|Thursday, August 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » जिल्हा नियोजन समिती सदस्य निवडीसाठी हालचाली गतिमान

जिल्हा नियोजन समिती सदस्य निवडीसाठी हालचाली गतिमान 

प्रतिनिधी/ सांगली

सांगली जिल्हा नियोजन समितीवर (डीपीसी) स्थानिक स्वराज्य संस्थामधून 32 सदस्यांच्या निवडी जुलै महिन्या अखेरपर्यंत होणार आहेत. यासाठी प्रशासनाने कंबर कसली असून जिल्हा परिषद, सहा नगरपालिका व चार नगर पंचायतीकडून सदस्य मतदारांची कच्ची यादी मागविण्यात आली आहे. ही मतदार यादी लवकरच ज्या त्या स्थनिक स्वराज्य संस्थेत प्रसिद्ध करण्यात येणार आहे. यानंतर दावे, हरकतीचे निराकरण करुन पक्की मतदार यादी प्रसिध्द केल्यानंतर सदस्य निवडीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात येणार आहे.

जिल्हा नियोजन समितीत नागरी निर्वाचन क्षेत्र (नगरपालिका व नगरपंचायत), महापालिका निर्वाचन क्षेत्र तसेच ग्रामीण निर्वाचन क्षेत्र (जिल्हा परिषद) या तीन क्षेत्रातून 32 लोकनियुक्त सदस्यांची निवड करण्यात येते. जिल्हयात शिराळा, कडेगांव, खानापूर, कवठेमहांकाळ या चार नगरपंचायती, तासगाव, आष्टा, विटा, इस्लामपूर, पलूस व जत या सहा नगर पालिका आहेत. सांगली-मिरज-कुपवाड ही महानगर पालिका तर जिल्हा परिषद यांच्यामधून 32 सदस्यांची जिल्हा नियोजन समितीवर निवड करण्यात येणार आहे. सांगली-मिरज-कुपवाड मनपामधून 5, जिल्हा परिषद सदस्यांमधून 23 तर नगर पंचायत, नगरपालिका सदस्यांमधून 4 असे 32 सदस्य निवडण्यात येणार आहेत. सांगली-मिरज-कुपवाड मनपाचा कार्यकाल 2018 मध्ये पूर्ण होत असल्याने त्यांचे जुने पाच सदस्य या समितीमध्ये कायम राहणार आहेत. यामुळे जिल्हा परिषद व नागरी निर्वाचन क्षेत्र (नगरपालिका व नगरपंचायत) यांच्यामधून 28 सदस्य निवडीसांठी प्रशासनाने हालचाली गतिमान केल्या आहेत.

जिल्हा परिषदेत सध्या 60 सदस्य आहेत. यातील 23 सदस्यांची जिल्हा नियोजनवर निवड करण्यात येणार आहे. गत वेळी जिल्हा परिषदेचे 24 सदस्य नियोजन समितीवर होते. मात्र, यावेळी जिल्हा परिषदेचे दोन मतदार संघ कमी झाल्याने जिल्हा नियोजन मधील एक सदस्यही कमी झाला आहे. याशिवाय सहा नगर पालिका व चार नगर पंचायतीमधून 4 सदस्य निवडण्यात येणार आहेत. गत वेळच्या नियोजन समितीवर केवळ नगरपालिकांचे 3 सदस्य होते. मात्र, यावेळी नव्याने नगर पंचायती निर्माण झाल्याने नगर पंचायतींच्या एका सदस्याची नियोजन समितीवर निवड होणार आहे. या महिन्याच्या शेवटच्या आठवडय़ात ही निवड प्रक्रिया पूर्ण करण्याच्या दृष्टीने प्रशासनाने पावले टाकायला सुरवात केली आहे. जिल्हा परिषद व नगर पालिका, नगर पंचायतींकडून त्यांच्या सदस्यांची कच्ची मतदार यादी प्रशासनाने मागवली आहे. ही यादी लवकरच ज्या त्या स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये प्रसिध्द करण्यात येणार आहे.

त्यांनतर या मतदार यादीवर काही दावे, हरकती आल्यास त्यांचे निराकरण करुन पक्की मतदार यादीं बनविण्यात येणार आहे. यानंतर निवडणूक विभागाकडे सदस्य निवडीसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यासाठी ही यादी प्रस्तावित करण्यात येणार आहे. पुढच्या आठवडय़ापर्यंत ही संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार असून साधारणतः शेवटच्या आठवडय़ात जिल्हा नियोजनच्या सदस्य निवडींची प्रक्रिया पूर्ण होण्याची शक्यता आहे.