|Thursday, January 23, 2020
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » मनोरूग्णालय जागेतील अतिक्रमण हटवले

मनोरूग्णालय जागेतील अतिक्रमण हटवले 

15 वर्षे ठिय्या मांडलेल्या मुर्तीकाराची हकालपट्टी

सरकारी कर्मचाऱयाचीच होती अनधिकृत शेड

शहर पोलीसांच्या सहकार्याने मोहीम पुर्ण

वैद्यकीय अधीक्षक डॉ. विलास भैलुमे यांची माहिती

 

प्रतिनिधी /रत्नागिरी

प्रादेशिक मनोरूग्णालयाच्या मागील बाजूस गेल्या 15 वर्षाहून अधिक काळ अनधिकृतपण ठिय्या मांडून बसलेल्या एका व्यावसायिकाची हकालपट्टी करण्यात आली आहे. पोलिसांच्या मदतीने शुक्रवारी हे अतिक्रमण हटविण्यात आले आहे. विशेष म्हणजे सरकारी जागेत अतिक्रमण करणारा हा व्यावसायिक स्वतः एक सरकारी कर्मचारीच असून या शेडमध्ये मूर्त्या बनविण्याचे काम करत होता. अनेक वेळा सांगूनही हा व्यावसायिक जागा सोडण्यास तयार नव्हता त्यामुळे न्यायालयीन अनुमतीने पोलीसांच्या सहकार्याने ही कारवाई करण्यात आल्याची माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ. विलास भैलुमे यांनी दिली.

सुधीर मकवाना असे अतिक्रमण करणाऱया या व्यावसायिकाचे नाव असून त्यांच्या कुटुंबातील सदस्य मनोरूग्णालयात कर्मचारी म्हणून कार्यरत होते. याच ओळखीच्या जोरावर सुमारे 15 वर्षापासून अनधिकृतपणे मनोरूग्णालयाच्या मागच्या बाजूला मूर्त्या बनविण्याची शेड टाकली होती. धक्कादायक बाब म्हणजे मनोग्णालयाच्या मालकीच्या या सरकारी जागेवर अतिक्रमण करणारे सुधीर मकवाना हे स्वतः सरकारी नोकरीत कार्यरत आहेत. यापुर्वी ही शेड हटविण्याबाबत वारंवार सूचना देऊनही त्यांनी दुर्लक्ष केले होते. त्यानंतर मनोरूग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. भैलुमे यांनी न्यायालयीन प्रक्रियेव्दारे कायदेशीर मार्गाने हे अतिक्रमण हटविले. गुरूवारी पोलीसांच्या मदतीने ही कारवाई करण्यात आली.

डॉ. भैलुमेंचा कणखरपणा

गेल्या 15 वर्षांहून अधिक काळ सरकारी जागेत ठाण मांडून बसलेल्या या व्यावसायिकांच्या धाडसाबद्दल व त्याच्यावर कारवाई करण्याचे धाडस न दाखवणाऱया अधिकाऱयांबाबत रूग्णालय परिसरात चर्चा रंगली आहे. ही कारवाई यापुर्वीच व्हायला हवी होती, मात्र आज झालेली कारवाई योग्यच आहे. डॉ. भैलुमे यांनी कायदेशीर मार्गाचा अवलंबन करून केलेल्या या कारवाईचे व त्यांच्या कणखरपणाचे कौतुक होत आहे.

Related posts: