|Tuesday, November 19, 2019
You are here: Home » राष्ट्रीय » ‘जीएसटी’च्या विशेष सोहळय़ावर काँगेसचा बहिष्कार

‘जीएसटी’च्या विशेष सोहळय़ावर काँगेसचा बहिष्कार 

वृत्तसंस्था /नवी दिल्ली :

केंद्र सरकारने वस्तु व सेवा कराच्या (जीएसटी) अंमलबजावणीपूर्वी शुक्रवारी मध्यरात्री होणाऱया विशेष सोहळय़ावर काँग्रेसने बहिष्कार टाकला आहे. या
कार्यक्रमात सहभागी होणार नसल्याचे पक्षाच्या प्रवक्त्यांनी गुरुवारी स्पष्ट केले.

देशभरात 1 जुलैपासून ‘जीएसटी’ची अंमलबजावणी होणार आहे. सर्वच राज्यांमध्ये एकच कर प्रणाली अस्तित्वात येणार आहे. या पार्श्वभूमीवर सरकारने 30 जून रोजी मध्यरात्री 12 वाजता संसदेच्या ऐतिहासिक सेंट्रल हॉलमध्ये विशेष सोहळय़ाचे आयोजन केले आहे. यावेळी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, पंतप्रधान नरेंद्र मोदी, लोकसभा अध्यक्षा, सुमित्रा महाजन यांच्यासह ज्येष्ठ नेते उपस्थित राहणार आहेत.

     तृणमूलपाठोपाठ काँग्रेसचाही बहिष्कार

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यासह पक्षातील वरिष्ठ नेत्यांबरोबर गुरुवारी चर्चा केली. या बैठकीमध्ये जीएसटीच्या विशेष सोहळय़ावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती काँग्रेसचे प्रवक्ते सत्यव्रत चतुर्वेदी यांनी दिली. यापूर्वी तृणमूल काँग्रेसनेही विशेष अधिवेशनावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला होता. दरम्यान, जीएसटीच्या अंमलबजावणीबाबत माकपचे सरचिटणीस सीताराम येचुरी यांनीही टीका केली आहे. केंद्र सरकार घाईगडबडीने निर्णय घेत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

    विशेष सोहळय़ास उपस्थित रहा : जेटलींचे विरोधकांना आवाहन

जीएसटीच्या अंमलबजावणी करण्यापूर्वी सर्व राज्यांशी आणि केंद्रशासित प्रदेशांशी चर्चा करण्यात आली आहे. हा एकटा केंद्र सरकारचा निर्णय नाही. सर्वसहमतीने निर्णय घेण्यात आला आहे, असे केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी गुरूवारी स्पष्ट केले. तसेच जीएसटीसाठी आयोजित मध्यरात्रीच्या विशेष सोहळय़ास विरोधी पक्षांनी उपस्थित रहावे, असे आवाहनही त्यांनी केले. विरोधी पक्ष या सोहळय़ावरील बहिष्कार मागे घेतील, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

Related posts: