्या 6 वर पोहचली आहे. मंदसौर जिल्हय़ाच्या पेलिस उपाधिक्षकासह जिल्हाधिकाऱयांनी घटनास्थळी भेट दिली आहे.  तसेच घटनेमुळे संतप्त झालेल्या गावकऱयांना सखोल चौकशीचे आश्वासन दिले आहे.

घटनास्थळी दाखल झालेल्या काँगेसच्या माजी खासदार मीनाक्षी नटराजन यांनी मृत शेतकऱयाच्या कुटुंबियांना नुकसानभरपाई देण्याची मागणी केली आहे.

मंदसौरमधील संचारबंदी शिथील

हिंसाचारग्रस्त मंदसौर शहर आणि पींपलमांडीमधील तणाव निवळून परिस्थितीत सुधारणा झाल्याने संचारबंदी शुक्रवारी शिथील करण्यात आली आहे. परिस्थिती सुधारल्यामुळे जिल्हा प्रशासनाने सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत संचारबंदी उठवण्याचा निर्णय घेतल्याची माहिती जिल्हाचे पोलिस अधिक्षक मनोज कुमार सिन्हा यांनी दिली.

मात्र या कालावधीत कोणतेही निदर्शने, मोर्चे अथवा आंदोलन करण्यास प्रतिबंध कायम असणार आहे. आतापर्यंत कोणतेही हिंसक आणि अनुचीत प्रकार घडल्याचे वृत्त समोर आलेले नाही.