|Tuesday, February 18, 2020
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » अन्न व आंतरिक शोध

अन्न व आंतरिक शोध 

चलनवलन हा प्रत्येक सजीवाचा गुणधर्मच आहे. कोणत्याही हालचालीसाठी ऊर्जा आवश्यक असते. व ही ऊर्जा सजीव अन्नातून मिळवत असतात. प्रत्येक सजीवाची अन्नाची गरज त्याच्या चयापचय क्रियेच्या गतीवर अवलंबून असते. बर्फाळ प्रदेशातील अस्वले हिवाळ्यात शंभर दिवसांपर्यंत अन्नाशिवाय राहू शकतात, तर उंट हा प्राणी सुमारे चाळीस दिवस अन्नाशिवाय जगू शकतो; त्याच्या पाठीवर उंचवटय़ात अतिरिक्त चरबी साठवलेली असते जिच्यातून अन्नाअभावी त्याची ऊर्जेची गरज भागते. याउलट हमिंगबर्ड हा पक्षी त्याच्या वजनाच्या दुप्पट अन्न रोज खात असतो. त्याचे हृदय एका सेकंदात वीस वेळा स्पंदित होत असते. (माणसाचे हृदय पाच सेकंदात सहा वेळा स्पंदित होते) व त्याच्या पंखांची दर सेकंदाला ऐंशी वेळा उघडझाप होत असते. प्रत्येक सजीवाच्या अन्नाचे स्वरुप त्याच्या प्रजातीनुरुप वेगवेगळे असते. काही सजीव फक्त प्राणीजन्य पदार्थ खातात तर काही फक्त वनस्पतीजन्य तर काही दोन्ही प्रकारचे पदार्थ खाऊ शकतात.

मनुष्यालादेखील ऊर्जेसाठी अन्नाची आवश्यकता भासते जी त्याला भुकेच्या स्वरुपात जाणवते. भूक लागल्यावर आवश्यकतेप्रमाणे योग्य ते अन्न खाणे हे स्वाभाविकच आहे. माणसाला अन्नासाठी  वनस्पती व प्राणी मिळून असंख्य पर्याय उपलब्ध आहेत, परंतु मानवाने या बाबतीत स्वत:साठी एक सीमा निर्धारित केली आहे. तो प्राण्यांना मारून त्यांचे मांस खाऊ शकतो परंतु अन्नासाठी अन्य मानवाची हत्या करणार नाही. माणसाने शाकाहारी असावे, की मांसाहारी यासंबंधी अनेक परस्पराविरोधी युक्तिवाद केले जातात. काहीजण असे मानतात, की या पृथ्वीवरील सर्व प्राणी माणसाच्या आहारासाठी बनवण्यात आले आहेत; पण त्यांच्या हे लक्षात येत नाही, की जेव्हा मनुष्य अस्तित्वातदेखील नव्हता तेव्हा हे प्राणी कोणाच्या आहारासाठी अस्तित्वात होते?

शाकाहाराचे समर्थन करणारे मांसाहार हा मानवासाठी कसा अयोग्य आहे हे वेगवेगळ्या निकषांद्वारे सिद्ध करण्याचा प्रयत्न करतात. मनुष्य हा मुळात शाकाहारी, की मांसाहारी? माणसाला जेव्हा शेतीची माहिती नव्हती तेव्हा तो शिकार करून अन्न मिळवायचा. परंतु शिकारीसाठी हत्यारांची आवश्यकता असते व दगडापासून हत्यारे बनवण्याची कला मनुष्य खूप उशिरा म्हणजे अश्मयुगात शिकला. त्याआधी त्याला कंदमुळे, फळे यावरच जगणे भाग होते. काहीजण वैद्यकशास्त्राचा आधार घेऊन मानवी पचनसंस्थेची रचना ही शाकाहारी अन्नासाठी कशी योग्य आहे हे सिद्ध करण्याचा प्रयत्न करतात. त्यांच्या म्हणण्यानुसार वाघसिंहांप्रमाणे केवळ मांस खाऊन मनुष्य अगदी अल्प काळच जगू शकतो; उलट नुसतीच कंदमुळे व फळे खाऊन मनुष्य दीर्घ काळ जगू शकतो. आर्थिकदृष्टय़ादेखील मांसाहार हा शाकाहारपेक्षा अधिक महाग आहे. जात्याच शाकाहारी असलेल्या प्राण्यांना नियमितपणे मांस खाऊ घातल्यास काय होते याचा प्रत्यय इंग्लंडमध्ये मॅड-काऊ-डिसीजच्या स्वरुपात बघायला मिळाला. नैतिकदृष्टय़ा मांसाहार हा माणसाच्या वागण्यात परस्पराविरोध आणतो. एकीकडे कुत्र्यामांजरांसारख्या पाळीव प्राण्यांचे वाट्टेल ते लाड करणारी व प्राण्यांच्या कल्याणासाठी लढणारी माणसे बकऱया, कोंबडय़ा, गायी व गुरे यासारख्या प्राण्यांची हत्या करून खुशाल त्यांचे मांस आवडीने खात असतात. मांसाहाराचे समर्थन करणारे लोक शाकाहारी व्यक्तींवर वनस्पतींच्या हत्येचा आरोप करतात.

