|Tuesday, January 28, 2020
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » बस सेवेअभावी हुकला शाळेचा पहिला दिवस!

बस सेवेअभावी हुकला शाळेचा पहिला दिवस! 

संगमेश्वर येडगेवाडीतील 16 विद्यार्थ्यांना फटका

गैरसोयीच्या वेळांमुळे विद्यार्थ्यांचे हाल

एस. टी. प्रशासनाच्या दुर्लक्षाबद्दल संताप

वार्ताहर /संगमेश्वर

संपूर्ण महाराष्ट्रात आज शाळेचा पहिला दिवस विद्यार्थी आनंदाने साजरा करत असतानाच संगमेश्वर तालुक्यात मात्र एसटी बससेवेच्या बोजवाऱयामुळे अनेक विद्यार्थ्यांचा शाळेचा पहिला दिवस हुकला. 19 किमी अंतरावर असलेल्या हायस्कूलमध्ये जाण्यासाठी बस सेवाच उपलब्ध नसल्याने येडगेवाडीतील 16 विद्यार्थ्यांना घरातच बसण्याची वेळ आली आहे. बस फेऱया अचानक बंद करण्यात आल्याने किंवा त्याच्या वेळा सोयीस्कर नसल्याने अनेक विद्यार्थ्यांना प्रचंड हाल सहन करावे लागत आहेत.

गुरूवारी शाळेचा पहिला दिवस सर्वत्र उत्साहात साजरा होत असताना येडगेवाडीतील 16 विद्यार्थ्यांच्या नशीबी मात्र हा उत्साह नव्हता. या विद्यार्थ्यांना माध्यमिक शिक्षणासाठी कुंभारखाणी माध्यमिक विद्यामंदिर सर्वात जवळ आहे. मात्र हे हायस्कूल येडगेवाडीपासून 19 कि. मी. अंतरावर आहे. हायस्कूलला जाण्यासाठी एसटी बसची सुविधाच नसल्याने या विद्यार्थ्यांवर घरीच बसण्याची वेळ आली. एसटी प्रशासनाच्या दुर्लक्षामुळेच हा प्रकार घडल्याचा आरोप होत असून त्याबाबत सर्वत्र संताप व्यक्त होत आहे.

चिपळूण आगारातून सकाळी 7.45 वाजता सुटणारी चिपळूण-पाचांबे ही बस येडगेवाडीपर्यंत सोडण्यासाठी रत्नागिरी विभागीय नियंत्रकांकडे वारंवार मागणी करण्यात आली. मात्र ही बस सुरु करण्यासाठी विभागीय नियंत्रक कार्यालयाने जाचक अटी समोर ठेवल्या. तसेच ग्रामसभेचे ठराव मागितले. आज शाळेचा पहिला दिवस आहे व तो आनंदाने शाळेत साजरा व्हावा असे विद्यार्थ्यांना वाटत असले तरी एसटीच्या अनागोंदीमुळे हुकला. ही परिस्थिती अशीच राहिल्यास हे 16 विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहणार आहेत. तरी एसटीने याची दखल घेऊन सकाळची चिपळूण-पाचांबे ही बस येडगेवाडीपर्यंत सोडावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

ग्रामपंचायतीकडे मागितलेला ठराव गैर

कुचांबे कॉलनी ते येडगेवाडी हा रस्ता पाटबंधारे विभागाच्या मालकीचा आहे. या रस्त्यावर बस सुरु करण्यासाठी व बंद करण्यासाठी नाहरकत दाखला व तत्सम अधिकार हे पाटबंधारे विभागाचे आहेत. त्यामुळे एसटीने आमच्याकडून मागितलेला ग्रामपंचायत ठराव गैर आह. आमच्या ग्रामसभेत या विषयावर खुली चर्चा झाली असून अशा प्रकारचा गैर ठराव न देण्याचा निर्णय झाला आहे. येडगेवाडीत बस सुरु करण्याबाबत एसटीने आपल्या स्तरावर निर्णय घ्यावा, असे राजिवली ग्रुप ग्रामपंचायतीच्या सरपंच जयश्री कदम यांनी म्हटले आहे.

नियोजनाअभावी विद्यार्थ्यांचे हाल

संध्याकाळी 4.30 वा सुटणारी व नायरी खोऱयातील विद्यार्थ्यांना सोईस्कर असलेली गाडी सोडण्यात न आल्याने विद्यार्थ्यांचे प्रवासा दरम्याने हाल होत आहेत. संध्याकाळी उशिरापर्यंत विद्यार्थ्यांना ताटकळत संगमेश्वर स्टॅडमध्ये बसून राहावे लागत आहे. तर सकाळच्या दरम्याने 6.30वा सुटणारी रत्नागिरी चिपळून ही फेरी उशिरा केल्याने महाविद्यालयात येणाऱया विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे. रत्नागिरी ते चिपळूण ही बस पुन्हा 6.30वा दरम्याने सुरु करण्यात यावी अशी मागणी करण्यात येत आहे. तर संगमेश्वर नवनिर्माण महाविद्यालयासाठी बस थांबा मंजूर होवूनही बस थांबत नसल्याने विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत. त्यामुळे या ठिकाणी सर्व थांबवाव्यात अशी मागणी होत आहे.

Related posts: