|Tuesday, October 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » बालिकेवर अत्याचार प्रकरणी आजन्म कारावास

बालिकेवर अत्याचार प्रकरणी आजन्म कारावास 

माळशिरस ( तालुका प्रतिनिधी )

कौटुंबिक संबंधाचा गैरफायदा घेऊन चार वर्षाच्या मुलीवर अत्याचार करणाऱया उच्च शिक्षीत विजय शेलार या आरोपीस माळशिरस येथील अप्पर जिल्हा सत्र न्यायाधीश अनिस एजे खान यांनी आजन्म कारावास व दोन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली

या बाबतची हकीगत अशी की पिडीत मुलीच्या व आरोपी विजय शेलारच्या कुटुंबाचे कौटुंबीक व विश्वासाचे संबंध होते. त्यामुळे ही पिडीत मुलगी आरोपीच्या घरी नेहमी खेळण्यासाठी येत जात होती. 12 जानेवारी 2016 रोजी पिडीत मुलगी ही आरोपीच्या घरी खेळत खेळत गेली होती. त्यावेळी पिडीत मुलीची आई घरात काम करीत होती तर आजी जनावरांना चारा टाकण्यासाठी गेली होती ती पिडीत मुलगी आरोपीच्या घरी आली त्यावेळी आरोपीने मुलीच्या विश्वासाचा गैरफायदा घेऊन पिडीत मुलीवर अत्याचार केला त्यानंतर ही गोष्ट पिडीत मुलीच्या आईच्या लक्षात आल्यावर तीने या बाबत मुलीकडे गोड बोलून चौकशी केली असता मुलीने झालेला संपूर्ण प्रकार आईस सांगितला. त्यानंतर पिडीत मुलीच्या आईने विजय शेलार विरोधात माळशिरस पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली त्यानुसार  सहाय्यक पोलीस निरीक्षक अशवीनी शेंडगे यांनी आरोपीस अटक केली व घटनेचा संपूर्ण तपास करून आरोपी विरुद्ध माळशिरस सत्र न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले.

न्यायालयाने आरोपीचा जामीन अर्ज ही नामंजूर केला होता त्यामुळे हा संपूर्ण खटला आरोपीस जेलमध्ये ठेऊनच चालविला या खटल्यात एकुण सहा साक्षीदार तपासण्यात आले.

त्यामध्ये पिडीत मुलगी, तिचे आईवडील व वैद्यकीय अधिकारी डॉ. स्मिता शिंदे व डॉ. फडतरे यांच्या साक्षी महत्वाच्या ठरल्या. पिडीत मुलीने आपल्या साक्षीत संपूर्ण घटनेचा प्रकारच कथन केला त्यामुळे तिची साक्ष या खटल्यात फार महत्वाची ठरली त्यामुळे सरकार पक्षाने दाखल केलेले पुरावे व अप्पर जिल्हा सरकारी वकील ऍड संग्राम पाटील यांनी केलेला युक्तीवाद ग्राह्य धरुन माळशिरसचे अप्पर जिल्हा सत्र न्यायाधीश अनिस एजे खान यांनी आरोपी विजय शेलार यास बाललैंगीक शोषण विरोधी कायदा कलम 4 व 6 अन्वये दोषी धरून आजन्म कारावासाची व दोन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.

या घटनेनंतर माळशिरस शहरात माहिला व मुलींनी मोठा मोर्चा काढून आरोपीस कठोर शासन द्यावे, अशी मागणी केली होती. त्यामुळे खटल्याकडे तालुक्याचे लक्ष लागले होते. या खटल्यात जिल्हा सरकारी वकील म्हणून ऍड. संग्राम पाटील यांनी काम पाहिले तर तपास सहाय्यक पो नि अश्विनी शेंडगे यांनी केला तर कोर्ट पैरवी म्हणुन आर पी जमादार व एन जी नाईकनवरे यांनी काम पाहिले.