|Monday, September 16, 2019
You are here: Home » क्रिडा » यू-20 विश्वचषक स्पर्धेत इंग्लंड विजेते

यू-20 विश्वचषक स्पर्धेत इंग्लंड विजेते 

51 वर्षांनंतर मिळविले पहिले यश, व्हेनेझुएलास उपजेतेपद

वृत्तसंस्था/ सुवॉन, द.कोरिया

पूर्वार्धात डॉमिनिक काल्व्हर्ट लेविनने नोंदवलेल्या एकमेव गोलाच्या बळावर इंग्लंडने व्हेनुझुएलाचा 1-0 असा पराभव करून 20 वर्षाखालील वयोगटाच्या विश्वचषक स्पर्धेचे जेतेपद पटकावले. 1966 नंतर त्यांनी मिळविलेले हे पहिलेच विश्वचषक जेतेपद आहे.

एव्हर्टन क्लबकडून खेळणाऱया काल्व्हर्ट लेविनचा गोल निर्णायक ठरला असला तरी गोलरक्षक फ्रेडी वुडमननही उत्तरार्धात ऍडलबर्टो पेनारँडाचा पेनल्टी फटका अचूक थोपवून इंग्लंडच्या विजयात मोलाची भूमिका बजावली. अतिशय चुरशीने लढल्या गेलेल्या या सामन्यात दोन्ही संघांनी एकमेकांवर अनेकदा चढाया केल्या होत्या. पूर्वार्धात इंग्लंडने खूप धावाधाव केली तर व्हेनेझुएला आक्रमणात धोकादायक वाटत होते.

इंग्लंडच्या डॉमिनिक सोलंकीला गोल करण्याची पहिली संधी मिळाली होती. त्याने बचावातील त्रुटीचा लाभ घेत पेनल्टी क्षेत्रात प्रवेश केला. त्याला फक्त गोलरक्षकाला हुलकावणी देण्याची गरज होती. पण त्याचा फटका अचूक बसला नाही आणि चेंडू विल्कर फॅरिनेझच्या पायाला लागल्याने ही संधी वाया गेली. दहा मिनिटांनंतर ऍडेमोला लुकमनने फॅरिनेझचा जोरदार ड्राईव्ह अचूक अडविला. काही क्षणानंतर व्हेनेझुएला गोल नोंदवण्याच्या अगदी समीप आले होते. रोनाल्डो लुसीनाची 30 मीटर्सवरून मारलेल्या भिरभिरत्या फ्री किकने वुडमनलाही चकित केले. पण गोलपोस्टच्या बारला लागून तो बाहेर गेला. मध्यंतराच्या दहा मिनिटे आधी काल्व्हर्ट लेविनने गोलकोंडी फोडण्यात यश मिळविले. लेविक कुकच्या फ्रीकिकवर ताबा मिळवित त्याने एका बचावपटूला चकवित जोरदार फटका मारला. पण फॅरिनेझने तो अडविला आणि रिबाऊंड झालेल्या चेंडूवर ताबा घेत लेविनने अगदी जवळून चेंडू जाळय़ात धाडला. हाच गोल शेवटी निर्णायक ठरला.

1997 नंतर इंग्लंडला या स्पर्धेत एकही विजय मिळविता आलेला नव्हता. पूर्वार्धात बॉल पझेशनमध्ये ते आघाडीवर होते. पण उत्तरार्धात त्यांनी प्रतिस्पर्ध्याला ही संधी दिली. सामना संपण्यास 17 मिनिटे असताना व्हेनेझुएलाला बरोबरी साधण्याची सुवर्णसंधी मिळाली होती. इंग्लंडच्या जेक क्लार्क सॉल्टरने पेनल्टी क्षेत्रात पेनारँडाला पाडविल्याने पंचांनी पेनल्टीचा इशारा केला. त्यावर इंग्लंडने निषेधही केला. पण पंचांनी त्याकडे दुर्लक्ष केले. पण गोलरक्षक वुडमनने चुकीच्या दिशेने डाईव्ह केले असले तरी हाताच्या तळव्याने चेंडूला स्पर्श करीत चेंडू बाहेर घालवित अप्रतिम बचाव केला. व्हेनेझुएलाने उपांत्य फेरीत शेवटच्या क्षणाला बरोबरी साधून नंतर विजय मिळविला होता. पण त्याची पुनरावृत्ती या सामन्यात त्यांना करता आली नाही. दीर्घ काळानंतर मिळालेल्या या यशाने इंग्लंडचे खेळाडू, समर्थक यांनी प्रचंड जल्लोष करून आनंद साजरा केला.