|Wednesday, December 11, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » पाच लाखांचे बिबटय़ाचे कातडे जप्त

पाच लाखांचे बिबटय़ाचे कातडे जप्त 

विक्रीसाठी आलेला पाटणचा तरुण जाळय़ात

कुंभार्ली चेकनाक्यावर एलसीबीची कारवाई

शेवरोलेट कारही केली जप्त

विक्रीमागे मोठे रॅकेट असण्याची शक्यता

प्रतिनिधी /रत्नागिरी

चोरटय़ा मार्गाने बिबटय़ाच्या कातडय़ाच्या तस्करीचा प्रकार रत्नागिरी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी बुधवारी हाणून पाडला आहे. सातारा जिल्हय़ातील पाटण येथून हे कातडे विक्रीसाठी घेऊन आलेल्या तरूणाच्या कुंभार्ली घाटातील चेकनाक्यावर नाकाबंदी करून मुसक्या आवळण्यात आल्या. त्याच्याकडून 5 लाख रुपये किंमतीचे कातडे व शेवरोलेट कार जप्त करण्यात आली आहे. या प्रकरणात अटक केलेला तरूण हा मध्यस्थ असून यामागे आणखी मोठे रॅकेट असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अटक केलेल्या तरूणाचे नाव दिपक हनमंत पावसकर (41, मूळ रा. घर. नं. 334 सबनूर, ता. पाटण, सध्या रा. पद्मावती, धनकवडी, पुणे) असे आहे. रत्नागिरी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांना पाटण येथून कुंभार्ली घाटमार्गे एकजण बिबटय़ाचे कातडे विक्रीसाठी येणार असल्याची गोपनीय खबर मिळाली होती. त्यावरून पोलीस अधिक्षक प्रणय अशोक व अपर पोलीस अधिक्षक मितेश घट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शिरीष सासणे यांनी त्याला जाळय़ात पकडण्यासाठी तयारी केली.

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने कुंभार्ली पोलीस चेकनाक्यावर नाकांबदी केली. पाटणकडून येणाऱया सर्व वाहनांची तपासणी करण्यात आली. त्यावेळी 20 जून रोजी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास शेवरोलेट एन्जॉय गाडी क्रमांक एमएच-12, एन.एक्स-0112 या गाडीची तपासणी करण्यात आली. या गाडीच्या डीकीत बारदानात गुंडाळलेले एक बिबटयाचे कातडे दिसून आले. चालक दिपक पावसकर यांच्याकडे पोलिसांनी चौकशी केली. मात्र त्याला कोणतेही समाधानकारक उत्तरे देता आले नसल्याचे पोलीस निरीक्षक शिरीष सासणे यांनी सांगितले. त्यामुळे दिपक पावसकर याला तात्काळ ताब्यात घेण्यात आले.

त्याच्याकडून 5 लाखांचे बिबटय़ाचे कातडे व 7 लाख रु. किंमतीची शेरारोलेट कार जप्त करण्यात आली. पावसकर याच्याविरोधात अलोरे शिरगाव पोलीस स्थानकात भारतीय वन्यजीव संरक्षण अधिनियम सन 1971 चे कलम 9.51,48 (अ) अन्वये गुन्हा दाखल करून अटकेची कारवाई करण्यात आली आहे. त्यांने विक्रीसाठी आणलेले बिबटय़ाचे कातडे कोठून आणले व त्या तस्करीमध्ये आणखी कोणाकोणाचा सहभाग आहे याचा तपास सुरू आहे. या कातडय़ाचा नमुना तपासणीसाटी पुणे येथे पाठवण्यात आला आहे. याविषयी पुढील तपास अलोरे शिरगाव पोलीस स्थानकासह स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस करत आहेत.

ही कारवाई पोलीस निरीक्षक शिरीष सासने, पोलीस उपनिरीक्षक रविराज फडणीस, पोलीस हेड कॉन्स्टेबल दिनेश आखाडे, पोलीस नाईक उदय वाजे, प्रविण बर्गे, अमोल भोसले, चालक दत्ता कांबळे, यांच्यासह अलोरे शिरगाव पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक श्रीमती निशा जाधव, पोलीस नाईक स्वप्नील साळवी शंकर ठोंबरे यांनी केली आहे.

Related posts: