|Saturday, October 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » मंत्रीमंडळ विस्तारावर नजर ठेवूनच राजू शेट्टींचे आंदोलन

मंत्रीमंडळ विस्तारावर नजर ठेवूनच राजू शेट्टींचे आंदोलन 

प्रतिनिधी/ सांगली

  शेतीमालाला दर नाही, कर्ज थकीत असल्याने बँका दारात येऊ देत नाहीत. अशा स्थितीत शेतकरी आत्महत्येचा मार्ग स्वीकारत असताना प्रस्थापित शेतकरी संघटना सरकारमध्ये सहभागी असल्याने गप्प होत्या. शेतकऱयांच्या बाजूने कोणीच नसताना आम्ही राज्यात संघर्ष यात्रा काढली. सर्व विरोधी पक्षांना संघटित केले. या ऐतिहासिक आंदोलनानंतर राज्य सरकारने कर्जमाफीची घोषणा केली. पण, केंद्र आणि राज्यातील शेतकरी विरोधी मानसिकतेचे सरकार कर्जमाफीपासुन पुन्हा माघार घेऊ पाहत आहे. याचा निषेध करत खा. राजू शेट्टी यांचे आंदोलनही केंद्राच्या मंत्रीमंडळ विस्तारावर नजर ठेऊन असल्याची टीका माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पत्रकारांशी बोलताना केली.

मंगळवारी सकाळी सांगली दौऱयावर आलेले मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पत्रकारांशी संवाद साधला. चव्हाण म्हणाले, शेतकरी कर्जमुक्तीसाठी सर्व विरोधी पक्ष एकसंघ झाले ही ऐतिहासिक घटना आहे. संयुक्त महारष्ट्राच्या निर्मितीसाठीच्या आंदोलनानंतर हे पहिलेच आंदोलन असे झाले. सर्वपक्षीयांनी शेतकरी आंदोलनाचे हत्यार उपसल्याने सरकारला नमते घेण्याची वेळ आली. सुरूवातीला या आंदोलनाची टर उडवणाऱया राज्य सरकारने कर्जमाफीची घोषणा केली. पण, त्यामुळे  केंद्र सरकार नाराज झाले. केंद्रीय अर्थमंत्री वेंकय्या नायडू यांनी कर्जमाफीसाठी लागणारी तीस हजार पाचशे कोटींची तरतूद राज्याने स्वतःच्या तिजोरीतून करण्याची सूचना त्यांनी केली. त्यानंतर राज्य सरकारने मात्र कर्जमाफीला निकष लावण्यास सुरूवात केली आहे. कोणतेही निकष न लावता शासनाने सरसकट कर्जमाफी करावी अशी आपली मागणी आहे. पण शेतकरी विरोधी मानसिकतेचे सरकार गेल्या तीन वर्षापासून शेतकरी हिताचा एकही निर्णय घेण्यास तयार नसल्याची टिकाही त्यांनी यावेळी केली.

राज्यात चारशे कोटींचा तुर घोटाळा

राज्यात तुरीचे अतिरिक्त उत्पादन झाले. शासनाने नाफेडमार्फत तुर खरेदी केंद्रे सुरू केली. पण, गतवर्षीच्या तुलनेत चार पट तुरीचे उत्पादन झाले. म्हणजे 32 लाख टन उत्पादन झाले असताना सरकारने केवळ चार ते पाच लाख टन तुर हमीभावाने खरेदी केली आहे. बाकीच्या तुरीचे काय झाले हे समजू शकत नाही. राज्यात व्यापाऱयांनी साडेतीन ते चार हजार रूपये दराने तुर खरेदी करून ती हमीभावाने शासनाला विकल्याने 400 कोटींचा घोटाळा झाला असल्याची कबुली खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच करत या घोटाळयाच्या चौकशीसाठी एक हजार मोठया शेतकऱयांची चौकशी करण्याची घोषणा केली होती.पण सर्वच गुंडाळले गेले असल्याची टिकाही त्यांनी केली.

 मंत्रीमंडळ विस्ताराकडे नजर

शेतकऱयांच्या प्रश्नावर एकही प्रस्थापित शेतकरी संघटना आंदोलनास तयार नव्हती. प्रस्थापित शेतकरी संघटना राज्य सरकारमध्ये सहभागी आहेत. काँग्रेसने सर्व विरोधी पक्षांना एकत्रित केल्यानंतर शेतकरी संघटनांनीही आंदोलनाचे नाटक केले. तरीही राज्य सरकारने राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांचा वापर करून आंदोलन मोडीत काढण्याचा प्रयत्न केला. खा. शेट्टी यांनीही आत्मक्लेश आंदोलन केले.पण त्यांचे आंदोलन दिल्लीतील मंत्रमंडळाच्या विस्ताराकडे नजर लावून करण्यात आले आहे.त्यांना जर इतकाच शेतकऱयांचा पुळका असेल तर त्यांच्या संघटनेने सरकारातून बाहेर पडावे असे आवाहन पृथ्वीराज चव्हाण यांनी केले.

मुख्यमंत्र्यांना विरोधक जास्त

एकनाथ खडसे वगळता राज्य मंत्रीमंडळात एकही अनुभवी मंत्री नव्हते. पण, खडसे यांची चौकशी सुरू झाली आहे. तर मुख्यमंत्री फडणवीस यांना त्यांच्याच पक्षात  विरोधक जास्त आहेत. कृषिमूल्य आयोगाची स्थापना करण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे. पण राज्य कृषिमूल्य आयोगाची स्थापना आपण मुख्यमंत्री असताना 2012 सालीच केल्याचे सांगत त्याला आता वैधानिक स्वरूप देण्याची गरज आहे. कृषिमूल्य आयोग अस्तित्वात असतानाही पुन्हा स्थापनेची घोषणा करणे म्हणजे मुख्यमंत्र्यांना कोणी माहितीच सांगत नसल्याचे प्रतिक आहे. असा आरोपही पृथ्वीराज चव्हाण यांनी केला.  राज्यात शेतकरी आंदोलन पेटले असताना कृषीमंत्री परदेशात आहेत. कृषिराज्यमंत्री सदाभाऊ खोत यांना काही अधिकारच नाहीत. तर अनुभवी कोणीच नसल्याने राज्य सरकारमध्ये सर्व गोंधळाचे वातावरण असल्याची टीकाही पृथ्वीराज चव्हाण यांनी केली.

नोटबंदी हा निवडणुकीसाठीचा निर्णय

नोटाबंदीनंतर काळा पैसा बाहेर येईल अपेक्षा होती. पण, नोटाबंदी हा निवडणुका जिंकण्यासाठीचा एक फंडा असल्याचा संशय आता येऊ लागला आहे. रिझर्व्ह बँकेने आतापर्यत किती नोटा छापल्या. त्यातील कोणत्या र्बॅकेला किती नोटा दिल्या याबाबतची माहिती अद्यापही रिझर्व्ह बँक देऊ शकत नाही. त्यामुळे कुठेतरी पाणी मुरतंय हे नक्की असा आरोपही चव्हाण यांनी केला. यावेळी महापौर हारूण शिकलगार, काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज चव्हाण, युवक काँग्रेसचे अमित पारेकर आदी उपस्थित होते.