|Sunday, November 17, 2019
You are here: Home » आवृत्ती » मुंबई » शेतकऱयांना तातडीने 10 हजाराचे कर्ज द्या

शेतकऱयांना तातडीने 10 हजाराचे कर्ज द्या 

प्रतिनिधी, मुंबई

राज्य सरकारने अडचणीत सापडलेल्या शेतकऱयांना मदत म्हणून 10 हजार रुपयांचे अग्रीम कर्ज देण्याचा निर्णय घेतला आहे. खरीप हंगाम तोंडावर असताना बँकांनी शासन आदेशातील निकषाकडे न पाहता शेतकऱयांना तातडीने 10 हजार रुपयांचे कर्ज वितरीत करण्याची प्रक्रिया सुरू करावी, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी येथे केले.

बँकांनी शेतकऱयांच्या कर्जाबाबत संवेदनशीलपणे कार्यवाही करावी. शेतकऱयांकडून केवळ स्वयंघोषणापत्र घेऊन 10 हजार रुपयांचा तातडीने कर्ज पुरवठा करावा. केलेल्या कर्ज पुरवठय़ाची माहिती सरकारकडे जमा केल्यानंतर बँकांना लगेच व्याजासह परतावा दिला जाईल, असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले.

खरीप हंगामात शेतकऱयांना खते, बियाणांची खरेदी करता यावी म्हणून सरकारने 10 हजार रुपये उचल देण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात जारी करण्यात आलेल्या 14 जूनच्या शासन आदेशावर आक्षेप नोंदवण्यात आल्यानंतर सरकारने 20 जूनला सुधारीत आदेश काढला. या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी ‘सहय़ाद्री’ अतिथीगृहावर राज्यस्तरीय बँकर्स समितीची विशेष बैठक पार पडली. या बैठकीत बोलताना फडणवीस म्हणाले, निर्णय

घेण्याच्या प्रक्रियेनंतर त्याची अंमलबजावणी त्याच गतीने होण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे या कर्जपुरवठय़ासाठी बँकांचा पुढाकार महत्त्वाचा आहे.

10 हजार रुपयांचे तातडीच्या मदत स्वरुपातील कर्ज हे प्रत्येक पीक कर्ज खाते असलेल्या शेतकऱयाच्या खात्यावर जमा करायचे आहे. 10 हजाराची रक्कम खूप अल्प असून सरकारची आर्थिक स्थिती मजबूत असल्याने बँकांना सरकारकडून ताबडतोब परतावा दिला जाईल, असेही फडणवीस यांनी सांगितले.

यावेळी आर्थिक स्थिती कमकुवत असलेल्या जिल्हा सहकारी बँकांना कर्ज वितरणासाठी राज्य सहकारी बँक पुनर्वित्तपुरवठा करेल, अशी माहिती राज्य बँकेच्यावतीने देण्यात आली. या बैठकीला महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर, सहकार मंत्री सुभाष देशमुख, वित्त राज्यमंत्री दीपक केसरकर आदी उपस्थित होते.

Related posts: