|Wednesday, January 29, 2020
You are here: Home » आवृत्ती » सांगली » जातपडतळणीच्या दाखल्यासाठी मराठा विद्यार्थ्यांचे निकाल रोखले

जातपडतळणीच्या दाखल्यासाठी मराठा विद्यार्थ्यांचे निकाल रोखले 

सोलापूर /वार्ताहर
सन 2014 मध्ये पाच महिन्याकरीता मराठा समाजाला आरक्षण प्राप्त झाले होते. याकाळात अनेक महाविद्यालय आणि विद्यापीठातून विद्यार्थ्यांनी आरक्षणाचा लाभ घेऊन प्रवेश घेतले. पण, त्यानंतर न्यायालयाने या आरक्षणाला स्थगिती दिली आहे. असे असले तरी, सोलापूर विद्यापीठाने मात्र आरक्षणातून प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यानी जात पडताळणीची कागदपत्राची पुर्तता करण्याच्या मागणीसाठी निकाल राखून ठेवल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष धोक्यात आले आहे.
तत्कालिन राज्य शासनाने नऊ जुलै 2014 रोजी शैक्षणिक व सामाजिकदृष्टय़ा मागास ईएसबीसी प्रवर्गासाठी मराठा समाजास 16 टक्के आरक्षण जाहीर केले होते. हा काळ शैक्षणिक वर्षाच्या प्रवेशाचा असल्याने अनेक विद्यार्थ्यांनी या आरक्षणाच्या माध्यमातून आपले प्रवेश निश्चित केले होते. सोलापूर विद्यापीठातही उच्च व तंत्रशिक्षण, वैद्यकीय, कृषी, पशुसंवंर्धन विभागातील खासगी, अनुदानीत, विना अनुदानीत आदी संस्थामध्ये आरक्षण देण्यात आले होते.
पण, त्यानंतर, न्यायालयाने तत्कालिन राज्य शासनाने जाहीर केलेल्या मराठा आरक्षणास स्थगिती दिली आहे. त्यामुळे राज्य शासनानेही मराठा आरक्षणाचे जात पडताळणी करण्याची कार्यालये बंद केली आहेत. पण, सोलापूर विद्यापीठाने मात्र आरक्षणातून मराठा समाजाच्या विद्यार्थ्यानी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्याचा जातपडताळणीच्या दाखल्यासाठी चक्क निकाल राखून ठेवल्याने आरक्षणातून प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांतून कमालीची नाराजी आहे.
दरम्यान, यासंदर्भात अशा अन्यायग्रस्त विद्यार्थ्यानी शंभूराजे युवा संघटनेच्या माध्यमातून जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांची भेट घेऊन त्यांना मागणीचे निवेदन दिले. या विद्यार्थ्यांनी आरक्षणाच्या माध्यमातून प्रवेश घेतला असला तरी त्यांना कोणतेही शासकीय लाभ मिळाले नाहीत. शिवाय राज्य शासनाने मराठा समाजाची जात पडताळणीच करण्याची कार्यालयेच बंद केली आहेत. यामध्ये या विद्यार्थ्यांचा दोष काय? असा प्रश्न उपस्थित करून सोलपूर विद्यापीठ आणि पुण्याच्या तंत्रनिकेतन विभागाच्या गलथान कारभामुळे विद्यार्थी पुढील शिक्षण आणि नोकरीपासून वंचित राहत आहेत. त्यामुळे या विद्यार्थ्यांना तात्काळ निकाल देण्यात यावा, अशी मागणी त्यांनी केली. यानिवेदनावर नितीन चव्हाण, आस्मान अत्तार, पुजा बाबर, स्वप्नील कोरे, संदिप भोसले, राहुल पवार आदीच्या सहय़ा आहेत. या विद्यार्थ्यांना तात्काळ निकाल देण्यात यावेत अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

Related posts: