|Wednesday, November 13, 2019
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » चीनचे आव्हान

चीनचे आव्हान 

चार दिवसांपूर्वी चीनच्या लाल सेनेच्या काही सैनिकांनी भारताच्या सिक्कीम राज्याची सीमा ओलांडून भारतीय भूमीत काही काळ ठाण मांडण्याचा उपद्व्याप केला आहे. अर्थात आपल्या सैनिकांनी त्यांना वेळीच रोखले व मागे परतण्यास भाग पाडले. दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये काही काळ धक्काबुक्की झाल्याचेही वृत्त होते. भारत-चीन सीमेवर अरुणाचल प्रदेश ते सिक्कीम या पट्टय़ात अशा घटना नेहमी घडतात. तथापि, चीनने यावेळी सिक्कीम सीमेवर नवी आघाडी उघडल्याचे यामुळे स्पष्ट झाले. आजवर चीन अरुणाचल प्रदेशच्या तावांग या भागावर आपला दावा सांगत होता. तेथे अनेकदा चिनी सैनिकांनी घुसखोरी केली आहे. तथापि, दोन्ही सैन्यांमध्ये कधी गोळीबार होण्याचा अगर हातघाईचा प्रसंग निर्माण होण्याची परिस्थिती उद्भवलेली नाही. सिक्कीममध्ये चिनी सैनिकांनी भारताचा एक बंकर हलविल्याचेही सांगण्यात येत आहे. सिक्कीम भागात चीन त्याच्या सीमारेषेपर्यंत रस्तेही बांधणार असून आपला तो अधिकारच आहे, असे तो मानतो. एकंदर, भारताविरोधात नव्या नव्या ठिकाणी मर्यादित स्वरूपाचा संघर्ष निर्माण करून भारतावर दबाव वाढविण्याचे त्याचे धोरण आहे. भारताने आपल्या विरोधात अमेरिकादी देशांच्या जवळ जाऊ नये, हे दर्शवून देण्याचा त्याचा प्रयत्न अशा घटनांमधून दिसून येतो. पंतप्रधान मोदी अमेरिकेच्या दौऱयावर असताना चीनने सिक्कीममध्ये हा उपद्रव निर्माण करावा, हा केवळ योगायोग नव्हे. चीन आपल्या प्रचंड आर्थिक आणि लष्करी सामर्थ्याच्या बळावर दक्षिण चिनी समुद्र, आशिया प्रशांतीय क्षेत्र, इतकेच नव्हे, तर थेट हिंदी महासागर आणि अरबी समुद्रापर्यंतही आपले हातपाय पसरण्याचा प्रयत्न करीत आहे. त्याचा विस्तार वाद वाढत त्याला अटकाव करण्याचे साहस कोणत्याही शेजारी देशाने करू नये, ही तजवीज त्याने गेल्या 20 वर्षांपासूनच करण्यास सुरुवात केली आहे. चीनच्या राक्षसी महत्त्वाकांक्षांना आवर घालण्याची बऱयापैकी क्षमता, चीनच्या आजूबाजूच्या देशांपैकी फक्त भारताकडे आहे, याची चीनला जाणीव आहे. भारत हा आर्थिक आणि सामरिकदृष्टय़ा चीनपेक्षा कमी असला तरी प्रचंड लोकसंख्येचा आणि मोठय़ा आकारमानाचा देश आहे. इतर देश बरेच छोटे आणि दुर्बळ आहेत. भारताभोवतीच्या या अशक्त देशांना आपल्याकडे खेचून भारताभोवती साखळी तयार करणे आणि त्यात भारताला जखडून ठेवणे ही चीनची योजना असल्याचे वारंवार स्पष्ट झाले आहे. यासाठी त्याने पाकिस्तान, श्रीलंका, मालदीव, बांगला देश, नेपाळ आणि म्यानमार या देशांशी संधान बांधण्याचा प्रयत्न केला आहे. यापैकी पाकिस्तान हा तर चीनचा मांडलिक देश असल्यासारखाच वागत आहे. अशा स्थितीत भारताने नेमके काय करावे, यावर देशात दोन मतप्रवाह असल्याचे दिसते. एक विचार भारताने चीनशी जुळवून घ्यावे, त्याच्याशी गोडीगुलाबीने रहावे आणि विनाकारण त्याला दुखवू