|Wednesday, September 18, 2019
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » ‘राष्ट्रपतीं’साठी आज मतदान

‘राष्ट्रपतीं’साठी आज मतदान 

आज भारताचे राष्ट्रपती निवडण्यासाठी मतदान होत आहे. सत्तारुढ भाजप नेतृत्वाखालील रालोआकडून रामनाथ कोविंद यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तर विरोधी पक्षांकडून काँग्रेसच्या मीराकुमार यांना उमेदवारी देण्यात आली आहे. भारत हे जगातील सर्वात मोठे लोकशाही राष्ट्र म्हणून ओळखले जाते. भारतीय लोकशाहीचे व मतदारांचे वेळोवेळी अनेक किस्से सांगितले जातात. पण, लोकांनी लोकांसाठी स्थापन केलेले लोकांचे राज्य अर्थात प्रजासत्ताक भारत विश्वात अव्वल आहे. विद्यमान राष्ट्रपती प्रणव मुखर्जी पायउतार होणार आणि त्याजागी रामनाथ कोविंद विराजमान होणार ही औपचारिकता उरली असली तरी लोकशाहीच्यादृष्टीने ती महत्त्वाची आहे. आपल्याकडे व्हिप म्हणजे पक्षादेश काढण्याची पद्धत आहे. असा व्हिप पक्ष पदाधिकारी आमदार, खासदार यांना बंधनकारक असतो. पण, राष्ट्रपती निवडणुकीच्या वेळी व्हिप काढता येत नाही. ओघानेच राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारास मतदान करण्याचा हक्क असणारे आमदार-खासदार स्वत:च्या मनाप्रमाणे मतदान करत असतात. ओघानेच मतदान व मतमोजणी होईपर्यंत काहीही होऊ शकते आणि कोण राष्ट्रपती होणार याची उत्सुकता राहते. राजकीय स्थिती पाहता भाजपाचे ‘राम’ नाथ राष्ट्रपती होणार हे निश्चित आहे. त्यांच्या निवडीची केवळ औपचारिकता बाकी आहे. तथापि, ही निवडणूक, त्यासाठीची उमेदवार निश्चिती, विविध पक्षांची भूमिका, प्रत्यक्ष मतदान या आणि अशा अनेक गोष्टींची चर्चा होत राहणार आणि ते स्वाभाविक आहे. एकमात्र आहे की प्रणवदासारखा एक चांगला माणूस, अभ्यासू नेता आणि दीर्घकाळ विचाराने चालणारा बुजुर्ग देशाच्या सर्वोच्च पदावरून सन्मानाने पायउतार होतो आहे. राष्ट्रपती निवडणुकीसाठी होणारे मतदान आपल्या नेहमीच्या ‘एक डोके एक मत’ असे सरळ, सोपे नसते. तेथे प्रत्येक मताचे मूल्य असते. अर्थात लोकसभा सदस्यांच्या मताला सर्वाधिक मूल्य असते. राज्यातील आमदारांच्या मतांचे मूल्य राज्याच्या लोकसंख्येवर अवलंबून असते. उत्तर प्रदेश वगैरे जास्त लोकसंख्येच्या राज्याचे आमदार जे मतदान करतात त्यांना सिक्कीम वगैरे छोटय़ा राज्यातून मतदान करतात त्यापेक्षा अधिक मूल्य असते. लोकसभा व राज्यसभा यांचे 763 खासदार यावेळच्या निवडणुकीला पात्र मतदार आहेत. आमदारांची संख्या 4,120 आहे. आमदार, खासदार यांच्या एकत्रित मताचे मूल्य 83,824 इतके आहे. भाजपाचे संख्याबळ लक्षात घेता त्यांना 24,522 मतांची गरज आहे. भाजपाचे मित्रपक्ष व निकटवर्ती लक्षात घेता भाजपाला हे सहज शक्य आहे. ओघानेच रामनाथ कोविंद यांची निवड केवळ उपचार उरला आहे. राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत काही बदल करावेत, मतांचे मूल्य नव्या जनगणनेप्रमाणे करावे, अशी मागणी आहे. पण, सन 2002 मध्ये झालेल्या घटना दुरुस्तीनंतर सन 2026 पर्यंत मतांचे मूल्य तेच राहिल असे निश्चित झाले आहे. भारतात गेली