|Saturday, August 24, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » रत्नागिरी जिल्हा मजदूर संघाचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

रत्नागिरी जिल्हा मजदूर संघाचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा 

निती आयोगाचे पूनर्गठण करा, प्रलंबित योजना त्वरित चालू करण्याची मागणी

प्रतिनिधी /रत्नागिरी

तीन वर्षांपूर्वी केंद्रात नवीन सरकार सत्तारूढ झाल्यावर सरकारी धोरणे व कारभार यांची नव्याने मांडणी करताना मोदी सरकारने जुनी योजना आयोग गुंडाळून त्या जागी निती आयोग नावाची संस्था निर्माण केली. पण त्या आयोगाचे प्रत्यक्षात कोणतेही प्रत्यंतर येत नसल्याचा आरोप भारतीय मजदूर संघाने केला आहे. त्या निती आयोगाच्या पुनर्गठनाच्या मागणीसाठी येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर संघटनेने शुक्रवारी मोर्चा काढला.

गेल्या 3 वर्षात आयोगावरील नियुक्त केलेले तज्ञ भारतीय आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक पार्श्वभूमीबाबत पूर्णतः अनभिज्ञ असल्याचे म्हणणे आहे. त्यांच्या सूचना, मार्गदर्शक सूत्रांमुळे देशाच्या प्रगतीला गती मिळण्याऐवजी सरकार व जनता यांच्यात संघर्षाचे प्रसंग निर्माण होत आहेत. देशातील कामगार कायद्यातील सुधारणा हा विषय गेली अनेक वर्षे रखडण्यामागे हेच कारण आहे. कामगारविरोधी, श्रमिकविरोधी चित्र देशात निर्माण झाले आहे. यासाठी निती आयोगाकडून चुकीची मार्गदर्शक मिळणारी सूत्रे हेच कारण असल्याचे मजदूर संघाचे म्हणणे आहे.

नुकतीच भविष्यनिर्वाह निधीवरील कामगारांच्या व पर्यायाने मालकांच्या किंवा व्यवस्थापनाच्या अंशदानात कपात करण्याची सूचना हा आर्थिक टँककडूनच आली होती. मात्र मालक-व्यवस्थापनाच्या प्रतिनिधींनी विरोध केल्यामुळे ती फेटाळली गेली. आता यामुळे कामगार क्षेत्रात असंतोष व संघर्षाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे राज्यभर पुकारण्यात आलेल्या आंदोलनाचा भाग म्हणून रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयावरही रत्नागिरी जिल्हा भारतीय मजदूर संघाच्यावतीने मोर्चा काढण्यात आला. त्यामध्ये घरेलू कामगार संघही सहभागी झाला होता. या बाबतचे जिल्हा प्रशासनाला संघाच्यावतीने निवेदन देण्यात आले. या मोर्चात भारतीय मजदूर संघाच्या जिल्हा सचिव संजना वाडकर, कार्याध्यक्ष नरेंद्र बांदिवडेकर, अध्यक्ष पांडुरंग पाखरे, सचिव निखिल पवार, सदस्य परशुराम नाचणकर, अरवेंद सावंत, अनिल मोहिते, संजय कांबळे, धर्मनाथ गिजबिले, योगेश नैकर व घरेलू महिला कामगारांसह बांधकाम कामगार मोठय़ा संख्येने उपस्थित होते.