योग्य अन्न कोणते?

मनुष्य त्याचे जीवन शारीरिक पातळीवर कमी व मानसशास्त्रीय पातळीवर अधिक जगत असतो. मानसशास्त्रीय पातळीवर माणसाच्या आवडी-निवडी शारीरिक आवश्यकतेशी मिळत्याजुळत्या असतीलच असे नाही. अन्नाच्या बाबतीत शारीरिक पातळीवर हा निकष असतो तर मानसशास्त्रीय पातळीवर चव, आवड-नावड, जिव्हासौख्य आणि सवय हा निकष असतो. धूम्रपान, मद्यपान, अमली पदार्थांचे सेवन हे अनारोग्यकारक असूनदेखील केवळ व्यसनापोटी मनुष्य त्यांचा अतिरेक करत असतो. एखादा पदार्थ आवडला म्हणून आवश्यकता नसतानादेखील आपण त्याचे अतिसेवन करतो किंवा तेलकट तिखट व मसालेदार पदार्थ आपल्या शरीराला मानवत नसतानादेखील आपण ते आवडीने खात असतो.

मानवी जीवनाचे सार्थक त्याच्यातील सूक्ष्मातिसूक्ष्म स्तरांवरील अस्तित्वाचा शोध घेऊन त्यातील संभावनाचे उन्मीलन होण्यात आहे. त्यासाठी मनुष्याला सातत्याने आंतरिक शोध घेऊन स्वत:चा बोध करून घेणे आवश्यक आहे. प्रत्येक मनुष्य आपल्या संवेदनक्षमतेनुसार त्या त्या स्तरावरील जीवन जगत असतो. संवेदनक्षमतेच्या पलीकडे असलेल्या गोष्टी त्याच्या जीवनावर परिणाम करत असल्या तरी तो त्या संवेदू शकत नाही. म्हणून कोणत्याही परिस्थितीत त्याचा प्रतिसाद अपुराच असतो व परिस्थितीचे निराकरण करण्यास असमर्थ असतो. यातूनच अपूर्ण अनुभवांच्या स्मृतीचे ओझे माणसाच्या मेंदूत साठू लागते व त्याचे जीवन प्रभावित करू लागते. जीवनाच्या समग्र आकलनासाठी संवेदनक्षमता अत्यावश्यक आहे. त्यामुळे संवेदनक्षमतेच्या आड येणारी कोणतीही कृती ही अयोग्यच म्हणावी लागेल. आपण जेव्हा खाण्यापिण्याचा अतिरेक करतो तेव्हा आपण असंवेदनक्षम होतो. अयोग्य आहार, धूम्रपान, मद्यपान यामुळे आपले शरीर बोजड होते, त्यात तरलता उरत नाही. ते असंवेदनक्षम होते, त्यातील अवधानाची गुणवत्ताच बोथट होते. शरीराच जर बोथट व जड असेल, तर मन संवेदनक्षम, सावध व स्पष्ट कसे असू शकेल ?

ध्यानासाठी शांत मनाची आवश्यकता असते असे म्हणतात परंतु मन हे पूर्णपणे शांत कसे ठेवायचे? काहीजण सांगतात, योग्य प्रकारे दीर्घ श्वास घ्या म्हणजे तुमच्या रक्तात अधिक प्राणवायू मिसळेल. एक संकुचित, क्षुद्र मन दिवसेंदिवस दीर्घ श्वास घेऊन बऱयापैकी शांत होऊ शकते, परंतु तरीही ते एक संकुचित क्षुद्र मनच असते. योग म्हणजे केवळ शरीर निरोगी ठेवण्यासाठी केलेले व्यायाम नव्हेत, तर योग म्हणजे कृतीशील कौशल्य, त्यात मग योग्य आहार पण येतो. शरीर निरोगी, शक्तीशाली व संवेदनक्षम ठेवण्यासाठी योग्य अन्नग्रहण गरजेचे आहे. शरीरात मृत पशुपक्ष्यांचे भरपूर मांस कोंबून कृतीशील कौशल्य कसे येणार? सुप्रसिद्ध तत्वचिंतक जे. कृष्णमूर्ती कोणी काय केले पाहिजे हे कधीच सांगत नसत. उलट काय केले पाहिजे हे ज्याचे त्याने आपली बुद्धी वापरून शोधून काढले पाहिजे असा त्यांचा आग्रह असे. एकदा त्यांनी खाण्यापिण्याच्या संदर्भात वीस मार्गदर्शक सूचना केल्या. लोकांनी त्या लगेच उत्साहाने तंतोतंत अमलात आणल्या. परंतु त्याचा काही लोकांना त्रास झाला. म्हणून त्यांनी कृष्णमूर्तीकडे तक्रार केली. त्यावर ते म्हणाले, की तुम्ही शेवटची सूचना पाळली नाही. आणि शेवटची सूचना होती : तुमचा कॉमन सेन्स (विवेकबुद्धी) वापरा. मनुष्य जर जागरूकपणे आहाराच्या परिणामांचे अवलोकन करेल, तर आहाराच्या योग्यायोग्यतेची जाण त्याच्यात विकसित होईल व तो योग्य तेच अन्न खाऊ लागेल.

Related posts: