|Wednesday, November 20, 2019
You are here: Home » क्रिडा » घरच्या मैदानावर बोल्टचे जेतेपद

घरच्या मैदानावर बोल्टचे जेतेपद 

वृत्तसंस्था / किंग्जस्टन

जमैकाचा जगातील सर्वात वेगवान धावपटू युसेन बोल्टने आपल्या वैयक्तिक ऍथलेटिक कारकीर्दीतील घरच्या मैदानावर शनिवारी पुरूषांची 100 मी. धावण्यांची शर्यत जिंकली. सुमारे 30 हजार शौकिनांच्या साक्षीने ही शर्यत जिंकल्यानंतर त्याच्या चाहत्यानी स्टेडियममध्ये उभे राहून त्याला मानवंदना दिली. बोल्टने आपल्या ऍथलेटिक कारकीर्दीत घरच्या मैदानावरची शेवटची शर्यत जिंकली. त्याने 10.3 सेकंदाचा अवधी घेतला. येत्या ऑगस्टमध्ये होणाऱया विश्व ऍथलेटिक्स स्पर्धेनंतर बोल्ट ऍथलेटिक्स क्षेत्रातून निवृत्त होणार आहे.

जमैकाच्या नॅशनल स्टेडियमवर बोल्टची ही शेवटची शर्यत पाहण्यासाठी शौकिनांनी गर्दी केली होती. याच स्टेडियमवर बोल्टने 2002 साली विश्व कनिष्ठांच्या स्पर्धेत त्याने आपल्या आंतरराष्ट्रीय ऍथलेटिक्स क्षेत्राला प्रारंभ केला होता. शनिवारच्या शर्यतीत बोल्टला यापूर्वीच्या आपल्या विश्वविक्रमाच्या समीप जाता आले नाही. जागतिक ऍथलेटिक्स क्षेत्रामध्ये जमैकाच्या बोल्टने ऑलिंपिक स्पर्धेत तसेच विश्व ऍथलेटिक्स स्पर्धेत सलग अनेक विश्वविक्रम केले आहे. पुरूषांच्या विभागात बोल्टने आपल्या वर्चस्व बरीच वर्षे राखले होते. बोल्टने नऊवेळा ऑलिंपिक सुवर्णपदक मिळविले आहेत. 2017 च्या ऍथलेटिक हंगामातील बोल्टची ही पहिली शर्यत होती.

जमैकाचा जागतिक वेगवान धावपटू बोल्ट 2017 च्या ऍथलेटिक हंगामात आपल्या वैयक्तिक ऍथलेटिक कारकीर्दीला निरोप देणार आहे. 100 मी. धावण्यांच्या शर्यतीत बोल्टचा 9.58 सेकंदाचा तर 200 मी. धावण्यांच्या शर्यतीत त्याचा 19.19 सेकंदाचा विश्वविक्रम आहे. या शर्यती दरम्यान बोल्टचा जमैकन ऍथलेटिक्स संघटनेतर्फे गौरव करण्यात आला. मैदानावर बोल्टचा हा सत्कार समारंभ 20 मिनिटे चालला होता. या समारंभाला प्रशिक्षक ग्लेन मिल्स तसेच आंतरराष्ट्रीय ऍथलेटिक्स फेडरेशनचे अध्यक्ष सेबेस्टियन को उपस्थित होते. जमैकाच्या शौकिनांनी दिलेल्या प्रोत्साहनामुळे आपल्याला ऍथलेटिक्स कारकीर्दीत हे यश मिळू शकले त्याबद्दल बोल्टने त्यांचे आभार मानले. ऑगस्टमध्ये होणाऱया लंडन विश्व ऍथलेटिक्स स्पर्धेत 100 मी. धावण्याच्या शर्यती जेतेपद मिळविणे हे माझे ध्येय असेल, असेही बोल्ट म्हणाला.

जमैकात झालेल्या या स्पर्धेमध्ये दक्षिण आफ्रिकेच्या वेडी व्हॅन निकर्कने पुरूषांच्या 200 मी. धावण्यांच्या शर्यतीत 19.94 सेकंदाचा अवधी घेत प्रथम स्थान मिळविले. महिलांची 400 मी. धावण्यांची शर्यत अमेरिकेच्या ऑलिंपिक सुवर्णपदक विजेत्या ऍलीसन फेलिक्सने जिंकताना 50.52 सेकंदाचा अवधी घेतला. ब्रिटनच्या मो फर्राने 3000 मी. धावण्यांची शर्यत जिंकताना 7 मिनिटे 41.20 सेकंदाचा अवधी घेतला. पुरूषांच्या 800 मी. धावण्यांच्या शर्यतीत केनियाच्या डेव्हिड रूदिशाने प्रथम स्थान मिळविताना 1 मिनिट, 44.85 सेकंदाचा अवधी घेतला.

Related posts: