|Monday, September 23, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » योग दिनानिमित्त आज राज्यभर भरगच्च कार्यक्रम

योग दिनानिमित्त आज राज्यभर भरगच्च कार्यक्रम 

प्रतिनिधी/ पणजी

आंतरराष्ट्रीय योगदिनाचा कार्यक्रम गोव्यातही साजरा करण्यात येणार असून तो बांबोळी येथील श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियमवर होणार आहे. सकाळी 7.30 ते 9.30 या वेळेत राज्याचा हा मुख्य कार्यक्रम सरकारी पातळीवर आखण्यात आला असून त्यात मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर आणि क्रीडामंत्री बाबू आजगांवकर सहभागी होणार आहेत. त्याशिवाय शाळेतील मुलांना देखील सहभागी करुन घेण्यात आले आहे.

योग शिक्षक तसेच इतर शिक्षकांनाही या योगदिन कार्यक्रमात आमंत्रित करण्यात आले असून त्यावेळी निवडक योग शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली योगाची प्रात्यक्षिके सादर केली जाणार आहेत. मुख्यमंत्र्यांसह इतर आमदार-मंत्री तसेच शालेय मुले त्यात सहभागी होणार आहेत. आरोग्य संचालनालय आणि क्रीडा-युवा व्यवहार संचालनालयाच्या सहकार्याने हा राज्य पातळीवर कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

सर्व सरकारी खात्याचे अधिकारी-कर्मचारी तसेच शाळा-कॉलेजची मुले मिळून 1000 पेक्षा अधिक जण त्यात सामील होतील आणि योग करतील. उत्तर गोवा जिह्यासाठी पेडे-म्हापसा येथील लुसोफोनिया गेम हॉल तर दक्षिण गोवा जिह्यासाठी मल्टीपर्पज हॉल बोरीमळ-केपे येथे सकाळी 7 ते 10 या वेळेत योग दिनाचे कार्यक्रम होणार आहेत. क्रीडा खात्यातर्फे तालुका पातळीवर योग दिन कार्यक्रम आखले असून 25 प्राथमिक आरोग्य केंद्रातही ते कार्यक्रम होतील. विविध संस्थांचे योग शिक्षक कार्यक्रमात सहभागी होऊन सहकार्य देणार आहेत.