|Thursday, December 5, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » राष्ट्रवादीचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मूकमोर्चा

राष्ट्रवादीचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मूकमोर्चा 

बळीराजाची सनद निवासी उपजिल्हाधिकाऱयांना अर्पण, जिल्हाधिकारी कार्यालयाला पोलिसांचे कडे

सातारा

राष्ट्रवादीच्या बालेकिल्यात राष्ट्रवादीचे प्रभारी आमदार शशिकांत शिंदे यांनी शेतकरी संपात राष्ट्रवादी काँग्रेस उतरल्याचे जाहीर केले अन् आंदोलनात लगेच रस्त्यावर उतरण्याच्या कार्यकर्ते अन् पदाधिकाऱयांना तशा सूचना दिल्या. साहेबांचे आदेश मिळताच कार्यकर्ते आणि पदाधिकारी असतील तेथून राष्ट्रवादी भवनात हजर झाले.शनिवारी सकाळी तोंडावर पट्टय़ा बांधून मोर्चाला सुरुवात झाली. सरकारच्या निषेधार्थ घोषवाक्य केलेले बॅनर कार्यकर्त्यांनी धरले होते. मोर्चा पुढे शिवतीर्थावर पोहोचला. तेथून जिल्हाधिकारी कार्यालयावर, निवासी उपजिल्हाधिकारी भारत वाघमारे यांच्याकडे बळीराजांची सनद सादर केली.

दरम्यान, शेतकऱयांच्या प्रश्नावरील आंदोलन आणखी तीव्र करण्यात येणार असून सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याचे जाहीर केले.

आमदार शशिकांत शिंदे यांनी शेतकऱयांच्या प्रश्नावर राष्ट्रवादीचा मोर्चा काढण्याचे फर्मान सोडल्यानंतर लगेच राष्ट्रवादी भवनात सकाळीच आमदार दीपक चव्हाण, आमदार बाळासाहेब पाटील, माजी आमदार प्रभाकर घार्गे, जिल्हाध्यक्ष सुनील माने, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर, शिक्षण व अर्थ समितीचे सभापती राजेश पवार, महिला व बालकल्याण सभापती वनिता गोरे, समाजकल्याण सभापती शिवाजी सर्वगोड, माजी शिक्षण व अर्थ समितीचे सभापती सतीश चव्हाण, माजी कृषी सभापती किरण साबळे-पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस राजकुमार पाटील, राष्ट्रवादीच्या महिला जिल्हाध्यक्षा समिंद्रा जाधव, जयश्री पाटील, युवकचे बाळासाहेब महामूलकर, विद्यार्थीचे जिल्हाध्यक्ष अतुल शिंदे, खटाव पंचायत समितीचे सभापती संदीप मांडवे, प्रा. कविता म्हेत्रे यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले.

कार्यकर्त्यांच्या हातामध्ये शेतकऱयांना संपूर्णपणे कर्जमाफी देऊन शेतकऱयांचा सातबारा कोरा करणे, बी-बियाणे, शेतकऱयांच्या बांधावर पोहोच करणे, शेतीमालाला आधारभूत किमतीच्या दीडपट किमत देऊन त्यांचा शासनाने माल खरेदी करून वेळेवर किंमत द्यावी, आदी घोषणांचे फ्लेक्स हाती धरले होते. पुढे मोर्चा शिवतीर्थावर पोहोचला. शिवतीर्थावर छत्रपती शिवाजी महाराज, स्व. यशवंतराव चव्हाण, किसन वीर आबा यांच्या पुतळय़ांना अभिवादन करून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा धडकला. निवासी जिल्हाधिकारी भारत वाघमारे यांना बळीराजाची सनद देण्यात आली.

यावेळी बोलताना आमदार शशिकांत शिंदे म्हणाले, राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या सुचनेप्रमाणे शेतकऱयांच्या  राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने सरकारचा निषेध करताना मुकमोर्चा काढला. सनद दिली. शेतकऱयांना संपूर्णपणे कर्ज माफी द्यावी, स्वामीनाथन समितीच्या शिफारशी लागू कराव्यात, शेतकऱयांकरता वीज पुरवठा दिवसा करुन किफायतशीर सवलतीच्या दरात देण्यात यावा, हमी भाव द्यावा, सर्वसामान्य शेतकऱयांच्या न्यायहक्कासाठी वर्धापनदिन साजरा करतोय, सोमवारी धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

पोलिसांचा ताफा…

सातारा जिल्हा हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसने शेतकऱयांच्या आंदोलनात आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यामुळे सातारा पोलीस दलातर्फे मोठा बंदोबस्त जिल्हाधिकारी कार्यालयाला करण्यात आला होता. पंचायत समितीच्या प्रवेशद्वारातून प्रवेशाला मनाई करण्यात आली होती.

Related posts: