|Thursday, November 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » विटय़ात आठ दिवस यंत्रमाग बंद ठेवण्याचा निर्णय

विटय़ात आठ दिवस यंत्रमाग बंद ठेवण्याचा निर्णय 

प्रतिनिधी/ विटा

कापडसाठा कमी झाल्याने दर कमी होण्याची शक्यता आहे. जीएसटी लागू झाल्यानंतर बाजारपेठेचा नेमका अंदाज येत नसल्याने दराबाबत साशंकता आहे. यामुळे आठ दिवस यंत्रमाग बंद ठेवण्याचा आणि उत्पादन थांबवण्याचा निर्णय विटय़ातील यंत्रमागधारकांच्या बैठकीत घेण्यात आला आहे, अशी माहिती विटा यंत्रमाग औद्योगिक सहकारी संघाचे चेअरमन किरण तारळेकर यांनी दिली.

याबाबत तारळेकर यांनी दिलेली माहिती अशी, देशभर एक जुलैपासून जीएसटी लागू झाली आहे. यापूर्वी वस्त्रोद्योगाच्या साखळीत फक्त सूत विक्रीवर व्हॅट होता. आता यापुढे सूत, कापड, रंगप्रक्रिया, होलसेल आणि किरकोळ व्यापार या सर्व टप्प्यावर पाच टक्के जीएसटीची आकारणी होणार आहे. या पार्श्वभूमिवर यंत्रमागावर कापड उत्पादन सुरू आहे. परंतू यंत्रमागधारकांकडून कापड खरेदी करणारे अडत व्यापारी, रंगकाम करून विकणारे व्यापारी, त्यापुढचे घाऊक व्यापारी, किरकोळ व्यापारी आणि कापड दुकानदार ही साखळी अजून जीएसटीसह व्यापार सुरू करण्याच्या मानसिकतेत नाही. जोपर्यंत ही सर्व साखळी जीएसटीच्या माध्यमातून काम सुरू करीत नाही, तोपर्यंत उत्पादीत कापड विक्रीच्या अभावी पडून राहण्याचा धोका आहे. त्यामुळे दर पडून नुकसान होण्याची शक्यता आहे.

या पार्श्वभूमिवर विटय़ातील यंत्रमाग संघाच्या कार्यालयात यंत्रमागधारकांची बैठक झाली. यामध्ये पुढील आठ दिवस यंत्रमाग बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दहाजुलै रोजी पुन्हा बैठक घेऊन याबाबतचा पुढचा निर्णय घेण्यात येणार आहे, असे किरण तारळेकर यांनी सांगितले. यंत्रमागधारकांचा बंद जीएसटी विरोधात नाही. या कराच्या अंमलबजावणीसाठी कापूस ते तयार कापड या साखळीतील सर्व घटकांना या कराची भीती दूर व्हावी. दरम्यानच्या काळात कापडाचा साठा वाढून नुकसान होऊ नये, यासाठीची उपाय योजना असल्याचे तारळेकर यांनी म्हंटले आहे.

जीएसटीबाबत व्यापारी आणि करदात्यांच्या मनातील भीती व शंका दूर करण्यासाठी तातडीने उपाययोजना करणे आवश्यक आहे. नव्या कररचनेच्या अंमलबजावणीमध्ये सुरूवातीला काही चुका झाल्यास दंडात्मक आकारणी न करता चुका सुधारण्याची संधी देणे आवश्यक आहे, अशी मागणी तारळेकर यांनी केली आहे.

Related posts: