|Monday, September 23, 2019
You are here: Home » आवृत्ती » मुंबई » मुंबई मेट्रोचा विस्तार नवी मुंबईपर्यंत

मुंबई मेट्रोचा विस्तार नवी मुंबईपर्यंत 

प्रतिनिधी, मुंबई

मुंबईत मेट्रोचे जाळे विणत मुंबईतील वाहतूक व्यवस्था मजबूत करण्याचा प्रयत्न एमएमआरडीएकडून सुरू आहे. कुलाबा ते दहिसरपर्यंत तर वडाळ्यापासून ठाणे, कल्याण-भिवंडीपर्यंत मेट्रोने धाव घेतली आहे. आता ही मेट्रोची धाव नवी मुंबईपर्यंतही पोहोचणार आहे. कारण मेट्रो 8 म्हणजे मुंबई विमानतळ-मानखुर्द-नवी मुंबई विमानतळ या मेट्रो मार्गाचा सविस्तर आराखडा तयार करण्याचे काम दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशन (डीएमआरसी) कडून सुरू आहे. त्यानुसार, सप्टेंबरपर्यंत हा सविस्तर आराखडा पूर्ण करत मंजुरीसाठी ठेवण्यात येणार असल्याची माहिती एमएमआरडीएचे अतिरिक्त आयुक्त प्रविण दराडे यांनी दिली आहे.

मुंबईत सध्या मेट्रो 3 कुलाबा-वांद्रेöसीप्झ आणि मेट्रो 7 दहिसर ते अंधेरी मेट्रो मार्गाचे काम वेगात सुरू आहे. दहिसर ते मिरारोड असा मेट्रोचा विस्तारही करण्यात येणार आहे. तर वडाळा-घाटकोपरöठाणे-कासारवडवली या मेट्रो 4 चे काम येत्या 3ö4 महिन्यांत सुरू होण्याची शक्यता असून, ठाणे-भिवंडीöकल्याण मेट्रो मार्गही लवकरच मार्गी लागणार आहे. एकूणच मुंबई आणि ठाणे शहर मेट्रोने एकमेकांशी जोडत या दोन शहरांतील अंतर कमी केले जात आहे. त्याप्रमाणेच नवी मुंबईला जोडण्यासाठी छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ-मानखुर्द-नवी मुंबई विमानतळ या मेट्रो 8 चा डीपीआर (डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट), सविस्तर प्रकल्प आराखडा सप्टेंबरपर्यंत डीएमआरसीकडून पूर्ण करत मंजुरीसाठी ठेवण्यात येणार आहे.

एमएमआरडीएतील वरिष्ठ अधिकाऱयांनी दिलेल्या माहितीनुसार, मेट्रो 8 हा अंदाजे 35 किमीचा मार्ग असणार आहे. तर हा मार्ग अंशतः भुयारी आणि अंशत उन्नत असणार आहे. तर मेट्रो 3 आणि मेट्रो 7 या मेट्रो मार्गाशी हा जोडला जाणार आहे. त्यामुळे मुंबई विमानतळ ते नवी मुंबई विमानतळ असा प्रवास मेट्रोने शक्य होणार आहेच, पण त्याचवेळी नवी मुंबई ते कुलाबा आणि नवी मुंबई ते दहिसर असा प्रवासही शक्य होणार आहे. मेट्रो 8, मेट्रो 3 आणि मेट्रो 7 शी जोडली जाणार असल्यामुळे या प्रकल्पासाठी किती खर्च येईल? ही मार्गिका कशी असेल? आणि हा मार्ग कसा मार्गी लावला जाईल? हे सर्व सविस्तर आराखडा सादर झाल्यानंतरच स्पष्ट होईल.