|Tuesday, January 28, 2020
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » तवसाळ गावात समुद्राचे अतिक्रमण!

तवसाळ गावात समुद्राचे अतिक्रमण! 

वार्ताहर/ तवसाळ

गुहागर तालुक्यातील तवसाळ गावामध्ये समुद्राचे अतिक्रमण झाले आहे. समुद्राला आलेल्या उधाणामुळे भरतीचे पाणी शेतात व अनेक घरांमध्ये घुसल्याने परिसरातील अनेक घरे तसेच शेती व बागायतीला धोका निर्माण झाला आहे. यामुळे ग्रामस्थ चिंतेत आहेत. निवासी घरे, शेती व बागायतीच्या सुरक्षिततेसाठी खारलॅण्ड विभाग, पतन विभाग व महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाने तातडीने उपाययोजना करावी, अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे.

  समुद्राला वर्षातून साधारणत: जून ते डिसेंबर महिन्यामध्ये उधाणाची भरती येते. मात्र यावेळी आलेली भरती मोठय़ा स्वरूपाची असून या भरतीचे पाणी तवसाळ गावातील मळय़ाच्या शेतीमध्ये व जगदीश गडदे, संकेत जोष्टे, गणेश पडय़ाळ यांच्या घर परिसरात, तर विश्वनाथ सुर्वे, अनिल सुर्वे, विलास सुर्वे, सुदेश सुर्वे, एकनाथ गडदे, प्रकाश सुर्वे, अशोक पडय़ाळ, प्रदीप सुर्वे, किसन पडय़ाळ, श्रीकांत मिसाळ, जयश्री गडदे, गजानन सुर्वे, मधुकर सुर्वे यांच्या नारळी-पोफळीच्या बागेमध्ये घुसले आहे. पावसाचे प्रमाण अत्यल्प असल्याने या समुद्राच्या भरतीच्या उधाणाचा धोका काही अंशी कमी झाला आहे.

भविष्यात धोका

  भविष्यात समुद्राच्या भरतीचे पाणी असेच वाढत राहिल्यास गावातील मळय़ाची सुपीक शेती नापीक होणार असून निवासी घरांना यामुळे कायमस्वरूपी धोका निर्माण होणार आहे. तवसाळ गावाच्या समोरील नव्याने समुद्रात भराव करून उभारण्यात येत असलेल्या जिंदल कंपनीच्या बंधारा व जेटींमुळे समुद्राच्या भरतीचे पाणी गावात शिरकाव करत असल्याचा आरोप यथील ग्रामस्थांनी केला आहे. याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची आवश्यकता असून बाधित ग्रामस्थांना भविष्यात स्थलांतराशिवाय पर्याय असणार नाही.

वाहतूक थांबवली!

  या उधाणाच्या भरतीचा फटका गावातील वरच्या भागालासुद्धा बसला असून श्रीमती निलम रमेश सुर्वे यांच्या घराजवळ नव्याने जिल्हा परिषदेच्यावतीने तयार करण्यात आलेल्या रस्त्यावर भरतीचे पाणी भरले आहे. त्यामुळे मोहल्ला व गावातील वाहतूक थांबवण्यात आली होती. वरच्या भागात असणाऱया बागायतीमध्येही हे पाणी शिरले होते, तर मोहल्ल्यामधील घरांजवळ पाण्याची पातळी वाढून गावातील दर्ग्याचा बहुतांशी भाग समुद्राच्या भरतीच्या पाण्याखाली गेला होता.

बंधाऱयाचा विषय लांबणीवर

  खारलॅण्ड विभागामार्फत गेली 10 वर्षे यासाठी बंधाऱयाचा विषय माजी उपसरपंच नीलेश सुर्वे यांच्या माध्यमातून सुरू असून अधिकारी मात्र निकष पुढे करत बंधाऱयाचा विषय लांबणीवर टाकत आहेत. तरी भरतीच्या पाण्याविषयी व शेती, निवासी घरांच्या सुरक्षिततेसाठी खारलॅण्ड विभाग, पतन विभाग, महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड यांनी एकत्रितपणे यावर तातडीने उपाययोजना करावी, अशी मागणी चिंताग्रस्त ग्रामस्थांतून होत आहे.

 

Related posts: