|Monday, August 26, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » प्राथमिक शाळांमध्ये 831 शिक्षक पदे रिक्त

प्राथमिक शाळांमध्ये 831 शिक्षक पदे रिक्त 

सिंधुदुर्गनगरी  : शासनाने 2012 नंतर गेल्या पाच वर्षात शिक्षक भरतीच न झाल्याने जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमध्ये शिक्षकांच्या रिक्त पदांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. मे 2017 अखेर पर्यंत तब्बल 500 शिक्षकांची पदे रिक्त झाली आहेत. आंतर जिल्हा बदलीद्वारे आणखी 331 शिक्षक बदली होऊन जाणार आहेत. शासनाने मान्यताही दिली आहे. त्यामुळे शिक्षकांची रिक्त पदांची संख्या 831 वर पोहोचणार आहे. अतिरिक्त ठरत असलेल्या 395 मुख्याध्यापकांना उपशिक्षक पदावर भविष्यात सामावून घेतले गेले तरीही. 436 शिक्षकांची पदे रिक्त राहणारच आहेत. त्यामुळे आता शासनाने शिक्षक भरती करणे अत्यंत आवश्यक आहे. अन्यथा शिक्षकांअभावी शाळांची परिस्थिती बिकट होऊन विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार आहे.

  डिएड बेरोजगारही शिक्षक भरतीच्या प्रतीक्षेत असून शिक्षक भरती न झाल्याने डीएड बेरोजगारांची संख्याही मोठय़ा प्रमाणात वाढत आहे. किंबहुना शिक्षक भरती होत नसल्याने डीएड करायलाही कुणी आता उत्सूक राहिलेले नाहीत. त्यामुळे डीएड कॉलेजही काही बंद झाली आहेत. सिंधुदुर्गात शिक्षकांच्या रिक्त पदांची संख्या वाढतच चालल्याने पालक वर्गातून शिक्षकांसाठी वारंवार आंदोलने होत आहेत. या वर्षीच्या शैक्षणिक वर्षाच्या पहिल्यादिवशी विद्यार्थ्यांचे जय्यत स्वागत होत असतानाच शिक्षक नसल्याने पहिल्याच दिवशी सावंतवाडी तालुक्यातील असनिये गावच्या ग्रामस्थ व पालकांनी शिक्षक मागणीसाठी शाळाबंद आंदोलन छेडले. शिक्षक भरती न झाल्यास आगामी काळात वारंवार शाळाबंद आंदोलन होण्याचे प्रकार वाढणार आहेत. 

500 शिक्षक पदे रिक्त

  महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्यामार्फत शिक्षक भरतीसाठी सीईटीची परीक्षा घेतली. डीएड बेरोजगार सीईटीची परीक्षा देऊन शिक्षण सेवक भरती होत असतात. राज्यस्तरीय गुणवत्ता यादी लावली जाते. त्याप्रमाणेच प्रत्येक जिल्हय़ात रिक्त शिक्षक पदावर सामावून घेतले जाते. शिक्षण सेवकांना तीन वर्ष झाल्यावर ते नियमित शिक्षक म्हणून रुजू होत असतात. सीईटीची परीक्षा घेऊन राज्यस्तरीय गुणवत्ता यादीप्रमाणे शिक्षक भरती प्रत्येक जिल्हय़ात होत होती. परंतु 2012 नंतर गेल्या पाच वर्षात शिक्षक भरतीसाठी सीईटीची परीक्षाही नाही घेतली आणि शिक्षक भरतीही केलेली नाही. त्यामुळे जि. प. च्या प्राथमिक शाळांमधील शिक्षकांची पदे मोठय़ा प्रमाणात रिक्त होत आहेत. मे 2017 अखेरची सिंधुदुर्ग जिल्हय़ातील शाळांची परिस्थिती पाहिल्यास जि. प. च्या एक हजार 455 शाळा आहेत. या शाळांसाठी चार हजार 87 शिक्षक पदे मंजूर असून मंजूर शिक्षक पदापैकी तीन हजार 587 पदे भरलेली असून 500 शिक्षक पदे रिक्त आहेत.

आंतर जिल्हा बदलीने 331 शिक्षकपदे रिक्त

  जिल्हय़ातील 331 शिक्षकांच्या आतंरजिल्हा बदली यादीस शासनाने मान्यता दिली आहे. आंतरजिल्हा बदलीची कार्यवाही आता शासन स्तरावरुनच सुरू झाली आहे. त्यामुळे पर्यायी शिक्षक दिल्याशिवाय आंतरजिल्हा शिक्षक बदलीचा ठरावही घेऊनही जि. प. ला चालणार नाही. शासनस्तरावरूनच बदली होणार आहे. केवळ तपासणीसाठी आंतर जिल्हा शिक्षक बदलीचे प्रस्ताव जि. प. च्या शिक्षण विभागाकडे पाठवले जाणार आहेत. 331 शिक्षकांच्या आंतर जिल्हा बदलीस शासनाने मंजुरी दिली आहे. त्यामुळे आणखी 331 शिक्षकांची पदे रिक्त होणार आहेत. सद्या रिक्त असलेली 500 शिक्षकांची पदे मिळून एकूण 831 शिक्षक पदे रिक्त होणार आहेत.

तरीही 436 शिक्षकपदे रिक्त राहणारच

     जि. प. च्या शाळामधून 415 मुख्याध्यापक पदे सिंधुदुर्गात भरलेली होती. परंतु आता शिक्षण हक्क कायदा लागू झाल्यानंतर मुख्याध्यापकांची पदे घटविण्यात आली. सिंधुदुर्गात मुख्याध्यापकांची फक्त 20 पदे ठेवण्यात आली आहेत. त्यामुळे 395 मुख्याध्यापक अतिरिक्त ठरले आहेत. त्यांचे अद्याप समायोजन झालेले नाही. परंतु अतिरिक्त ठरलेल्या 395 मुख्याध्यापकांचा उपशिक्षक पदावर सामावून घेतले तरीही 436 शिक्षकांची पदे रिक्त राहणारच आहेत. तसेच सद्या कार्यरत असलेल्या शिक्षकांमधून आगामी काळात सेवानिवृत्त होणारेही बरेच शिक्षक आहेत. त्यामुळे शिक्षकांची रिक्त पदे दिवसेंदिवस वाढताच जाणार आहेत. यांचा गंभीर परिणाम होऊन शिक्षकांअभावी शाळा बंद आंदोलने होऊन जि. प. च्या शाळा बंद पडण्याची भीती निर्माण होणार आहे. शासनाने आता शिक्षकांच्या रिक्त पदांची गांभीर्याने दखल घेऊन शिक्षक भरती करणे आवश्यक आहे तरच रिक्त शिक्षक पदांचा प्रश्न सुटणार आहे.

  देवगड तालुक्यात सर्वाधिक रिक्त पदे असून देवगड मध्ये मंजूर 633 पदापैकी 141 पदे रिक्त आहेत.

तालुकानिहाय शिक्षकांची मंजूर पदे व रिक्त पदे

तालुके                          मंजूर पदे             रिक्त पदे

वेंगुर्ला                            398                 84

कुडाळ                            701                50

सावंतवाडी                       609                 36

कणकवली                       659                35

देवगड                              633                141

मालवण                            532                95

वैभववाडी                           293                22

दोडामार्ग                             262               37

———                        ————-         ————

एकूण   –                            4,087              500