|Sunday, March 29, 2020
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » वैभववाडीत सात दुकाने फोडली

वैभववाडीत सात दुकाने फोडली 

वैभववाडी : रविवारी रात्री वीज गेल्याने अंधाराचा फायदा घेत चोरटय़ांनी वैभववाडी बाजारपेठेतील बसस्थानकासमोरील गौरव कॉम्प्लेक्समधील सात दुकाने फोडली. या चोरीत चोरटय़ांनी पत्र्याची शटर्स तोडून सुमारे 13 हजार रुपयांच्या रोख रकमेसह काही साहित्याची चोरी केली. सोमवारी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला.

दरम्यान, रात्री पायी गस्त घालणाऱया पोलिसांना शटरचा आवाज आला. पोलीस या कॉम्प्लेक्समध्ये जाताना चोरटय़ांना चाहूल लागताच त्यांनी पलायन केले. या घटनेमुळे जिल्हय़ातील चोऱयांचे सत्र अद्यापही थांबलेले नसल्याचे सिद्ध झाले आहे. यामुळे व्यापारी वर्गात चिंतेत वातावरण आहे.

चोरटय़ांनी बसस्थानकासमोरील गौरव कॉम्प्लेक्समधील तळमजल्यावरील पाच दुकानांची शटर्स लोखंडी सळीच्या सहाय्याने अर्धवट उखडली. या पाच दुकानांमध्ये प्रशांत कुळये यांच्या विमा सेवा केंदातून चोरटय़ांनी रोख पाच हजार रुपये, दीपक सकपाळ यांच्या हेअर कटिंग सलूनमध्ये खत आणण्यासाठी ठेवलेले चार हजार 500 रुपये, प्रशांत सावंत यांच्या अमरदीप वॉच कंपनीच्या गोडावूनमधून पाच घडय़ाळे व दोन किलो चहा पावडर, दत्ताराम नारकर यांच्या माऊली क्लॉथ सेंटरमधून तीन हाफ पॅन्ट, तीन शर्ट, तसेच सुरेंद्रन यांच्या न्यू भारत बेकरीतून खाण्याचे साहित्य चेरले.

अंधाराचा फायदा

कॉम्प्लेक्सच्या पहिल्या मजल्यावरील आशिष गणपत गुरव यांचे इलेक्ट्रिक्ल्स दुकान व डॉ. बाळासाहेब सावंत पतसंस्थेचे शटर्स उखडण्याचा प्रयत्न चोरटय़ांनी केला. रविवारी रात्री अंधार व मुसळधार पाऊस असल्याने चोरटय़ांनी कॉम्प्लेक्सच्या मागील बाजूस असलेल्या शेतीतून चोरटय़ांनी प्रवेश करीत तळमजल्यावरील ही दुकाने प्रथम फोडली. चोरटय़ांनी न्यू भारत बेकरीतील बेसन लाडूचा ट्रे नेऊन पहिल्या मजल्यावर जाणाऱया जिन्यावर बसून काही लाडू खाल्ले. यावेळी चोरटय़ांनी तळमजल्यावरील सलग पाच शटर्स अर्धवट पेचून काढली व आत वाकून प्रवेश केल्याचा अंदाज आहे. त्यानंतर त्यांनी आपला मोर्चा पहिल्या मजल्याकडे वळविला असावा, अशी शक्यता आहे.

पतसंस्थेचे शटर तोडण्याचा प्रयत्न

तळमजल्यावरील फोडलेल्या पाच दुकानांच्या समोरची पाचही दुकाने मोठी होती. मात्र, चोरटय़ांनी ही दुकाने फोडण्याचा प्रयत्नही केला नाही. शिवाय पहिल्या मजल्यावरील पतसंस्थेचे शटर तोडण्याचा प्रयत्न झाला. मात्र, चोरटय़ांना ते तोडता आले नाही. चोरटे बाहेरगावचे असल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

पोलीस येताच पलायन

रविवारी शहरातील सीसी टीव्ही कॅमेरे बंद होते. तसेच पोलिसांनी पायी गस्त ठेवली होती. पोलीस कॉन्स्टेबल योगेश राऊळ यांना गस्तीच्यावेळी कॉम्प्लेक्समध्ये मध्यरात्री तीन वाजता ठोठावण्याचा आवाज आला. यावेळी ते कॉम्प्लेक्सच्या दिशेने गेले असता चोरटय़ांनी कॉम्प्लेक्सच्या मागील बाजूच्या शेतातून पलायन केले. चोरटे पळताना पोलिसांना बॅटरीच्या प्रकाशात दिसले. त्यानंतर पोलिसांनी दुकान मालकांना याची कल्पना दिली. त्यानंतर चोरीची तक्रार संबंधित व्यापाऱयांनी दिली. या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. व्यापारी मंडळाच्या पदाधिकाऱयांनी पोलीस निरीक्षक विश्वनाथ बुलबुले यांची भेट घेऊन चोरटय़ांना तात्काळ जेरबंद करण्याची मागणी केली.

Related posts: