|Friday, August 23, 2019
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » काजव्यांचे झुंबर डुले

काजव्यांचे झुंबर डुले 

आकाशातील दिशा सांगणाऱया सप्तर्षींप्रमाणे शुभ्ा्र चमकणारे… नुकत्याच नांगरणी केलेल्या शेतातील मातीवर पिवळसर पुष्कराज रत्नांप्रमाणे विखुरणारे… झाडांच्या पानांवर पाचूंसारखे भासणारे… तर कधी रात्रीच्या अंधारात धुक्यालाही न जुमानता मिणमिणारे… अशा असंख्य काजव्यांचा पाठशिवणीचा खेळ सध्या भंडारदरा येथील निसर्गरम्य ठिकाणी रंगला आहे. पर्यटकांची हजारो पाऊल सध्या या खोऱयात रात्रीअपरात्री फिरताना दिसतात. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ आणि येथील स्थानिकांच्या सहकार्याने निसर्गप्रेमींना निसर्गाचे विलोभनीय रुप दाखवत आहेत. असा प्रयोग कोकणातही होऊ शकतो…

रात्रीचे दहा वाजलेले. भंडारदरा येथील एका टेकडीवरील एमटीडीसीच्या निवासस्थानापासून आठ ते दहा किमी अंतरावर मूतखेल गावातील दऱयांमधील झाडे, झुडपे असंख्य प्रकाशाने लखलखत होती. या मिणमिणत्या उडणाऱया दिव्यांना स्पर्श करण्यासाठी शेकडो पर्यटक दऱयाखोऱया तुडवत आहेत. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या काजवा महोत्सवाचे निमित्त ठरत आहे. 20 मे पासून जुलैच्या मध्यापर्यंत या परिसरात निसर्गाचे चमत्कार असाच अनुभवयास मिळणार आहे.

सध्या सुरू असलेल्या या काजवा महोत्सवात मुंबई-पुण्यातील असंख्य पर्यटकांची रेलचेल सुरू झाली आहे. वळवाच्या पावसाने ओल्या शेतातील मफद्गंध अद्यापही भंडारदऱयाच्या खोऱयांत दरवळत आहे. झाडांच्या ओल्या सालींचा कडवट वासही वातावरणाला तजेला देणारा आहे. त्यात मिणमिणाऱया काजव्यांनी झाडी, झुडपे नैसर्गिक रोषणाईने लखलखत आहेत. आता पाऊस होणार असा सांगावा घेऊनच काजवा वातावरणात रुंजी घालत असतो. कोणताही आवाज न करता, विषारी द्रव्याने दंश न करता भिरणारा या किटक स्वानंदाची आत्माभुती देणं एवढंच ठाऊक आहे.

पावसाचे आणि काजव्याचे नाते दृढ असल्याचेही निसर्ग सांगतो. कोणी म्हणतं हा त्यांचा प्रजननाचा काळ तर कोणी म्हणत की पाऊसप्रमाणे सांगायलाच ते या कालावधीत फिरतात. पौर्णिमा असूनही चंद्र प्रकाशामुळे झाडांच्या सावळीत हे काजवे अधिक प्रकाशमान होताना दिसतात. निसर्ग दिसतोय तसाच डोळ्यांनी टिपा. काजव्यांचे प्रकाशमान होणे पॅमेऱयात टिपण्याचा प्रयत्न टाळल्यास अधिक बरे. फोटोफ्रेममध्ये न येता नकाराचा संदेश देण्यास तो कचरत नाही. प्रत्येक झाड चमकणारे दिसते. तर कुठे विद्युत रोषणाईच्या माळेप्रमाणे उघडझाप होऊन गायब होणारे काजव्यांचे थवे डोळ्यासमोर अदृश्य होतात. त्यामुळे पर्यटकांची लगबग जोमाने सुरू होते. काजव्यांना अनुभवताना नुकत्याच झालेल्या पेरणीच्या शेतालाही विसरून चालत नाही. मध्येच कुठल्यातरी बेहडय़ाच्या झाडावर काजव्यांचा लखलखाट होतो आणि क्षणात विरून जातो. किर्र झाडीतील अंधार, ढगाळ आकाश आणि खोऱयात घोंगावणारा बोचऱया वाऱयामुळे काजव्याचा ठाव घेण्यास मन पेटून उठते.