नये, असे सांगते. चीन आणि अमेरिका-जपान यांच्या वादात भारताने पडू नये. ते आपल्याला परवडणारे नाही, असे या विचारसरणीचे समर्थक मानतात. तर दुसरी विचारसरणी भारताने चीनशी जशास तसे वागावे, चीनच्या दबावाखाली येऊ नये, आपल्या शक्तीचाही योग्य वेळी चीनला प्रत्यय द्यावा, चीनची विस्तारवादी महत्त्वाकांक्षा रोखण्याचा प्रयत्न करणे हे भारताच्या स्वतःच्या सन्मानासाठी आवश्यक आहे, असे मानणारी आहे. चीन कितीही सामर्थ्यवान असला तरी भारताची शक्तीही कमी नाही. तेव्हा विनाकारण पडती भूमिका घेण्याचेही कारण नाही, असे या विचारसरणीचे समर्थक मानतात. भारताने दुबळय़ा देशाप्रमाणे न वागता आपल्या आर्थिक आणि सामरिक सामर्थ्यामध्ये वाढ करावी, यासाठी अमेरिकादि देशांचे साहाय्य घ्यावे, त्याचबरोबर संशोधन आणि स्वदेश नीतीवर भर देऊन सामरिक क्षेत्रात स्वयंपूर्णता आणण्यावर भर द्यावा, असेही हा मतप्रवाह सांगतो. दीर्घकालीन विचार करता, दुसरा मतप्रवाह भारतासाठी जास्त योग्य आणि व्यवहारी आहे. कारण, सामरिक आणि आर्थिक बळाचा विचार करता, भारताची शक्ती लक्षणीय आहे. त्यामुळे चीनसमोर खाली मान घालून राहण्याचे कारण नाही. शिवाय तसे केल्याने चीन भारताला त्रास देणार नाही, असेही निश्चितपणे म्हणता येणार नाही. भारताच्या भूभागावर त्याचा प्रारंभापासून डोळा आहेच. त्यावरील दावा त्याने सोडलेला नाही, किंवा सोडण्याची शक्यताही नाही. चीनला आपल्या अवतीभोवती कोणाचीही स्पर्धा नको असल्याने भारताकडे पाहण्याचा त्याचा दृष्टीकोन नेहमी संशयी आहे आणि तो तसाच असणार हे उघड आहे. चीनशी स्पर्धा करण्याची शक्ती दक्षिण आशियात तरी केवळ भारताकडेच आहे. त्यामुळे केव्हाना केव्हा भारताशीच आपल्याला दोन हात करावे लागणार, याची जाणीव असल्याने कायम तो देश भारतावर दबाव ठेवण्याचा प्रयत्न करणारच आहे. भारताने त्याला कितीही चुचकारण्याचा प्रयत्न केला तरी तो बधणार नाही. उलट या चुचकारण्याच्या नादात आपल्या संरक्षण सिद्धतेकडे आपले दुर्लक्ष होण्याची शक्यता आहे. चीनची भारताने स्वतःहून कळ काढू नये, आणि संघर्षाला प्रोत्साहन देऊ नये, हे खरे असले तरी चीनने तसे केल्यास त्याला त्याच्याच भाषेत उत्तर देण्याची आपली तयारी हवी. गेल्या पन्नास वर्षात खरेतर कसोशीने प्रयास करून ही सिद्धता निर्माण करावयास हवी होती. पण आपण चीन सीमेकडे योग्य तेवढे लक्ष देण्यास आणि त्यादृष्टीने सिद्धता राखण्यात कमी पडलो आहोत. आपली सामरिक धोरणे चीनलक्ष्यी असण्यापेक्षा पाकिस्तानलक्ष्यी आहेत. आता हे धोरण बदलणे आवश्यक आहे. चीनचे आव्हान दृष्टीसमोर ठेवून तयारी करावयास हवी. तशी केल्यास पाकिस्तानचा वेगळा विचार करण्याची आवश्यकता उरणार नाही. मनापासून प्रयत्न केल्यास आणि धोरण सातत्य राखल्यास येत्या 15-20 वर्षात तशी सिद्धता होऊ शकते. त्यामुळे केवळ संघर्ष नको, या अतिसावध आणि पडखाऊ पवित्र्याऐवजी या आव्हानाचा स्वीकार करून आपली संरक्षण तयारी वाढविल्यास भारताचा दुहेरी लाभ होऊ शकतो.

Related posts: