|Wednesday, November 13, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » स्वच्छ भारत योजनेसाठी राखीव निधी वळविला

स्वच्छ भारत योजनेसाठी राखीव निधी वळविला 

प्रतिनिधी/ बेळगाव

महापालिकेच्या राखीव निधीमधून मागासवर्गियांसाठी विविध योजना राबविण्यात येतात. सामान्य वर्गातील आर्थिक मागासवर्गियांसाठी 7.25 टक्के अनुदान राखीव ठेवण्यात येते. मात्र यंदा योजनेंतर्गत नागरिकांना विविध सुविधा उपलब्ध करून देण्याऐवजी हा राखीव निधी स्वच्छ भारत योजनेंतर्गत शौचालये बांधण्यासाठी वळविण्यात आला आहे. यामुळे यंदा नागरिकांना अन्य सुविधांचा लाभ मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

शहरात विविध विकासकामे राबविण्यासाठी शासनाकडून निधी दिला जातो. यापैकी 24.10 टक्के मागासवर्गियांसाठी, सामान्य वर्गातील आर्थिक मागासवर्गियांसाठी 7.25 टक्के आणि अपंगांसाठी 3 टक्के अनुदान राखीव ठेवले जाते. या अंतर्गत अनिल गॅस संपर्क योजना, डेनेज जोडणी, नळ जोडणी, शैक्षणिक शिष्यवृत्ती आणि घर बांधण्यासाठी आणि घराच्या दुरुस्तीसाठी, विद्यार्थ्यांना लॅपटॉप आदींसह विविध योजनांकरिता प्रोत्साहन धन दिले जाते. सामान्य वर्गातील आर्थिक मागासांकरिता राबविण्यात येणाऱया 7.25 टक्के अनुदानामधून योजना राबविण्यासाठी 43 लाखाचा निधी राखीव ठेवण्यात आला होता. मात्र, हा निधी स्वच्छ भारत मिशनकरिता वळविण्यात आला आहे. सदर निधीमधून नागरिकांना नागरी सुविधा उपलब्ध करून देण्याऐवजी यामधून वैयक्तिक शौचालय बांधण्यासाठी वापरण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे.

स्वच्छ भारत मिशनअंतर्गत राबविण्यात आलेल्या स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेमध्ये बेळगावचा 248 वा क्रमांक लागला आहे. यामुळे स्वच्छतेबाबत शहर मागे पडल्याचे निदर्शनास आले असल्याने स्वच्छ भारत मिशन योजनेंतर्गत रखडलेली कामे मार्गी लावण्यासाठी राखीव निधीचा विनियोग करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महापालिका व्याप्तीमध्ये स्वच्छ भारत मिशन उपक्रमांतर्गत घरोघरी शौचालय बांधून देण्याची योजना राबविण्यात येत आहे. शौचालय बांधण्यासाठी लाभार्थींना प्रत्येकी पंधरा हजार रुपये देण्यात येत आहेत. याकरिता केंद्र शासनाकडून चार हजार रुपयांचे साहाय्यधन देण्यात येत आहे. मात्र, या निधीमधून शौचालय बांधणे अशक्मय आहे. यामुळे महापालिकेच्या निधीमधून 11 हजार रुपयांचे साहाय्यधन देण्यात येत आहे. योजनेंतर्गत शहर आणि उपनगरांतील 1855 लाभार्थींची निवड करण्यात आली होती.

शौचालय बांधण्यास प्रारंभ करण्यासाठी सर्व लाभार्थींना 2666 रुपये पहिला हप्ता, 2666 रुपयांचे अनुदान वितरित करण्यात येत आहे. लाभार्थींनी शौचालयाचे बांधकाम पूर्ण केल्यानंतर तिसऱया हप्त्याचे 9668 रुपये अनुदान देण्यात येत आहे. यामुळे शौचालय बांधण्याचे काम तातडीने पूर्ण करण्यासाठी निधी अपुरा पडत आहे. यामुळे राखीव निधीचा विनियोग करून वैयक्तिक शौचालय बांधण्याचे उद्दिष्ट पूर्ण करण्याचा प्रस्ताव आहे. पण निधी वळविण्यात आल्याने विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती आणि गरजू नागरिकांना आवश्यक योजनेचा लाभ मिळणार नसल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.

Related posts: