|Thursday, September 19, 2019
You are here: Home » मनोरंजन » नंदू माधव आणि देविका दफ्तरदार पहिल्यांदाच एकत्र

नंदू माधव आणि देविका दफ्तरदार पहिल्यांदाच एकत्र 

नेमक्याच तरीही प्रभावी भूमिका करण्याकडे ओढा असणाऱया कलाकारांमध्ये अभिनेता नंदू माधव, अभिनेत्री देविका दफ्तरदार ही नावे आवर्जून घेतली जातात. आतापर्यंत मोजक्या पण हटके चित्रपटांमध्ये दिसणारे हे दोन चतुरस्त्र कलाकार योगायतन फिल्मस् प्रस्तुत ‘परी हूँ मैं’ या आगामी मराठी चित्रपटातून पहिल्यांदाच जोडीच्या रूपाने प्रेक्षकांसमोर येत आहेत. या चित्रपटाचे निर्माते डॉ. राजेंद्र प्रताप सिंह असून दिग्दर्शक रोहित शिलवंत आहेत.

‘परी हूँ मैं’ या चित्रपटात एका मध्यमवर्गीय कुटुंबाचा ध्येयापर्यंतचा फॅशनेबल प्रवास मांडण्यात आला आहे. कौटुंबिक नाटय़ असणाऱया या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली आहे. नंदू माधव आपल्याला या सिनेमात कुटुंबवत्सल पती, प्रेमळ वडील अशा भूमिकेत दिसणार असून कुटुंबाच्या पाठीशी ठामपणे उभी राहणाऱया आईची व्यक्तिरेखा देविका दफ्तरदार साकारणार आहेत. मराठी चित्रपटसफष्टीत आता विविध प्रयोग होताना दिसत आहेत. मराठी सिनेमाच्या सशक्त आशयामुळे अमराठी निर्माते आणि प्रस्तुतकर्त्यांची रेलचेल मराठीत वाढताना दिसून येत आहे. निर्माते डॉ. राजेंद्र प्रताप सिंह यांच्या ‘परी हूँ मैं’ या चित्रपटातील आमची केमिस्ट्री प्रेक्षक नक्कीच एन्जॉय करतील असा विश्वास या दोघांनी व्यक्त केला.

 

नंदू माधव, देविका दफ्तरदार, श्रुती निगडे, फ्लोरा सैनी हे कलाकार या चित्रपटात आहेत. चित्रपटाची कथा इरावती कर्णिक यांची आहे. चित्रपटाचे छायांकन रोहन मडकईकर यांचे असून संकलन ऋतिकेश मामदापूर यांचे आहे. कलादिग्दर्शनाची जबाबदारी नरेंद्र भगत सांभाळत असून संगीत समीर साप्तीस्कर यांचे आहे. क्रिएटिव्ह प्रोडय़ुसर कुणाल मेहता तर सहनिर्माता संजय गुजर असून कार्यकारी निर्माते भाविक पटेल आहेत. प्रोजेक्ट हेड भूषण सावळे आहेत.