|Wednesday, September 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » मनपाक्षेत्रातील पाण्याचे 45 हजार मीटर बंद

मनपाक्षेत्रातील पाण्याचे 45 हजार मीटर बंद 

सुभाष वाघमोडे /सांगली :

महापालिका क्षेत्रातील पाणी कनेक्शनचे तब्बल 45 हजारावर मीटर बंद असल्याचा धक्कादायक प्रकार नुकत्याच केलेल्या ऑडीट अहवालामध्ये समोर आला आहे. या बंद मीटरचा पाणीपुरवठय़ावर परिणाम होत असून मनपाचे वर्षाला कोटय़वधी रूपयाचे नुकसान होत आहे. बंद मीटर तात्काळ दुरूस्त करावे, अन्यथा पाणीपुरवठा बंद करण्याचा इशारा संबंधित कनेक्शनधारकांना पाणीपुरवठा विभागाने नोटिसीव्दारे दिला आहे.

महापालिकाक्षेत्रात गेल्या काही महिन्यापासून कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. विस्कळीत झालेल्या पाणीपुरवठय़ामुळे नागरिकांतून संताप व्यक्त केला जात आहे. मोर्चे आंदोलन करून नगरसेवक तसेच प्रशासनाला जाब विचारला जात आहे. नदी उशाला असताना पाण्यासाठी चक्क दुष्काळी भागाप्रमाणे टँकरने पाणीपुरवठा करण्याची वेळ आली आहे. अपुऱया होणाऱया पाणीपुरवठय़ाला अनेक कारणे असून यातील लिकेज आणि मीटर बंद ही कारणे महत्वाची आहेत. याशिवाय एका कनेक्शनवर अनेक कुटुंबे असल्याने तसेच वाढलेला विस्तारित भाग, पाण्याचा व्यापारी तत्त्वासाठी वापर या गोष्टीही कमी दाबाने पाणीपुरवठा होण्यास कारणीभूत आहेत.

मनपाक्षेत्रात 71 हजार 812 वैयक्तिक नळ कनेक्शन आहेत. यापैकी फक्त 25 हजार 950 पाणी कनेक्शनलाच मीटर आहेत. बाकीचे सुमारे 45 हजार 862 पाणी कनेक्शनचे मीटर बंद असल्याचे मनपाच्या पाणीपुरवठा विभागाने केलेल्या सर्व्हेमध्ये निदर्शनास आले आहे. ज्यांचे मीटर बंद आहेत त्यांना पाणीपुरवठा विभागाने नोटीस दिल्या असून तात्काळ ते चालू करून घ्यावेत अन्यथा पाणीपुरवठा खंडीत करण्याचा इशारा दिला आहे. मीटर बंद असल्याने पाण्याचे बिल मागील तीन महिन्याच्या बिलाची सरासरी काढून अंदाजे बिल देण्यात येत आहे. पाण्याचा वापर वाढला तरी बिलात वाढ होत नाही. याचा फटका उत्पन्नावर होत असून वर्षाला दीड ते दोन कोटीचा फटका बसत असल्याचे सांगण्यात आले. शेजारील कोल्हापूर मनपाने मीटर बंद असल्याने दंडाची तरतुद केली असून तात्काळ दंड वसूल केला जातो किंवा कनेक्शन तोडण्याची कारवाई केली जाते तोच फॉर्म्युला वापरण्याबाबत प्रशासन विचार करीत आहे.