|Wednesday, September 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » हजारो पर्यटकांनी आंबोली चिंब

हजारो पर्यटकांनी आंबोली चिंब 

आंबोली : आंबोलीत वर्षा पर्यटनाला आठवडाभरापूर्वी प्रारंभ झाला असला तरी या रविवारी आंबोली पर्यटकांनी बहरली. धुक्यात हरवलेली आंबोली डोळय़ात साठविण्यासाठी हजारो पर्यटक येथे दाखल झाले होते. पर्यटकांच्या गर्दीमुळे दुपारनंतर वाहतूक कोंडी झाली. सलग तीन दिवस आलेल्या सुट्टय़ांमुळे येथील सर्वच लॉज बुक आहेत.

गेल्या रविवारी भारत-पाक एकदिवशीय सामन्यामुळे पर्यटकांनी पाठ फिरवली होती. मात्र, या रविवारी गर्दी केली. पर्यटकांच्या उसळलेल्या गर्दीमुळे आणि पोलिसांचे योग्य नियोजन नसल्यामुळे दुपारनंतर वाहतूक कोंडी झाली. पर्यटकांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. सोमवारी रमजान ईदची सुट्टी आल्यामुळे येथील सर्व हॉटेल, लॉजिंग हाऊसफुल्ल आहेत. यंदापासून वनविभाग आणि पारपोली ग्रामपंचायतीने पर्यटन करवसुलीचा निर्णय घेतला होता. त्याची अंमलबजावणीही सुरू होती.

पर्यटकांनी येथे शनिवारपासूनच हजेरी लावण्यास सुरुवात केली. सलग तीन दिवस सुट्टी असल्याने बेळगाव, कोल्हापूर, गोवा आदी भागातील पर्यटकांची पावले आंबोलीकडे वळू लागली. रविवारी दुपारपर्यंत तोबा गर्दी झाली. रविवार सकाळपासून पावसानेही जोर धरला. त्यामुळे घाटातील धबधबे प्रवाही झाले. त्याखाली पर्यटकांनी मनमुराद आनंद लुटला. घाटात जिकडे-तिकडे पर्यटक दिसत होते. त्याशिवाय हिरण्यकेशी, कावळेसाद पॉईंट, सनसेट, शिरगावकर पॉईंटवर गर्दी होती. गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस बंदोबस्त होता. परंतु योग्य नियोजन नसल्याने वाहतूक कोंडीचे प्रकार दुपारनंतर घडले. पोलिसांनी वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न केले.