|Monday, August 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » बनावट नोटा शोधण्यासाठी एसबीआयला पत्र

बनावट नोटा शोधण्यासाठी एसबीआयला पत्र 

प्रतिनिधी / बेळगाव

तीन कोटी अकरा लाख रुपये जुन्या नोटांसह अटक करण्यात आलेल्या सहा जणांच्या पोलीस कोठडीची मुदत संपल्यामुळे त्यांना शनिवारी पुन्हा न्यायालयासमोर हजर करण्यात आले. न्यायालयाच्या आदेशावरून त्यांची रवानगी हिंडलगा येथील मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली आहे. जप्त करण्यात आलेल्या नोटांपैकी बनावट नोटा शोधण्यासाठी पोलीस अधिकाऱयांनी एसबीआयला पत्र पाठविले आहे.

सोमवारी 10 जुलै रोजी सायंकाळी नेहरूनगर येथील रोहन रेसिडन्सी लॉजवर छापा टाकून पुणे, मिरज, गोवा, भटकळ, बेळगाव येथील सहा जणांना 3 कोटी 11 लाख रुपये जुन्या नोटांसह अटक करण्यात आली होती. पुढील तपासासाठी या सर्व सहा जणांना पोलीस कोठडीत घेण्यात आले होते. चौकशी पूर्ण करून शनिवारी त्यांना न्यायालयासमोर हजर करण्यात आले.

अरविंद पुंडलिक तळवार (वय 33, रा. कोंडाप्पा स्ट्रीट, कॅम्प), सुहास अशोक पाटील (वय 31, रा. कात्रज, पुणे), रामा भैरू पाटील (वय 29, रा. संभाजी गल्ली, हलगा-बस्तवाड), सद्दाम हुसेन शब्बीर शेख (वय 28, रा. मिरज), अनिल जयंतीलाल पटेल (वय 29, रा. महांतेशनगर), अब्दुल निसार महम्मदहक्क शेख (वय 46, रा. भटकळ) अशी त्यांची नावे आहेत. या सर्व सहा जणांना पाच दिवसांसाठी पोलीस कोठडीत घेण्यात आले होते.

बनावट नोटा अधिक

सीसीबीचे पोलीस निरीक्षक बी. आर. गड्डेकर व त्यांच्या सहकाऱयांनी ही कारवाई केली होती. त्यानंतर एपीएमसीचे पोलीस निरीक्षक जे. एम. कालीमिर्ची यांच्याकडे या प्रकरणाचा तपास सोपविण्यात आला. पोलिसांनी सर्व सहा जणांना पोलीस कोठडीत घेऊन कसून चौकशी केली. दोन मशिनींच्या साहाय्याने पुन्हा नोटा मोजण्यात आल्या. त्यामध्ये मोठय़ा प्रमाणात बनावट नोटा आढळून आल्या आहेत.

यासंबंधी तपास अधिकाऱयांनी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अधिकाऱयांना पत्र पाठविले असून 3 कोटी 11 लाख रुपये जुन्या नोटा पुन्हा एकदा मोजून यामध्ये बनावट नोटा किती आहेत, याची अधिकृत माहिती देण्याची विनंती करण्यात आली आहे. आरबीआयची परवानगी घेऊन या नोटा मोजून बनावट नोटा शोधून काढण्यात येतील, अशी माहिती एसबीआयच्या अधिकाऱयांना दिली आहे.