|Saturday, January 25, 2020
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » प्रा. गोपाळ दुखंडे यांचे निधन

प्रा. गोपाळ दुखंडे यांचे निधन 

सावंतवाडी : ज्येष्ठ समाजवादी नेते प्रा. गोपाळ दत्ताराम दुखंडे (74) यांचे येथील सर्वोदयनगरमधील पार्वती निवासस्थानी मंगळवारी सकाळी 8.30 वाजता हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. त्यांचे मूळ गाव मालवण तालुक्यातील त्रिंबक आहे. आयुष्याच्या अखेरपर्यंत त्यांनी प्रस्थापित व्यवस्थेविरुद्ध संघर्षाची भूमिका घेतली होती. दलित, शोषित, कष्टकरी, विद्यार्थी, महिला, अन्यायग्रस्त वर्गाला हक्क आणि न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी आपले जीवन समर्पित केले होते. लढवय्या समाजवादी म्हणून त्यांची ओळख होती. प्रा. दुखंडे यांची देहदान करण्याची इच्छा होती. मात्र सावंतवाडीत सुविधा उपलब्ध नसल्यामुळे त्यांची इच्छा अपूर्ण राहिली. त्यामुळे त्यांचे पार्थीव मुंबईत गोरेगाव येथे त्यांच्या निवासस्थानी नेण्यात आले. उद्या, बुधवारी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

रत्नागिरीतील जैतापूर अणुऊर्जा आणि मायनिंग प्रकल्पाच्या विरोधातील संघर्षात त्यांची महत्त्वाची भूमिका होती. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच जिल्हय़ातील सर्व राजकीय पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, सामाजिक तसेच परिवर्तन चळवळीतील कार्यकर्त्यांनी प्रा. दुखंडे यांचे अंत्यदर्शन घेतले. प्रा. दुखंडे यांच्या पश्चात पत्नी उर्मिला, मुलगे संतोष, संदीप, मुलगी सोनाली, नातवंडे असा परिवार आहे.

प्रा. गोपाळ दुखंडे यांचे प्राथमिक शिक्षण त्रिंबक येथे झाले. त्यांचे वडील दत्ताराम हे मुंबईत मोरारजी गोकुळदास या गिरणीत कामगार होते. त्यामुळे माध्यमिक शिक्षण शिव येथील धर्मप्रकाश श्रीनिवासच्या हायस्कूलमध्ये झाले. रुईया आणि एस. आय. इ. एस महाविद्यालयातून राज्यशास्त्र विषयात त्यांनी पदवी प्राप्त केली. शिक्षक म्हणून काम करीत असतानाच पदव्युत्तर स्तराचा राज्यशास्त्र विषय घेऊन ते एम. ए. झाले. त्यानंतर 1972 मध्ये ठाणे जिल्हय़ातील भिवंडी येथील बी. एन. एन. कॉलेजमध्ये राज्यशास्त्राचे प्राध्यापक म्हणून ते रुजू झाले. याच कॉलेजमध्ये त्यांनी स्वेच्छानिवृत्ती स्वीकारली.

प्रा. दुखंडे हे नववीत असताना ज्येष्ठ समाजवादी नेते डॉ. राममनोहर लोहिया यांच्या विचाराने प्रेरित होऊन ते समाजवादी चळवळीकडे ओढले गेले. त्यांनी अखेरपर्यंत समाजवादी विचारांची कास सोडली नाही. प्रा. मधु दंडवते, श्रीमती मृणाल गोरे, एस. एम. जोशी, ना. ग. गोरे, ग. प्र. प्रधान, निहाल अहमद यांच्याबरोबर त्यांनी काम केले. महाराष्ट्र प्रदेश जनता दलाचे प्रवक्ते, पक्ष निरीक्षक, प्रचारप्रमुख म्हणून त्यांनी काम केले. मुंबई विद्यापीठाचे 1987 ते 90 पर्यंत ते सिनेट सदस्य होते. 1988 मध्ये कोकण पदवीधर मतदारसंघातून, 1991 मध्ये दादर मतदारसंघातून लोकसभेची व 1995 ला मालवण विधानसभेची निवडणूक त्यांनी जनता दलातर्फे लढविली. मात्र त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले.

प्रा. दुखंडे यांचे जीवन लढण्यातच गेले. अन्याय-अत्याचाराविरुद्ध आणि कष्टकरी, विद्यार्थी, शिक्षक, दलित, वंचित, शोषिक यांना न्याय हक्क मिळवून देण्यासाठी त्यांनी नेहमीच संघर्ष केला. 1970 च्या दशकात अनेक महाविद्यालयीन प्राध्यापकांना वेतनश्रेणीनुसार पगार मिळत नव्हता. त्यामुळे प्राध्यापकांच्या संघटना झाल्या. मुंबई विद्यापीठ आणि कॉलेज प्राध्यापक संघटनेचे (बुक्टू) ते उपाध्यक्ष झाले. या माध्यमातून त्यांनी प्राध्यापकांना न्याय मिळवून दिला. महाराष्ट्रातील अनेक विना अनुदानीत संस्थांवरील शिक्षक-प्राध्यापकांना वेतन मिळत नव्हते. त्यावेळी छात्रभारती संघटनेच्या सहकार्याने त्यांनी आंदोलने उभारली. त्यामुळे शासनाला अनुदान द्यावे लागले. रात्रशाळांच्या विद्यार्थ्यांना संघटित करून त्यांनी त्यांना न्याय मिळवून दिला.

