|Monday, August 26, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » तातडीच्या प्रश्नांसाठी लवकरच बैठक!

तातडीच्या प्रश्नांसाठी लवकरच बैठक! 

कुडाळ : आमसभेत मांडलेले सर्व प्रश्न, आलेल्या निवेदनांची दखल घेत तातडीचे जे प्रश्न आहेत, ते सोडविण्यासाठी लवकरच बैठक घेऊन मार्गी लावणार, अशी ग्वाही आमदार वैभव नाईक यांनी बुधवारी येथे झालेल्या कुडाळ तालुका आमसभेत दिली.  काँग्रेसचे जि. प. सदस्य सतीश सावंत यांनी केलेल्या सूचनांचा त्यांनी आवर्जून उल्लेख केला. प्रत्येकाला समस्या मांडण्याची पूर्ण संधी देत त्याचवेळी त्या प्रश्नाला समर्पक उत्तरेही दिली.

ही आमसभा आज येथील महालक्ष्मी सभागृहात आमदार नाईक यांच्या अध्यक्षतेखाली झाली. पं. स. सभापती राजन जाधव, सतीश सावंत, जि. प. उपाध्यक्ष रणजीत देसाई, पं. स. उपसभापती श्रेया परब, जि. प. सदस्य संजय पडते, अंकुश जाधव, अनुप्रिती खोचरे, अमरसेन सावंत, वर्षा कुडाळकर, उपनगराध्यक्ष आबा धडाम, गटविकास अधिकारी विजय चव्हाण, सहाय्यक गटविकास अधिकारी व्ही. एम. नाईक, जि. प. माजी अध्यक्ष काका कुडाळकर, विकास कुडाळकर, तहसीलदार अजय घोळवे यांच्यासह जि. प. व पं. स. सदस्य तसेच खातेप्रमुख उपस्थित होते.

प्रा. गोपाळ दुखंडे, दोडामार्ग पं. स. सदस्य भरत जाधव, काँग्रेसचे ज्येष्ठ कार्यकर्ते भाई शृंगारे व स्वातंत्र्यसैनिक उषाताई वालावलकर आदींना श्रद्धांजली वाहण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खासदार विनायक राऊत, पेंद्रीय मंत्री नितीन गडकरी, आमदार वैभव नाईक, रावसाहेब गोगटे राज्यस्तरीय पुरस्कारप्राप्त ‘तरुण भारत’चे ज्येष्ठ पत्रकार चंद्रकांत सामंत व सिंधुदुर्ग जि. प. तसेच मावळते प्रभारी गटविकास अधिकारी व्ही. एम. नाईक यांच्या कामाबाबत सभेत अभिनंदनाचा ठराव करण्यात आला. कृषी अधिकारी प्रफुल्ल वालावलकर यांनी इतिवृत्त वाचन केले. मागील आमसभेच्या कार्यवाहीस मान्यता देण्यात आली.

जिल्हाधिकाऱयांच्या काही निर्णयांचा उल्लेख करून प्रत्यक्ष भेटी देऊन कामांची माहिती घेत काम करणाऱया जिल्हाधिकाऱयांच्या अभिनंदनाचा ठराव मांडत सतीश सावंत यांनी शेवगा, पपई, बांबू आदी लागवड एमआरजीएसमधून घ्यावी, पूरहानीचा गतवर्षीचा निधी प्राप्त करून घ्यावा आदी प्रश्नांचा उल्लेख करून निर्णयाची अपेक्षा व्यक्त केली. याची दखल घेत सर्व सूचनांवर विचार होईल, अशी ग्वाही आमदार नाईक यांनी त्यांना दिली.

महामार्ग चौपदरीकरण कामाला लवकरच सुरुवात होईल. त्याला भराव मोठय़ा प्रमाणात लागेल. त्यासाठी नद्या-नाल्यांमधील गाळाचा वापर करावा, असा ठराव रणजीत देसाई यांनी मांडला. सागरी महामार्ग दुरुस्त करावा. जि. प.च्या पशु व कृषी विभागाला निधी वाढवून मिळावा, अशा अनेक प्रश्नांकडे लक्ष वेधत ठराव घ्यावेत, असे सांगितले. आमदारांनी ठरावाला मान्यता दिली. गावराई-धनगरवाडी रस्ता पंतप्रधान सडक योजनेत घ्यावा, याकडे काका कुडाळकर यांनी लक्ष वेधले.

