|Friday, October 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » आषाढीसाठी सोलापूरातून 200 गाडय़ा

आषाढीसाठी सोलापूरातून 200 गाडय़ा 

सोलापूर/ वार्ताहर

यंदाच्या आषाढी वारीसाठी राज्या मार्ग परिवहन विभागाच्यावतीने नियोजन करण्यात आले असून त्यामध्ये राज्यातून येणाऱया वारकऱयांसाठी गतवर्षीपेक्षा यंदा 200 गाडय़ांची वाढ केली आहे.

त्यानुसार यंदा पंढरपूरच्या पांडुरंगाचे दर्शन घेऊन परतणाऱया वारकऱयांसाठी 30 जून ते 9 जै या कालावधीत 3,500 गाडय़ांचे नियोजन केले आहे. त्यामध्ये सोलापूर विभागाकडून 200 गाडय़ा देण्यात येणार असल्याचे नियंत्रक श्रीनिवास जोशी यांनी सांगितले.

यंदाच्यावेळी भरपूर पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तविल्याने भाविकांची संख्या वाढणार हे निश्चितपणे गृहीत धरून राज्य मार्ग परिवहन विभागाकडून वारकऱयांच्या सेवेसाठी जादा बसेस सोडण्याचा निर्णय घेतला आहे. पुणे, नाशिकसह अन्य जिल्ह्य़ातून येणाऱया भाविकांच्या सेवेसाठी अतिरिक्त गाडय़ांची सोय करण्यात आली आहे. असे जोशी म्हणाले. त्याचबरोबर परराज्यातून आणि परजिल्ह्यातून पंढरपूर येथे श्री विठ्ठल माऊलींच्या दर्शनाला आलेल्या भाविकांना तुळजापूर येथील तुळजाभवानी, अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ आणि गाणगापूर येथील श्री दत्तगुरू यांच्या दर्शनाची सोय व्हावी, यासाठी स्वतंत्र बसेसची सोय करण्यात आली आहे.

पंढरपूर येथील भीमा, चंद्रभागा आणि विठ्ठल या तीन बसस्थानकांवर बसेस थांबवण्याची सोय करण्यात आली असून वारकऱयांना बसेस आणि वेळासंर्भात माहिती मिळावी यासाठी कर्मचारीही त्याठिकाणी नेमण्यात येणार आहेत. भीमा बसस्थानकावरून विदर्भ, कोकण, चंद्रभागा बसस्थानकावरून पुणे व मुंबई आणि विठ्ठल बसस्थानकावरून नाशिक या ठिकाण बसेस जातील अशी वारकऱयांसाठी सोय करण्यात आली आहे. तसेच प्रत्येक बसस्थानकावर वीज, पिण्याच्या पाण्याची आणि स्वच्छतेची सोय करण्यात येणार असल्याचे जोशी म्हणाले