सिनेट सदस्य असताना रत्नागिरी येथे मुंबई विद्यापीठाचे उपकेंद्र स्थापन करण्यात त्यांची महत्वाची भूमिका होती. कोकणातील शैक्षणिक प्रश्न सिनेट सदस्य म्हणून त्यांनी मांडले. मुंबई विद्यापीठाचा कारभार मराठीतून व्हावा, यासाठी त्यांनी पाठपुरावा केला होता. त्यामुळे विद्यापीठाचा कारभार मराठीतून सुरू झाला. दुखंडे यांनी समाजवादी पक्षाने 1970 मध्ये सुरू केलेल्या जमीनमुक्त आंदोलनात भाग घेतला होता. त्यासाठी त्यांना कारावास झाला होता. भिवंडीत तसेच मुंबईत झालेल्या दंगडीच्यावेळी शांतता प्रस्तापित करण्यासाठी तसेच दंगलग्रस्तांचे पुनर्वसन करण्यासाठी ते तळमळीने झटले. आणीबाणीच्या काळात त्यांनी स्थानबद्धांना मदत करण्याचे काम केले. प्रा. दुखंडे उत्तम वक्ते होते. तसेच विविध सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक प्रश्नावरही त्यांनी लेखन केले. 1973 मध्ये पडलेल्या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी अहवाल तयार केला होता. मराठवाडा विद्यापीठाच्या नामातंराच्या बाजूने झालेल्या आंदोलनातही त्यांनी सक्रीय सहभाग घेतला होता. युवक क्रांती दलातही त्यांनी काम केले होते. प्रा. दुखंडे राष्ट्रसेवादल, समाजवादी युवजन सभा, युक्रांद, समाजवादी पक्षात सक्रीय कार्यकर्ते होते. विद्यार्थी व शिक्षकांच्या हक्कासाठी त्यांनी संघर्ष केला. प्रा. दुखंडे यांनी अनेक विषयांवर व्याख्याने दिली.

कोकणातील आंदोलनात सहभाग

जैतापूर अणूऊर्जा प्रकल्प, सिंधुदुर्गातील मायनिंग प्रकल्प यांच्या विरोधात जो संघर्ष उभा झाला, या संघर्षात प्रा. दुखंडे यांनी सक्रीय सहभाग घेतला होता. कोकणात हे प्रकल्प झाल्यास येथील पर्यावरणाचा ऱहास होण्याबरोबरच येथील जनतेला हे प्रकल्प विस्थापित करून टाकतील, अशी त्यांची भूमिका होती. त्यासाठी त्यांनी या प्रकल्पांना विरोध केला. पर्यावरण वाचावे, यासाठी केंद्राने नेमलेल्या माधव गाडगीळ यांच्या अध्यक्षतेखालील पश्चिम घाट समितीला त्यांनी आवश्यक सूचना केल्या होत्या. सिंधुदुर्गातील शासकीय वसतिगृहांचे प्रश्न, आरोग्याचे प्रश्न सोडविण्यासाठी त्यांनी नेहमीच प्रयत्न केले.

पुष्पसेन सावंत

माजी आमदार पुष्पसेन सावंत म्हणाले, समाजवादी नेते गोपाळ दुखंडे हे आपल्याला गुरुतुल्य होते. गुरुशिष्याचे नाते निर्माण झाले होते. स्पष्ट वक्ता, संघर्षाविरुद्ध लढणारा असा त्यांचा स्वभाव होता. चार दिवसांपूर्वीच त्यांनी आपल्याशी शेतकऱयांच्या आंदोलनाविषयी चर्चा केली होती. तू नेतृत्व कर, रस्त्यावर उतर, असे त्यांनी सांगितले होते. मी तुम्हाला भेटतो, असे आपण त्यांना म्हटले होते. मात्र दुर्दैवाने तसे झाले नाही. त्यांच्या विचारांची नाळ माझ्यात जोडली गेली. एक दुवा निखळला आहे, अशा शब्दात त्यांनी श्रद्धांजली वाहिली.

डॉ. रुपेश पाटकर म्हणाले, प्रा. दुखंडे यांनी अन्यायाविरुद्ध संघर्ष केला. त्यांच्या निधनाने मार्गदर्शक नेत्याला आपण मुकलो आहोत. डॉ. जयेंद्र परुळेकर, नगराध्यक्ष बबन साळगावकर तसेच नकुल पार्सेकर म्हणाले, मायनिंगविरोधी लढय़ात दुखंडे यांचा सक्रीय सहभाग होता. त्यांच्या निधनाने पर्यावरण चळवळीची हानी झाली आहे.

नगराध्यक्ष बबन साळगावकर, डॉ. जयेंद्र परुळेकर, नकुल पार्सेकर, बाळासाहेब बोर्डे, उपनगराध्यक्ष अन्नपूर्णा कोरगावकर, साहित्यिक प्रा. प्रवीण बांदेकर, साहित्यिक व कवी अजय कांडर, ऍड. संदीप निंबाळकर, हरिहर वाटवे, शांताराम गावडे, सुनील राऊळ, जनता दलाचे जिल्हाध्यक्ष महेश परुळेकर, शशी नेवगी, रमेश बोंद्रे, भारती मोरे, सचिन तावडे, अशोक देसाई, ऋचा पाटणकर, डॉ. विजया चिंडक, प्रा. विजय फातर्पेकर, मधुकर मातोंडकर, अंकुश कदम, राजेश कदम, सिद्धार्थ तांबे, जितेंद्र पेडणेकर, महेश पेडणेकर, राजेंद्र कांबळी, ऍड. स्वाती तेली आदी यावेळी उपस्थित होते.

Related posts: