|Thursday, September 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » आणखी पावणेपाच कोटीचे केटामाईन चिपळुणात जप्त

आणखी पावणेपाच कोटीचे केटामाईन चिपळुणात जप्त 

एकूण 9 कोटीचे केटामाईन ताब्यात

‘सुप्रिया लाईफ’ मधून पावडर चोरल्याची

मंगेशची कबुली

कंपनी व्यवस्थापनाची होणार चौकशी

प्रकरणाची व्याप्ती वाढण्याची शक्यता

प्रतिनिधी /चिपळूण, रत्नागिरी

केटामाईन या अंमली पदार्थाच्या विक्री प्रकरणी अटकेत असलेल्या तिघांच्या चौकशी दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार आणखी 5 किलो 880 ग्रॅम वजनाच्या 4 कोटी 78 लाख 20 हजार 220 रूपये किंमतीचे केटामाईन जप्त करण्यात आले आहे. अटकेत असलेल्या मंगेश कदम याने लोटे येथील सुप्रिया लाईफ सायन्स या कंपनीत काम करताना ही पावडर चोरल्याचे स्पष्ट झाले आहे.याप्रकरणी कंपनी व्यवस्थापनाचीही चौकशी केली जाणार असून या प्रकरणाची जिल्हा व जिल्हय़ाबाहेरही मोठी व्याप्ती असल्यची शक्यता व्यक्त होत आहे. आतापर्यंत सुमारे सुमारे नऊ कोटीची पावडर जप्त करण्यात येथील पोलिसांना यश आले असल्याचे पोलीस अधीक्षक प्रणय अशोक यांनी स्पष्ट केले आहे.

15col7

सुमारे चार कोटी रूपयांच्या केटामाईन विक्रीप्रकरणी चार दिवसांपूर्वी संतोष हरी कदम, मंगेश दीपक कदम, स्वप्नील वासुदेव खोचरे या तिघांना अटक करण्यात आली असून सध्या ते पोलीस कोठडीत आहेत. यातील मंगेश हा लोटे येथील सुप्रिया लाईफ सायन्स या कंपनीत काही महिन्यांसाठी नोकरीला होता. यादरम्यान, थोडी-थोडी पावडर चोरून त्याने मोठा साठा केला होता. संतोष व स्वप्नील यांच्या माध्यमातून ही पावडर विकण्याचा प्रयत्न त्याने केल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. मंगेश याने आपल्या मोरवंडे-पिंपळवाडी येथील घराच्या माळय़ावर डब्यात भरून कणगीत ठेवलेले आणखी सुमारे सहा किलो केटामाईन जप्त करण्यात चिपळुण पोलीसांना यश आले आहे.

बुधवारी सायंकाळी उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. शीतल जानवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रदीप मिसर, सहाय्यक पोलीस निरीक्षक बडेसाब नाईकवडे, डीबी पथकाचे प्रदीप गमरे, गगनेश पटेकर, दीपक ओतारी, योगेश नार्वेकर आदींचे पथक सर्व यंत्रणेसह त्याच्या घरी गेले. यावेळी त्याने सांगितल्याप्रमाणे 5 किलो 880 ग्रॅम वजनाची 4 कोटी 78 लाख 20 हजार 220 रूपयांची पावडर सापडली. आातापर्यंत 10 किलो 965 ग्रॅम वजनाची पावडर दुचाकी, मोबाईल, डबा, कुलूप असा 8 कोटी 77 लाख 41 हजार 770 रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आले असून आणखी साठा सापडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

अनेक प्रश्न अनुत्तरीत

मंगेश हा वरील कंपनीत काही महिने नोकरीला होता. याचदरम्यान त्याने ही पावडर चोरल्याचे प्राथमिक चौकशीत पुढे आले आहे. मात्र तीन महिन्यात तो इतकी पावडर चोरू शकतो का असा सवाल उपस्थित होत आहे. कंपनीतून चोरी होऊ नये म्हणून सीसी टीव्ही कॅमेरे व इतर यंत्रणा आहे की नाही, यात आणखी कोणाचा सहभाग आहे का, असे अनेक प्रश्न अनुत्तरीत राहिले आहेत. त्यामुळे त्याच्या उत्तरासाठी पोलीस कंपनी व्यवस्थापनाचीही चौकशी करणार आहेता. या चौकशीनंतरच अनेक प्रश्नांची उकल होणार आहे.

खरेदीदार कोण?

या पावडरची विक्री या पूर्वी झाली का, झाली असल्यास ती कोणाला विकली गेली, चार दिवसांपूर्वी संतोष ही पावडर कोणाला विकायला आला होता, तो खरेदीदार कोण, असे अनेक प्रश्न आजही उभे ठाकले आहेत. त्यामुळे पोलिसांना या प्रकरणाच्या मुळाशी जावे लागणार आहे.

बँक खाती तपासणार

या प्रकरणाचा सखोल तपास होईल, असे पोलीस निरीक्षक प्रदीप मिसर यांनी यापूर्वीच स्पष्ट केले आहे. त्यादृष्टीने त्यांनी तपासही सुरू केला आहे. त्याचाच भाग म्हणून अटक केलेल्या तिघांची बँक खातीही तपासली जाणार आहेत. या तपासणीचाही पोलिसांना तपासकार्यात मोठा फायदा होणार आहे.

खेड, चिपळूण केंद्र

या अंमली पदार्थाची चिपळूण व खेड ही मुख्य केंद्रे असून त्याची विक्री मुंबई येथील व्यक्तींना होत असल्याची माहिती पुढे येत आहे. त्यामुळे पोलीस याप्रकरणाचा सखोल तपास करत असून तिघांची कसून चौकशी सुरू आहे. त्यामुळे याप्रकरणी आणखी काहींना अटक होण्याची शक्यता आहे.

प्रकरणाच्या मुळापर्यंत जाणार ः प्रणय अशोक

इतक्या मोठय़ा प्रमाणात सापडलेल्या या केटामाईन ड्रग्जची व्यापीही मोठी असण्याची शक्यता आहे. या प्रकरणाच्या मुळापर्यंत जाण्याचा प्रयत्न चिपळूण पोलीस टीम करत आहे. गेल्या वेळीही चिपळूणात केटामाईन सापडले होते त्या प्रकरणाशी या घटनेचे काही धागेदोरे आहेत का? यामध्ये किती लोकांचा सहभाग आहे या सगळय़ा गोष्टींचा पर्दाफाश लवकरच होईल. रत्नागिरीतील शहरातील काही ठिकाणी विविध प्रकारच्या अमली पदार्थ विकले जात असल्याची माहिती मिळाली असून यासाठी विशेष पथक नेमणूक करण्यात येणार आहे. तरूण वर्गांमध्ये याविषयी जागरूकता निर्माण करण्यात येईल. शक्यतो अशा कोणत्याही अमली पदार्थ्यांना कोणी बळी पडू नये पोलीसांना वेळेत याची खबर देण्यात यावी.