|Wednesday, November 13, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » बळीराजा अडचणीत, पावसासाठी धावा

बळीराजा अडचणीत, पावसासाठी धावा 

अथणी, चिकोडी तालुक्यात पावसाची पाठ : अंनतपूर, बेडकिहाळ, एकसंबा येथे पावसासाठी पूजा, अभिषेक

वार्ताहर / सौंदलगा

जून महिन्यात केवळ दोनवेळा पावसाने हजेरी लावली. त्यामुळे परिसरातील शेतकऱयांनी पेरणीपूर्व मशागत करून पेरणी केली. त्यानंतर पावसाने दडी दिल्याने सध्या उगवून आलेली पिके धोक्यात आली आहेत. त्यामुळे शेतकऱयांवर दुबार पेरणी करण्याची वेळ येणार की काय? ही चिंता शेतकऱयांना लागून राहिली आहे. परिणामी बळीराजा अडचणीत सापडला असून पावसासाठी देवाला साकडे घालत आहे. यासाठी पूजाअर्चा आणि अभिषेक घातले जात आहेत.

सौंदलगा परिसराला वेदगंगा नदीचे पाणी मिळते. त्यामुळे काही भागातील पिके चांगली aआली आहेत. पण अंतर्गत मशागत करण्यासाठी मोठय़ा पावसाची गरज आहे. गतवर्षी वेदगंगेच्या काठावरील भुईमूग, भात, सोयाबीन या पिकांचे मोठे नुकसान झाले होते. यंदा जून महिन्यातील पाऊस सोडल्यास संपूर्ण महिना कोरडा गेला आहे. पाण्याची उपलब्धता असणाऱया शेतकऱयांसमोर भारनियमनाचे संकट आहे. सोयाबीन, भात व भुईमूग पीक जगविण्यासाठी शेतकऱयांना कसरत करावी लागत असल्याचे दिसत आहे.

कारदगा परिसरात कडाक्याचे उन्ह

कारदगा : कारदगा, बारवाड परिसरात गत आठ-दहा दिवसांपासून सातत्याने उन्ह पडत आहे. कमी-अधिक पावसामुळे उगविलेली पिके उन्हामुळे मान टाकत आहेत. त्यामुळे शेतकऱयांतून चिंता व्यक्त होत आहे.   दरवर्षी रोहिनी नक्षत्रावर पेरणी केली जात होती. पण यंदा अडद्रा नक्षत्रानंतर पावसाने मारलेली दडी अद्याप कायम आहे. तरणा पाऊसही कोरडा गेला. तळकोकणात झालेल्या पावसामुळे नद्यांमध्ये पाणी आहे. ते पाणी पिकांना पाजताना अनेक अडचणी येत आहेत. पावसाचा अंदाज घेत परिसरातील शेतकऱयांनी भुईमूग, मिरची, ज्वारी या पिकांची पेरणी केली आहे. कडक उन्हामुळे उगवलेले अंकुर कोमेजत आहेत. परिसरात गवतही समाधानकारक न उगविल्याने जनावरांच्या चाऱयाचा प्रश्न गंभीर बनला आहे.

कुन्नूर परिसराला पावसाची हुलकावणी

कुन्नूर : रोहिणी, मृग व आर्द्रा ही पावसाची तीन नक्षत्रे संपली. पुनर्वसू नक्षत्रही संपत आले आहे. मात्र कुन्नूर परिसराला पावसाने हुलकावणीच दिली आहे. त्यामुळे शेतकरी मोठय़ा पावसाच्या प्रतीक्षेत आहे. रोहिणी नक्षत्राने तुरळक हजेरी लावल्याने रोहिणीचा पेरा साधण्यासाठी शेतकऱयांनी धावपळ करून पेरणी केली. पण त्यानंतर एकही मोठा पाऊस झाला नसल्याने उगवून आलेल्या पिकांना जीवदान देण्यासाठी शेतकऱयांना धडपड करावी लागत आहे. तरणा पाऊस (पुनर्वसू) तरी तारेल या आशेने शेतकरी वाट पहात होते. परंतू तरणा पाऊस संपत आला तरी मोठा पाऊस झालेला नाही.

पावसासाठी उपवास, दुर्गामातेची पूजा

अथणी : अनंतपूर (ता. अथणी) येथील डांगेवाडी वस्तीवर दोन दिवस उपवास करून दुर्गामातेकडे पावसासाठी साकडे घालण्यात आले. डांगे वस्तीमध्ये मंगळवारी व शुक्रवारी सुवासिनींनी उपवास करून देवीची पूजा केली. यादिवशी वस्तीवर मोटार सायकल न फिरविणे, बैलगाडी न जुंपणे, घरात कोणतेही यंत्र चालू न ठेवण्याचे पालन केले. सातव्या दिवशी देवीची ओटी भरून आंबील-बोनेचा नैवेद्य दाखविण्यात आला. यावेळी जि. पं. सदस्या माधुरी शिंदे, ग्रा. पं. सदस्या रंजना डांगे, सदाशिव डांगे, पांडुरंग हबगुंडे आदी उपस्थित होते.

बेडकिहाळ येथे पावसासाठी आंबिल पूजा

बेडकिहाळ : येथील देसाई, पवार, बाबर, पाटील यांच्यासह परिसरातील भाविकांनी पावसासाठी गावातील सर्व देवदेवतांच्या आंबिल-पुजेचे आयोजन केले होते. शुक्रवारी गावातील मरगुबाई मंदिरात पूजा करून नैवेद्य दाखविण्यात आला. महिलांनी आंबील कलशासह मिरवणुकीने देवदर्शन घेऊन पावसासाठी साकडे घातले. यावेळी दिलीप पवार, आण्णाप्पा लोहार, दादा पवार, पुंडलिक लोहार, राजू हेगडे यांच्यासह महिला उपस्थित होत्या.

Related posts: