|Thursday, December 5, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » महाविद्यालयात मराठी वाङ्मय मंडळ अनिवार्य

महाविद्यालयात मराठी वाङ्मय मंडळ अनिवार्य 

अजय कांडर / कणकवली

काही महाविद्यालयात प्राचार्य आणि मराठी विषय प्राध्यापकांच्या उदासीनतेमुळे मराठी भाषेच्या संवर्धनासाठी महाविद्यालयात उपक्रमच राबविले जात नाहीत. या पार्श्वभूमीवर साहित्य महामंडळाने भाषा आणि सांस्कृतिकमंत्री विनोद तावडे यांच्याकडे प्रत्येक महाविद्यालयात भाषा आणि वाङ्मय मंडळ अनिवार्य करावे, अशी मागणी केली होती. त्यानुसार महाविद्यालयांना राज्य शासनाने भाषा आणि वाङ्मय मंडळ स्थापन करणे अनिवार्य केल्याची माहिती साहित्य महामंडळाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी ‘तरुण भारत’शी बोलतांना दिली.

दरम्यान, राज्यातील प्रत्येक महाविद्यालयाने भाषा संवर्धन आणि वाङ्मय मंडळ स्थापन करावे, असा आदेश राज्याच्या तंत्र व उच्च शिक्षण विभागाने राज्यातील विद्यापिठांना दिला आहे. याबाबत कोणती कार्यवाही झाली, याची माहिती साहित्य महामंडळालाही द्यावी, असेही विद्यापीठांना कळविल्याचेही जोशी यांनी सांगितले.

एक असा काळ होता की, शासनाच्या कोणत्याही अध्यादेशाशिवाय राज्याच्या प्रत्येक महाविद्यालयात मराठी भाषाविषयक उपक्रम राबविले जायचे. प्रत्येक महाविद्यालयात वाङ्मयीन मंडळेही कार्यरत होती. आता मात्र अनेक महाविद्यालयात मराठी भाषेविषयीचे तसेच साहित्यविषयक उपक्रम सातत्याने राबविले जात नाहीत. याला प्राचार्य जबाबदार असल्याचा आरोप बऱयाचवेळा मराठी विषयाच्या प्राध्यापकांकडून करण्यात येतो. तर काही प्राचार्य हे मराठी विषयाचे प्राध्यापकच असे उपक्रम राबविण्यास उदासीन असल्याचा आरोप करतात. खरं तर महाविद्यालयातील मराठी विभागाने भाषेसंदर्भात उपक्रम राबविणे हा त्या विभागाच्या कर्तव्याचाच भाग असतो. मराठी विभाग आणि मराठी भाषा यांचा जवळचा संदर्भच नाही, तर मराठी भाषेसाठीच हा विभाग असल्याने त्या विषयीचे उपक्रम राबविणे अनिवार्य आहे. महाविद्यालयात मराठी विषयच असल्याने सातत्याने वाङ्मयीनविषयक उपक्रम राबविणे गरजेचे असते. पण असे उपक्रम अलिकडच्या काळात अनेक महाविद्यालये गुणवत्तापूर्वक राबवित नसल्याचे लक्षात आले आहे. जे कार्यक्रम राबविले जातात ते फक्त एक औपचारिकता म्हणूनच. या उदासीनतेमुळेच साहित्य महामंडळाने प्रत्येक महाविद्यालयाने भाषा आणि वाङ्मयीन मंडळ स्थापन करावे, अशी मागणी भाषामंत्र्यांकडे केली होती. मात्र, आता महाविद्यालयांना भाषा, वाङ्मय मंडळ स्थापन करावे, असा आदेशच शासनाने विद्यापीठांना दिल्याने महाविद्यालयांना भाषा आणि वाङ्मय मंडळ स्थापन करणे अनिवार्य झाले आहे.

साहित्य महामंडळाने भाषामंत्र्यांना आपल्या मागणीचे निवेदन पाठविले होते. त्याची प्रत महाराष्ट्राच्या प्रत्येक विद्यापिठांना पाठविण्यात आली. विद्यापिठाकडून ती आपल्या अंतर्गत येणाऱया सर्व महाविद्यालयांना पाठविण्यात आली आहेत. याबाबत महाविद्यालयाने काय कार्यवाही केली, त्याची माहिती विद्यापीठांनी राज्य शासनाला आणि महामंडळालाही द्यावी, असा आदेश शासनाने दिले आहेत.

सोलापूर विद्यापीठाचे अनुकरण करावे

राज्य शासनाच्या आदेशानंतर सोलापूर विद्यापिठाच्या कुलसचिवांनी याबाबत सोलापूर विद्यापीठाने काय कार्यवाही केली, याची माहिती साहित्य महामंडळाला कळविली आहे. सोलापूर विद्यालयाशी संलग्न सर्व महाविद्यालयांच्या प्राचार्यांनी महाविद्यालयात काय कार्यवाही झाली, त्याचाही अहवाल विद्यापीठास कळविण्यास सोलापूर विद्यापिठाने सांगितले आहे. त्यामुळे सोलापूर विद्यापीठाचे अनुकरण सर्व विद्यापिठ, महाविद्यालयांनी करण्याचे आवाहन डॉ. जोशींनी केले आहे.

Related posts: