|Monday, September 16, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » त्याच्या’तील माणुसकीने जागवली नवजात बालकाची प्राणज्योत

त्याच्या’तील माणुसकीने जागवली नवजात बालकाची प्राणज्योत 

मडगाव/ सोमनाथ का. रायकर

ज्या मणिपुरी महिलेचा आरोपी बॅनर किशींग याने खून केला त्या आरोपीकडून नकळत आणखी एकाचा… अर्थात नवजात बालकाची हत्या होण्याची शक्यता होती. मात्र, त्याच्यात असलेल्या माणुसकीमुळेच या तान्हुल्याचा जीव वाचला होता…

च्योंगाम्ला झिमीक या मणिपुरी महिलेचे लग्न फातोर्डा येथे राहणाऱया सावियो नावाच्या इसमाशी झाले होते. त्यांना मूल झाले तेव्हा श्रीमती च्योंगाम्ला झिमीक हिला त्या मुलाचा सांभाळ करणे व घरातील कामे करणे कठीण होऊ लागले होते आणि म्हणून तिने आपल्या मणिपूर राज्यातीलच एक विश्वासू म्हणून बॅनर किशींग या जवळ जवळ 19 वर्षीय मुलाला आणले होते.

मात्र पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार श्रीमती च्योंगाम्ला झिमीक हिने कामासाठी आणलेल्या या मुलाला सतत कामात दंग ठेवण्याचा सपाटा लावला होता. ज्या वयात खेळायचे, हिंडायचे त्या वयात परिस्थितीनुसार एका बंद फ्लॅटमध्ये काम करण्याचे या मुलाच्या वाटय़ास आले होते. विश्रांती कमी आणि कामे ज्यादा यामुळे आरोपी कंटाळला आणि रागाच्या भरात आरोपीने आपल्याच मालकिणीचा नकळत रागाच्या भरात खून केला.

माणुसकी जीवंत होती ….

आपल्या मालकिणीचा खून केल्यानंतर आणि तिच्या नवजात बालकाला त्याच फ्लॅटमध्ये ठेऊन आरोपी मणिपूरला जाऊ शकला असता. ज्या वेळी या फ्लॅटमधून दुर्गंधी आली असती तोपर्यंत किमान तीन दिवस गेले असते आणि या तीन दिवसात नवजात मूल वाचूच शकले नसते….

मात्र आरोपीच्या अंगात माणुसकीचा ओलावा होता.. त्याला या नवजात व निष्पाप नवजात मुलाची दया आली असावी आणि म्हणूनच त्याने या मुलाला हात लावला नाही.. त्या मुलाला घेऊन तो शेजाऱयाकडे गेला आणि आपण आपल्या मालकिणीला मारले अशी कबुली दिली आणि त्यानंतरच जगाला या खुनाची खबर कळली होती.

हे मूल जेव्हा सज्ञान होईल तेव्हा आपल्या आईचा खून केल्याप्रकरणी या आरोपीबद्धल नक्कीच व्देष निर्माण होईल मात्र त्याचबरोबर या आरोपीने दाखवलेल्या दयेमुळेच आपण जगू शकले याचीही तिला जाणीव नक्कीच होईल….