|Sunday, September 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » मडगावातील ग्राहकांना चरस पुरविणाऱयास अटक

मडगावातील ग्राहकांना चरस पुरविणाऱयास अटक 

प्रतिनिधी /मडगाव :

मडगावातील ग्राहकांना चरस पुरवठा करणाऱया दवर्ली येथे राहणाऱया एका आरोपीला मडगाव पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून 279 ग्राम चरस जप्त करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या सविस्तर माहितीनुसार मडगाव पोलिसांनी मडगावात दोघांना संशयावरुन फौजदारी दंड संहितेच्या 41 कलमाखाली अटक केली होती. दवर्ली हावसिंग बोर्ड येथे राहणारा आसिफ इर्शाद सल्यानी (20) व दुसरा शौकीन सल्यानी. हे दोघे 24 तास पोलिसांच्या ताब्यात होते तेव्हा पोलिसांनी त्यांची चौकशी केली.

चौकशीत शौकीन सल्यानी हा आणखी गुन्ह्यात गुंतलेला नसल्याचे पोलिसांना आढळून आले. मात्र, आसिफ इर्शाद सल्यानी याची सखोल चौकशी केली तेव्हा आपण मडगावातील काही जणांना चरस पुरवितो अशी माहिती दिली. सध्या आपल्याकडे चरस असून आपण तो मडगावात अमूक ठिकाणी लपवून ठेवलेला आहे असाही या आरोपीने पोलिसांना धागा दिला.

त्याने दिलेल्या माहितीच्या आधारे पोलीस मडगावच्या जुन्या रेल्वे स्थानकाजवळील एका जागेकडे गेले. तेथे आरोपीने लपवून ठेवलेला चरस पोलिसांच्या स्वाधीन केला. पोलिसांनी वजन केले तेव्हा या चरसचे वजन 279 ग्राम इतके होते.

पोलीस निरीक्षक सी. एल. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अमीन नाईक यांनी आरोपी आसिफ इर्शाद सल्यानी याच्याविरुद्ध अमली पदार्थ विरोधी कायद्याच्या 20 (अ) (2) (ए) कलमाखाली गुन्हा नोंद केला असून या कायद्याखाली रितसर अटक केली आहे.