|Wednesday, September 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » आरबीआय गव्हर्नरची देशातून हकालपट्टी करा

आरबीआय गव्हर्नरची देशातून हकालपट्टी करा 

वार्ताहर/ अथणी

राज्यातील काँग्रेस सरकारने शेतकऱयांच्या हिताचा विचार करुन विविध योजना राबविल्या आहेत. त्याचा फायदाही अनेक शेतकऱयांना झाला आहे. सध्या केँग्रेस सरकारने शेतकऱयांचे सहकारी संघातील असणारे 50 हजार रुपयांचे कर्ज माफ  करण्याचा निर्णय घेतला आहे. वास्तविक 1 लाख रुपये कर्ज माफी करण्याची मागणी आरबीआयकडे करण्यात आली होती. पण त्याला विरोध करत  राष्ट्रीयीकृत बँकेतून काढण्यात आलेले कर्ज माफ करता येत नाही असे उत्तर आरबीआय बँकेचे गव्हर्नर उर्जित पटेल यांनी दिले आहे. त्यामुळे शेतकऱयांच्या विरोधी असणाऱया गव्हर्नरची देशातून हकालपट्टी करण्यात यावी, अशी मागणी  निधर्मी जनता दलाचे राज्याध्यक्ष माजी मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी केली.

अथणी येथील निजदतर्फे शेतकऱयांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी काढण्यात आलेल्या मोर्चा प्रसंगी ते बोलत होते. यावेळी माजी मंत्री बंडय़ाप्पा काशापूर, श्रीमंत पाटील, उत्तम पाटील, श्रीनिवास पाटील, गिरीश भुटाळे, राजेंद्र ऐवाळे, अस्लम नालबंद व शेतकऱयाच्या उपस्थितीत तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.

बँका दिवाळखोर बनतील हा मतप्रवाह चुकीचा

कुमारस्वामी पुढे म्हणाले, देशात अन्य राज्यात शेतकऱयांचे कर्जमाफ करण्याविषयी निर्णय घेण्यात आला आहे. त्याचे सर्वच स्तरातून कौतुक करण्यात आले. तसा निर्णय कर्नाटक शासनाने घ्यावा अशी मागणी होत होती. त्याची दखल घेत काँग्रेस सरकारने प्रयत्न केले त्याला अंशतः यश आले आहे. कर्जमाफीच्या निर्णयातून शासकीय बँका दिवाळखोर बनतील असा चुकीचा मतप्रवाह निर्माण झाला आहे. तो पूर्णपणे चुकीचा आहे.

कर्जमाफीचा गांभीर्याने विचार करावा

एकीकडे केंद्र सरकार हजारो कोटी रुपयांचे कर्ज घेतलेल्या उद्योगपतींचे कर्ज माफ करते. तर देशाला अन्नाचा पुरवठा करणाऱया शेतकऱयांच्या कर्जमाफीबाबत चुकीचे धोरण अवलंबत आहे. ते पूर्णपणे चुकीचे आहे. शासनाने वास्तविक शेतकऱयांना प्रोत्साहन देण्यासाठी कर्जमाफीचा निर्णय घेणे योग्य आहे. त्यात दिशाभूल करणाऱयांविरोधात कारवाई करण्याची गरज आहे. शासनाने या मागणीचा गांभीर्याने विचार न केल्यास राज्यभरात आगामीकाळात तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा दिला.

यावेळी जेडीएस कोअर कमिटी सदस्य श्रीमंत पाटील म्हणाले, मायक्रो फायनान्स व स्वसाहाय्य संघांच्या माध्यमातून शेतकऱयांची लूट केली जात आहे. त्यामुळे कर्जदार शेतकऱयांनी सदर संघ व संस्थांचे कर्ज परत करू नये. सदर संघ व संस्थांनी कर्जदार शेतकऱयांचे कर्ज माफ करावे. अन्यथा आंदोलनाची तीव्रता वाढविण्यात येणार असल्याचा इशारा त्यांनी दिला. आंदोलनास आर. एम. पाटील, आयाज मास्टर, भूपाल कोळेकर, तुकाराम शेळके, आप्पया अगडी यांच्यासह तालुक्यातील 10 हजार शेतकरी बांधव उपस्थित होते.

आंदोलक रस्त्यावर तीन तास ठाण मांडून

तहसीलदार कार्यालयावर भव्य निषेध मोर्चा काढण्यात आला. शासनविरोधी निर्णयाचा निषेध करण्यात आला. शासनाने शेतकऱयांच्या हिताचा विचार करुन निर्णय घ्यावा. अशी मागणी यावेळी करण्यात आली. आंदोलकांनी यावेळी सुमारे तीन तास रास्तारोको केला.

वाहतूक व्यवस्था कोलमडली

शेतकऱयांच्या विविध मागण्या मान्य करण्यासाठी पुकारण्यात आलेल्या आंदोलनात परिसरातील हजारो शेतकऱयांनी सहभाग घेतला. सुमारे तीन तास रास्तारोको करण्यात आला. त्यामुळे मार्गावरील वाहतूक व्यवस्था कोलमडली होती. सुमारे दोन ते तीन किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. यावेळी सहभागी झालेल्या आंदोलकांमुळे या मोर्चाला चांगला प्रतिसाद लाभल्याचे दिसून आले.