|Saturday, October 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » माजी नगरसेवकाच्या मुलाकडून 60 लाखाला फसवणूक

माजी नगरसेवकाच्या मुलाकडून 60 लाखाला फसवणूक 

प्रतिनिधी/ सोलापूर

टेक्सटाईल पार्क सोसायटीमध्ये सभासद करून घेतो असे सांगून माजी नगरसेवकाच्या मुलाने तिघांना 60 लाख रूपयांना फसविले. याबाबत रविंद्र व्यंकटस्वामी इंदापुरे यांनी आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल केले आहे.

प्रशांत अनिल पल्ली असे माजी नगरसेवकाच्या मुलाचे नाव आहे. या गुह्यामध्ये शरद किशोर मेरगु याचेही नाव आहे. यातील हकीकत अशी की, ‘एशियाटिक को. ऑफ पॉवरलुम टेक्सटाईल पार्क सोसायटी’ या नावाने टेक्साटाईल पार्कची योजना सुरू करण्यात आली आहे. यामध्ये केंद्र शासन व राज्य शासनाकडुन अनुदान मिळत असून, यात सभासद झाल्यास एक युनिट देणार आहे. त्यामध्ये 8 ते 10 हजार स्क्वेअर फुट जमिनीवर बांधकाम, 8 शटललेस लुम (ऍटो लुम) देखील देणार आहे, असे प्रशांत पल्ली आणि शरद मेरगु यांनी आमिष दाखविले. त्यात सभासद होण्यासाठी 1 युनिटसाठी पाच लाख रूपयेप्रमाणे 4 युनिटचे 20 लाख रूपये लागतील असे सांगितले.

त्यानुसार दोनही आरोपींनी रविंद्र व्यंकटस्वामी इंदापुरे (वय 48, रा. साखरपेठ, सोलापूर), सुधाकर चिटय़ाल व रामकृष्ण कोंडय़ाल या तिघांना विश्वासात घेऊन प्रत्येकी 20 लाखप्रमाणे 60 लाख रूपये घेतले. या तिघांकडून 2009 साली सभासद बनवून घेतो म्हणून पैसे घेतले होते. मात्र, साल 2009 ते आजपावेतो त्यांना सभासदही बनवून घेतले नाही आणि तिघांचे पैसे देखील परत केले नाहीत. वारंवार पैसे परत करण्याची मागणी करूनही पैसे न दिल्याने रविंद्र इंदापुरे यांनी जेलरोड पोलीस ठाण्यात आरोपींविरूद्ध गुन्हा दाखल केला. सदर गुह्याचा तपास पोलीस आयुक्त महादेव तांबडे, पोलीस उपायुक्त पौर्णिमा चौगुले, सहायक पोलीस आयुक्त शर्मिष्ठा वालावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बजरंग साळुंखे हे करीत आहेत.