|Wednesday, June 26, 2019
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » अमंत्रं अक्षरं नास्ति

अमंत्रं अक्षरं नास्ति 

प्रत्येक अक्षराला, शब्दाला अर्थाच्या छटा असतात. या छटा म्हणजे एका अर्थी त्यांचं मंत्रसामर्थ्यच. घाबरल्यावर आपण देवाचं नाव घेतो. संकट आल्यावर ‘बाप रे’ आणि वेदना झाल्यावर ‘आई गं’ म्हणतो. तेव्हा देव, वडील आणि आई प्रत्यक्ष मदतीला धावून येत नाहीत. पण त्यांचं नाव घेऊन क्षणभर मनाला दिलासा मिळतो. रात्रीच्या शांत वेळी आपण एकटे जागे असताना दूरवरून एखादं जुनं गीत ऐकू येतं तेव्हा आपल्याला त्या गाण्यातल्या शब्दांचा अर्थ जाणवतोच असे नाही. तर ते गाणं पूर्वी ऐकलं तेव्हा घडलेला प्रसंग आठवतो. उदाहरणार्थ एखादं विनोदी गाणं कानावर पडतं तेव्हा पूर्वी केव्हातरी सहलीमध्ये गाण्याच्या भेंडय़ा खेळताना आपण मित्रांबरोबर ते गाणं गायल्याची आठवण जागी होते. म्हणजे गाण्यातले शब्द विनोदी,  पण ते ऐकून आपण जुन्या मित्रमैत्रिणींच्या आठवणीने हळवे होतो. मौज आहे की
नाही?

परवाची गंमत सांगतो. दुपारची वेळ होती. घरात बसून मी नारायण धारपांची एक भूतकथा वाचत होतो. कथा वाचून होईतो संध्याकाळ झाली. मी रोजच्या शिरस्त्यानुसार भाजी आणण्यासाठी मंडईत गेलो. भाजी खरेदी केली. घरी येताना सहज काही गोड घेण्याची इच्छा झाली. लाडू घ्यावेत असा विचार केला.

कारण लाडू सोयीचे. एकाच दिवशी खाऊन संपले नाहीत तरी दोन-तीन दिवस टिकतात. म्हणून मिठाईच्या दुकानात गेलो. त्याच्या काचेखाली ओळीने चौकोनी टे मांडले होते. प्रत्येक टेमध्ये लाडूंचे वेगवेगळे प्रकार होते. एका टेकडे बोट दाखवून मी त्याला भाव विचारला. तो म्हणाला की ते बेसन लाडू आहेत.

 बेसन लाडूंची चव छान असते. पण का कोण जाणे, बेसन शब्द उच्चारला की पिठल्यासाठी किंवा कांदा भज्यांसाठी भिजवलेलं बेसन डोळय़ांसमोर येतं. या दोन्ही पदार्थांशी माझं वैर नाही. पण पिठलं, भजी आणि लाडू यांच्या प्रतिमा एकमेकीत मिसळल्या की मजा जाते. दुसऱया टेमध्ये आकर्षक लिंबू कलरचे लाडू होते. विपेता म्हणाला की ते कणकेचे लाडू आहेत. मनात एकदम कसंतरीच झालं. नुकतीच धारपांच्या कथेत कणकेची बाहुली वाचली
होती!

शेवटी मी रव्याचे लाडू घेऊन आलो. ‘रव्याचे लाडू’ म्हटलं की बदामाचे काप आणि बेदाणे पेरलेले रव्याचे लाडूच डोळय़ांसमोर येतात. तोंडाला पाणी सुटते. 

अशी ही अक्षरांची आणि शब्दांची जादू. मजेदार.