|Thursday, September 19, 2019
You are here: Home » उद्योग » कार निर्यातीत फोर्ड अव्वल

कार निर्यातीत फोर्ड अव्वल 

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

2017-18 या आर्थिक वर्षाची सुरुवात फोर्ड इंडियासाठी चांगली झाली आहे. या वर्षात कंपनी देशातील सर्वात मोठी कार निर्यातदार बनली आहे. गेल्या सलग चार महिन्यात फोर्ड इंडियाने निर्यातीमध्ये हय़ुंदाईला मागे टाकले आहे. सियाम या संघटनेच्या आकडेवारीनुसार, फोर्ड इंडियाने मे 2017 मध्ये 16,761 युनिट्सची निर्यात केली. महिन्याच्या आधारे कंपनीच्या निर्यातीत घसरण झाली आहे, मात्र यानंतरही कंपनी हय़ुंदाईच्या पुढे आहे.

देशातील वाहन क्षेत्रापेक्षा फोर्ड इंडियाची वाढ वेगाने होत आहे. कंपनीचे लक्ष्य भारतीय बाजारपेठेबरोबरच निर्यातीवरही आहे. मजबूत ब्रॅन्ड, योग्य उत्पादन, स्पर्धात्मक किंमत आणि योग्य दर्जा यामुळे भारतात स्थिर आणि नफा कमविणारा व्यवसाय बनण्यासाठी आम्ही प्रतिबद्ध आहोत. भारतात फोर्ड इकोस्पोर्ट, फिगो आणि अस्पायर या कारना चांगली मागणी असल्याचे फोर्ड इंडियाचे अनुराग मल्होत्रा यांनी म्हटले.

फोर्ड इंडियाने गेल्या वर्षात 1.37 लाख युनिट्सची निर्यात केली होती. कंपनीच्या निर्यातीत 39.2 टक्क्यांनी वाढ झाली. 

निर्यातीत घसरण…

मारुती सुझुकीने मे महिन्यात 6,175 युनिट्सची निर्यात केली असून गेल्या महिन्याच्या तुलनेत 37.17 टक्क्यांनी घट झाली. निसान मोटर्स इंडियाच्या निर्यातीत 36.88 टक्क्यांनी घसरण होत 4,311 युनिट्सवर पोहोचली आहे.