प्रजननकाळ आणि पावसाच्या कुंद वातावरणात काजवा दिसतो. मात्र, मे महिन्याआधी आणि जुलै महिन्यानंतर त्यांचे प्रमाण कमी होऊन काजवे कुठे जातात याचे उत्तर कोणाकडे सापडत नाहीत. पाभरगडाच्या पश्चिमेला दरीत काजव्यांना शोधावे लागत नाही. हिरडा, बेहडा, सादडा, जांभूळ, आंबा, उंबर या झाडांवर काजव्यांची रोषणाई सुरू असते. या झाडांच्या सालीची ठेवण, दर्प आणि अन्न यामुळे या झाडांवर काजवे आढळतात, असे येथील स्थानिक गाईड शिवाजी खाडे सांगतात. निसर्गवैभव पाहत असतानाच पुढील दरीपासून गाईड सावध होण्याचे भान ही देतो. भंडारदरा परिसरात बारा गड, आदिवासी परिसर, प्रवरा नदीवरील भंडारदरा
डॅम, वॉटरफॉल काजव्यांच्या प्रकाशात लखलखतात. आणि पर्यटकांनाही आकर्षित करतात.

काजवा महोत्सवाला कोकणातही वाव

अहमदनगर जिह्यातील भंडारदऱयातील काजवा महोत्सव जगप्रसिद्ध होण्याच्या मार्गावर आहे. येथील निसर्ग संपन्नता आणि प्राचीन मंदिरे अधिक आकर्षित करणारी आहेत. त्याच धर्तीवर कोकणातील जैवविविधता, निसर्ग विपुलतेने कोकणातही काजवा महोत्सवाला वाव आहे. कणकवली तालुक्यातील सह्याद्रीच्या पर्वतरांगामधील फोंडा परिसर, नांदोसचा सडा, सावडावचा धबधबा, मधु मंगेश कर्णिकांच्या करुळातील व्हाळ, साकेडीतील दऱया या परिसरात याच काळात काजव्यांचे असंख्य झुंबरे झुलताना आढळतात. कोकणातील काजवा महोत्सवाने येथीलही तरुणांना रोजगाराची संधी मिळू शकते. काजवा महोत्सवासाठी केशव खाडेप्रमाणे स्थानिक तरुणांचा पुढाकार फार महत्त्वाचा ठरत असल्याचे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या अधिकाऱयाने सांगितले. कोकणातील निसर्ग सौंदर्य पर्यटनाला अधिक वाव देणारे आहे.

काजवा महोत्सवाने रोजगारही

 

भंडारदरा येथे राहणाऱया केशव खाडे यांनी काजव्याच्या निरीक्षणासाठी प्रोत्साहन दिले. केशवच्या संकल्पनेने आकार घेतल्याने महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळानेही खाडे यांना सहकार्य केले. त्यामुळे या परिसरात पर्यटनाला अधिक वाव मिळाला आहे. महाविद्यालयात जाणाऱया तरुणांना रोजगाराचे नवीन दालन यामुळे उघडले. त्यामुळेच शिवाजी खाडेसारखे तरुण गाईडच्या व्यवसायात रमताना दिसत आहेत. ‘शाळेत जाताना 20 रुपयाच्या वह्यांसाठी घरात भांडावं लागायचं’ असे शिवाजी सांगतो. शिवाजी आता 20 वर्षाचा आहे. बारावीपर्यंत विज्ञान विषयात शिक्षण घेऊन गाईडच काम करता करता पुढील शिक्षणाचाही तो विचार करत आहे.

कोलटेंबे आणि मुतखेल यागावात रात्री काजव्यांना बघायला जाताना शिवाजी सराईताप्रमाणे दरीत फिरत होता. ‘सांभाळून पुढे घळ आहे… त्या झाडाला हात लावू नका… तिथे काजव्यांचं घर आहे…’ अशा अनेक सुचना शिवाजी पर्यटकांना देतो. भंडारदरा आणि आजूबाजूच्या परिसरातील शिकलेले तरुण गाईडचं काम सहज करू शकतात. दिवसाला 300 रुपये मिळत असल्याचे येथील गाईड सांगतात. सार्वजनिक सुट्टी आणि शनिवार-रविवारी भंडारदऱयात पाचशे ते 1000 गाडय़ांमधून पर्यटक येत असल्याचा अंदाज शिवाजी व्यक्त करतो. ‘तेवढंच हाताला काम आणि डोक्याला ज्ञान’ असे शिवाजीच म्हणणं. लहानपणी दिसणारा हा किडा जीवनात असा प्रकाश टाकेल याची कल्पना शिवाजीला नव्हती. मात्र, काजव्यांचा हा प्रकाश अडीच दिवसांहून अधिक नसल्याचे भानही शिवाजीला आहे. तुर्तास शिवाजीसारखे अनेक तरुण आणि लाखो काजवे भंडारदऱयाच्या दरीत रात्रीअपरात्री मिणमिणताना दिसत आहे. काजवा आणि येथील तरुण या दोघांना सध्या तरी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाची साथ आहे. पुढे त्यांना त्यांची प्रगती स्वत:च करायची आहे…..