|Monday, September 16, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » काश्मीरमधील पोलीस कर्मचाऱयांना इशारा

काश्मीरमधील पोलीस कर्मचाऱयांना इशारा 

सार्वजनिक स्थळी प्रार्थना करणे टाळावे

वृत्तसंस्था/ श्रीनगर

जामिया मशिदीबाहेर सुरक्षेत तैनात पोलीस उपअधीक्षक मोहम्मद अयूब पंडित यांची शुक्रवारी जमावाकडून ठेचून हत्या झाल्याच्या घटनेनंतर जम्मू-काश्मीर पोलिसांनी आपल्या कर्मचाऱयांची सुरक्षा पाहता त्यांना खबरदारी बाळगण्यास सांगितले आहे. सार्वजनिक स्थळांवर ईदची प्रार्थना करणे टाळावे अशी सूचना या कर्मचाऱयांना करण्यात आली आहे. जिल्हा पोलीस लाईन किंवा सुरक्षित मशिदीत प्रार्थना करण्याचा सल्लाही देण्यात आला.

पोलीस दलाद्वारे देण्यात आलेल्या सूचनेत सर्व पोलीस स्थानकांचा समावेश करण्यात आला आहे. याशिवाय राज्य पोलीस दलाच्या सर्व शाखा, लष्कराचे पथक, आयटीबीपी, एसएसबी, सीआरपीएफ, बीएसएफ आणि सीआयएसएफच्या जवानांना देखील अशीच सूचना करण्यात आली आहे.

महासंचालकांच्या वतीने पोलीस नियंत्रण कक्षाने ही इशारावजा सूचना जारी केली आहे. कमी गर्दीच्या मशिदीत किंवा ईदगाहमध्ये प्रार्थना न करण्याचा सल्ला देण्यात येत असल्याचे या कर्मचाऱयांना सांगण्यात आले आहे. यात सर्व कर्मचाऱयांना जिल्हा पोलीस लाईन किंवा पीसीआर काश्मीरमध्ये प्रार्थना करण्याची सूचना करण्यात आली आहे.

खबरदारी बाळगणे योग्य असून सर्व कर्मचाऱयांना मी आपले मानतो असे पोलीस महासंचालक एस.पी. वैद्य यांनी सांगितले आहे. शुक्रवारी श्रीनगरच्या जामिया मशिदीबाहेर तैनात डीएसपी पंडित यांची जमावाने मारहाण करत हत्या केली होती.

अयूब हे मशिदीबाहेरील जमावाद्वारे पाकसमर्थनार्थ दिल्या जाणाऱया घोषणांचे चित्रण करत होते. जमावाने त्यांना हेरयंत्रणेचा हस्तक मानत त्यांच्यावर हल्ला केला होता.