अनेक वर्षे जी राजकीय अस्थिरता आणि आघाडय़ांचे राजकारण सुरू होते ते हळूहळू मागे पडले आहे. नरेंद्र मोदी व भाजपा आपले प्रभुत्व वाढवत आहेत. शतप्रतिशत भाजपा हा कार्यक्रम सुरू आहे. स्थिर सरकार हा विकासासाठी महत्त्वाचा भाग असतो आणि उत्तर प्रदेशमध्ये भाजपाला विधानसभा निवडणुकीत चांगले यश मिळाल्याने या पक्षाच्या व राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीच्या अनेक गोष्टी भाजपाच्या दृष्टीने सोप्या झाल्या आहेत. अन्यथा भाजपाला उमेदवारापासून अनेक गोष्टीत तडजोडी कराव्या लागल्या असत्या व छोटय़ा-मोठय़ा पक्षांच्या नाकदुऱया काढाव्या लागल्या असत्या. नवे राष्ट्रपती हे घटनातज्ञ मानले जातात. त्यांना राज्यपालपदाच्या कामाचा अनुभव आहेच. पण, उपेक्षित वर्गासाठी काम करणारे म्हणून त्यांची ओळख आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक असणारे रामनाथ कोविंद आता राष्ट्रपती म्हणून कसे काम करतात हे बघायला हवे. एकीकडे चीन आणि पाकिस्तानच्या कुरबुरी वाढत आहेत, जगभर दहशतवादाचा राक्षस नंगानाच घालतो आहे. तर दुसरीकडे जगभर भारताची प्रतिमा उजळली आहे. नरेंद्र मोदींनी व्यापार, उद्योग, गुंतवणूक, पर्यटन, कला, संस्कृती असे चौफेर मार्केEिटग करत भारताला अव्वल, सारे जहाँसे अच्छा, विश्वगुरु अशी प्रतिमा उंचावली आहे. नवीन राष्ट्रपतींना त्यामध्ये भर घालावी लागेल. कोविंद यांनी राष्ट्रपतीपदाच्या मतदानाला काही तास बाकी असताना मुंबईत येऊन आमदार-खासदारांशी केलेला संवाद महत्त्वाचा मानला पाहिजे. आपण जात, पात, धर्म, लिंग, प्रदेश या पलीकडे जाऊन राष्ट्रपतीपदाची प्रतिष्ठा जपू, उंचावू असे त्यांनी म्हटले आहे. उद्धव ठाकरे यांचेही त्यांनी शिवसेनेने समर्थन दिल्याबद्दल आभार मानले आहेत. यापूर्वी राष्ट्रपती निवडणुकीच्या वेळी उमेदवाराची ‘मातोश्री’ ला भेट ठरलेली असायची. बाळासाहेब ठाकरे यांचे आशीर्वाद महत्त्वाचे असायचे. आता बाळासाहेब नाहीत. शिवसेना भाजपाला रोज कोपरखळय़ा मारत असते. रामनाथ कोविंद मातोश्रीवर जातात का, इकडे सर्वांचे लक्ष होते. पण, त्यांनी भेट टाळली व फोनवरुन शुभेच्छा दिल्या. त्याचा योग्य तो अर्थ शिवसेनेसह सर्वांना समजला असेल पण, कोविंद यांनी मुंबई भेटी दरम्यान जे वक्तव्य केले ते दिशादर्शक आहे. आपण राष्ट्रपती म्हणून जात-पात-धर्म-लिंग या पलीकडे काम करु हे आहेच. पण, सर्व राज्यांचा सर्वांगीण विकास व सर्वांना समान न्याय. देशातील युवा वर्गाच्या आशा-आकाक्षांना संधी आणि शिक्षण व आधुनिकीकरण यासाठी काम करू, असे म्हटले आहे. कोविंद यांचे यातून प्राधान्यक्रम लक्षात येतात. सर्वांना समान न्याय या त्यांच्या वक्तव्यात समान नागरी कायदा असू शकतो. कोविंद यांनी भेदाभेद अमंगळ असेही म्हटले आहे. त्यातून त्यांची दिशा लक्षात येते. भारतीय राजकारण कुस बदलते आहे. नवे सशक्त व सर्वांचा विकास साधणारे प्रागतिक पाऊल पडते आहे. काँग्रेसने वैचारिक विरोध केला आहे. मीराकुमारही आदरणीय व्यक्ती आहेत. आज कसे काय मतदान होते आणि कोणकोणते पक्ष प्रत्यक्षात कशी भूमिका घेतात हे मतमोजणीनंतर स्पष्ट होईल.