|Monday, August 26, 2019
You are here: Home » Top News » ग्रीनकार्डसाठी 12 वर्षांची तपश्चर्या लागणार

ग्रीनकार्डसाठी 12 वर्षांची तपश्चर्या लागणार 

अमेरिकेच्या संस्थेचा अहवाल : प्रतीक्षा यादी दिवसेंदिवस लांबतेय, भारतीयांचे सर्वाधिक प्रमाण

वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन

अमेरिकेत स्थायी नागरिकत्वासाठी अर्ज करणाऱयांना आता किमान 12 वर्षे प्रतीक्षा करावी लागणार आहे. प्यू रिसर्चच्या एका अहवालात ही माहिती देण्यात आली. अमेरिकेत सर्वाधिक ग्रीनकार्ड जारी होणाऱया देशांच्या यादीत भारत अग्रस्थानी आहे.

अहवालानुसार 2015 साली 36318 भारतीयांना स्थायी नागरिकाचा दर्जा देण्यात आला. तर याचकाळात 27798 जणांना कायदेशीरदृष्टय़ा वास्तव्याचा अधिकार म्हणजेच ग्रीनकार्ड देण्यात आले. कुशल कर्मचाऱयांसाठी स्थायी नागरिकाची एक वेगळी वर्गवारी असते. यासाठी ज्यांनी अर्ज केलाय, त्यांची प्रतीक्षा यादी 12 वर्षांवर पोहोचली आहे.

कुशल कर्मचारी म्हणून ज्यांनी 2005 साली स्थायी नागरिकत्वासाठी अर्ज केला होता, अशांबाबत सध्या अमेरिका विचार करत आहे. 2010-2018 दरम्यान 36 टक्के ग्रीनकार्ड अशा व्यक्तींना देण्यात आले, ज्यांच्याजवळ एच-1बी व्हिसा होता.

ग्रीनकार्ड

ग्रीनकार्ड अमेरिकेत वास्तव्याचा आणि काम करण्याचा कायदेशीर दर्जा आहे. ग्रीनकार्डधारक कायमस्वरुपी अमेरिकेत वास्तव्य करू शकतो. हे कार्ड स्थलांतरितांना दिले जाते. ट्रम्प अध्यक्ष झाल्यावर अमेरिकेने व्हिसा नियम जाचक केले असून काही मुस्लीम देशांच्या नागरिकांवर व्हिसाबंदी देखील घालण्यात आली आहे. अमेरिकेत 5 वर्षे सलग वास्तव्यानंतरच ग्रीनकार्डकरता अर्ज केला जाऊ शकतो. जर अमेरिकन नागरिकाशी विवाह केल्यास हा कालावधी पाचऐवजी 3 वर्षांचा होतो. ग्रीनकार्डधारकाला मतदान वगळून सर्व शासकीय सुविधा दिल्या जातात.