कुडाळ तालुक्यातील बरीच गावे निवती पोलीस ठाण्याला जोडल्याने गैरसोय होत आहे. ती गावे पुन्हा कुडाळ पोलीस ठाण्याला जोडावीत, असा ठराव विकास कुडाळकर यांनी मांडला. महामार्ग रुंदीकरण जमीन दरात असलेली तफावत, झाराप-बाजार महामार्ग रुंदीकरणात गेला, तर आंदोलन छेडणार, असा इशारा रुपेश कानडे यांनी दिला. घरबांधणी परवानगीचे अधिकार ग्रा.पं.ना द्यावेत, अशी मागणी राजा प्रभू यांनी केली. राकेश कांदे यांनी कुडाळ येथील स्मशानभूमीच्या संरक्षक भिंतीच्या कामाची चौकशी करावी, अशी मागणी केली. कुडाळची वाहतूक कोंडी सुटण्यासाठी एकमार्ग करावा, अशी सूचना राजू जांभेकर यांनी केली.

शिवसेनेने केलेल्या आंदोलनामुळे शेतकऱयांना कर्जमाफी झाली. म्हणून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, खासदार विनायक राऊत, पालकमंत्री दीपक केसरकर, आमदार वैभव नाईक यांच्या अभिनंदनाचा ठराव अतुल बंगे यांनी मांडला. तो मंजूर झाला. या ठरावाला सतीश सावंत यांनी हरकत घेत 30 जून 2017 पर्यंत कर्ज घेतलेल्या शेतकऱयांना कर्जमाफी व्हावी, अशी सूचना केली. ती आमदारांनी मान्य केली. नागेश आईर, वालावल सरपंच राजेश प्रभू, दिलीप सावंत, मनोज वालावलकर, संजय भोगटे, आना भोगले, सुधा शारबिद्रे, बाळा कांदळकर, ओंकार तेली आदींनी आपापल्या भागातील प्रश्न मांडताना विविध मागण्या केल्या. 

    बांबू अतिघन लागवड प्रस्तावाच्या अंमलबजावणीचा ठराव

जिल्हा कृषी विभागाने शासनाकडे पाठविलेल्या बांबू अतिघन लागवडीच्या प्रस्तावास शासनाने तात्काळ मंजुरी देऊन अंमलबजावणी करण्याचा ठराव सतीश सावंत यांनी मांडून आमदारांनी पाठपुरावा करावा, असे सांगितले. आमदार नाईक यांनी जिल्हय़ात बांबू लागवड अधिक व्हावी. शेतकऱयांचे उत्पन्न वाढावे, यासाठी आपण पाठपुरावा करून मंजुरी मिळवेन, असे सांगितले. ‘तरुण भारत’ने आजच अतिघन लागवड प्रस्ताव लालफितीत अडकला’ हे वृत्त प्रसिद्ध करून लक्ष वेधले होते. त्याचा आधार घेत ठराव मांडून अंमलबजावणीसाठी स्वतः पाठपुरावा करण्याचे अभिवचन नाईक यांनी दिले.

       काँग्रेस-भाजप कार्यकर्त्यांत शाब्दिक चकमक

महामार्ग आणि खड्डे यावर चर्चा सुरू असताना रणजीत देसाई व सतीश सावंत यांनी मंत्री येणार म्हणून खड्डे बुजविण्याचे काम सुरू आहे. ते 24 जूननंतर करा, असे सांगताना काल रात्री 9.30 वाजता पावसात खड्डे भरण्याचे काम सुरू होते, याकडे लक्ष वेधताच भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष राजू राऊळ यांनी त्याला आक्षेप घेत ती काँग्रेसचीच संस्कृती असल्याचे सांगताच काँग्रेस-भाजप कार्यकर्ते यांच्यात शाब्दिक चकमक झाली. आमदार नाईक यांनी मध्ये हस्तक्षेप करीत आपापसात चर्चा नको. व्यासपीठावर आम्ही आहोत. प्रश्न सोडविण्यास सक्षम आहोत, असे सांगत ‘आमसभा म्हणजे काय रे भाऊ?’ असा आजच्या ‘तरुण भारत’मध्ये लेख आहे. तो वाचा. चांगली माहिती आहे, असे सांगत यावर पडदा टाकला.

               आमदारांनी तहसीलदारांना सुनावले

आमसभा बरोबर 11.30 वाजता सुरू झाली. चर्चा सुरू असताना 11.50 वाजता तहसीलदार अजय घोळवे व्यासपीठावर आले. आमदारांनी त्यांना रोखत वाजले किती? असे विचारले असता, वाहतूक कोंडीत अडकलो, असे त्यांनी सांगितले. या उत्तराने आमदार भडकले. आम्ही त्याच वाहतुकीमधून आलो. यापुढे असे चालणार नाही, अशा शब्दांत सुनावले.