|Monday, September 16, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » सेवानिवृत्तांची काळजी घेणारी स्वतंत्र व्यवस्था हवी – जयंत पाटील

सेवानिवृत्तांची काळजी घेणारी स्वतंत्र व्यवस्था हवी – जयंत पाटील 

प्रतिनिधी /इस्लामपूर :

राजारामबापू समुह हे आपले कुटुंब असून आपल्या समुहातील सेवानिवृत्त कर्मचाऱयांची काळजी घेणारी स्वतंत्र व्यवस्था निर्माण करायला हवी. मी आयुष्यभर ज्या संस्थेत सेवा केली. ती संस्था आजही माझ्या पाठीशी उभा आहे, अशी भावना आपल्या सेवानिवृत्त कर्मचाऱयांची व्हायला हवी, अशी अपेक्षा माजी मंत्री आ.जयंतराव पाटील यांनी सेवानिवृत्त कर्मचाऱयांच्या सत्कार कार्यक्रमात बोलताना व्यक्त केली.

राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्यातील 36 सेवानिवृत्त कर्मचाऱयांचा आ.जयंतराव पाटील यांच्या हस्ते सपत्नीक शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र देवून सत्कार करण्यात आला. यावेळी सेवानिवृत्त कर्मचारी व व्यवस्थापनशी संवाद साधाताना ते बोलत होते. कारखान्याचे अध्यक्ष पी.आर.पाटील, उपाध्यक्ष विजय पाटील प्रामुख्याने उपस्थित होते. प्रारंभी लोकनेते राजारामबापू पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन कामगार नेते शंकरराव भोसले, सत्यविजय बँकेचे अध्यक्ष बाळासो पवार यांच्या हस्ते करण्यात आले. आ.पाटील यांनी सेवानिवृत्त कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियाबद्दल कृतज्ञतेची भावना व्यक्त करीत त्यांना मनोगत व्यक्त करण्याच्या सुचना केल्या.

आ.पाटील म्हणाले, सेवानिवृत्त होणाऱया कर्मचाऱयांनी 3 ते 4 दशके कारखान्याच्या प्रगतीत योगदान केलेले आहे. त्यांच्या या योगदानाची जाणीव ठेवत सेवानिवृत्त कर्मचाऱयांशी सातत्यापूर्ण संवाद ठेवा. त्यांच्या अडी-अडचणी समजून घ्या. त्यांना व्यवस्थापन व कामगार युनियनकडून मदतीचा हात द्या. या पिढीने प्रामाणिक कष्ट केले असून अंगावरच्या घामाचा अभिमानच बाळगला आहे. नव्या पिढीतील कामगारांना मार्गदर्शन करताना ते म्हणाले, सध्या तीव्र स्पर्धा सुरु आहे. दररोज नवे नियम, कायदे येत आहेत. कार्यक्षमता वाढवा, पडेल ते काम करण्याची तयारी ठेवा. 18 ते 20 लाख मे.टन गाळप करण्यात योगदान करा.