|Wednesday, September 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » सोलापरातील व्यापाऱयाला तीस लाखाला फसविले

सोलापरातील व्यापाऱयाला तीस लाखाला फसविले 

प्रतिनिधी/ सोलापूर

येथील एका व्यापाऱयाकडून तूर आणि ज्वारी खरेदी करून तब्बल तीस लाख रूपयांना फसविले आहे. याबाबत जेलरोड पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस तिघांचा शोध घेत आहे. सतीश दामोदर उपाध्यबी (रा. ग्रोमा हाऊस सेक्टर, वाशी, मुंबई) असे संशयित आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी राजगोपाल गोविंदलाल सोमाणी (वय 61, रा. भवानी पेठ, सोलापूर) यांनी फिर्याद दाखल केली आहे.

यातील हकीकत अशी की, राजगोपाल सोमाणी हे सिद्धेश्वर मार्केटयार्ड येथील व्यापारी आहेत. तर मुंबईचा सतीश उपाध्यबी आणि सोमाणी हे दोघे एकमेकांना ओळखतात. आरोपीने सोमाणी यांना फोन करुन मध्यप्रदेश येथील सतनामध्ये एका व्यापाऱयास तुरीची गरज आहे. त्यांना किमान 240 क्विंटल तूर लागणार आहे. स्वामी इंटरनॅशनल या नावाने बिल बनवून पाठवा. बाकी वसुलीचे मी बघतो, असे सांगितले. दोघांमध्ये परिचय असल्याने सोमानी यांनी आरोपीवर विश्वास ठेवून 21 लाख 17 हजार 185 रूपये किंमतीचे 240 क्विंटल तूर पाठवून दिले. त्यानंतर सोमानी यांनी आरोपी सतीश उपाध्याबीला फोन करून माल पाठविल्याचे सांगितले.

त्यानंतर आरोपीने ट्रकचा पाठलाग करत तुरीच्या ट्रकवर कब्जा मिळविले. हे ट्रक मध्यप्रदेश सतना येथे पाठविता थेट नागपूर येथील पंकज इंडस्ट्रिज येथे नेले. तेथे फिर्यादीची परवानगी न घेता परस्पर विक्री केले. सदर विक्री झालेल्या मालाचे पैसे घेऊन थेट मुंबईला गेला. या घटनेला तीन चार दिवस झाल्यानंतर फिर्यादी राजगोपाल सोमाणी यांनी आरोपीला फोन लावले. पण तो फोन उचलत नसल्याने फिर्यादीला संशय आला. त्यांनी संबंधीत ट्रक चालकाला याबाबत फोन करुन विचारले. तेव्हा त्याने माल सतनाला नव्हे तर नागपूर येथे नेण्यात आल्याचे सांगितले. हे ऐकून आपली फसवणूक झाल्याचे स्पष्ट झाले.

काही दिवसांनी आरोपीला फोन करून तूर विक्रीचे पैसे मागितल्यास त्याने पैसे देण्यास टाळाटाळ केली. नंतर फिर्यादीने याबाबत जेलरोड पोलीस ठाणे येथे आरोपी सतीश दामोदर उपाध्याबी याच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. याचा पुढील तपास पोलीस हवालदार चौधरी हे करीत आहेत. दुसऱया घटनेत याच व्यापाऱयाला अन्य दोघांनी 481.5 क्विंटल ज्वारी खरेदी करून 8 लाख 90 हजार रूपयांना फसविले आहे.

याप्रकरणी दिपेश नविनचंद्र चंडे (रा. मुलुंड, वेस्ट मुंबई) आणि किर्ती देवजी भक्कड (भानुशाली) (रा. एमजी मार्केट यार्ड, मुंबई) असे संशयित आरोपींचे नावे आहेत. तर यातील हकिकत अशी की, राजगोपाल सोमाणी यांचा दिपेश चंडे यांच्याशी संपर्क होता. तर या दोघांनी सोमाणी यांच्याकडून 481 क्विंटल ज्वारीची मागणी केली. सोमाणी यांनी चंडे याच्यावर विश्वास ठेवून माल पाठवून दिले. मात्र, माल पाठवून एक होऊनही पैसे दिले नाही. याबाबत विचारणा केली असता दोघांनीही पैसे देण्यास नकार दिला. याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक बनकर हे करीत आहेत.