|Saturday, February 29, 2020
You are here: Home » राष्ट्रीय » सॅटेलाईट फोनचा बाजार सर्वांसाठी खुला

सॅटेलाईट फोनचा बाजार सर्वांसाठी खुला 

नवी दिल्ली :

 सॅटेलाईट फोनचा बाजार सर्वांसाठी खुला करण्यात आला असून या क्षेत्रात कोणतीही कंपनी आपली सेवा करू शकते अशी माहिती दूरसंचार मंत्री मनोज सिन्हा यांनी दिली. हे क्षेत्र सर्वांसाठी खुले करण्यात आले असून कोणावरही कोणतेही निर्बंध नसतील असेही त्यांनी स्पष्ट केले.

सुरक्षेच्या दृष्टीकोनातून सॅटेलाईट फोन गेटवे इंडियामध्ये निर्माण करावे लागतील. यामुळे सुरक्षा यंत्रणा गरज भासली असता इंटरसेप्ट करू शकतील असेही सिन्हा यांनी सांगितले. सध्या देशात सरकारी कंपनी बीएसएनएलच ही सेवा पुरवत असून सुरक्षा यंत्रणांसह आपत्ती व्यवस्थापन पथक, विविध सरकारी विभागांना गरजेनुरुप ही सेवा दिली जाते.

सद्यस्थितीतील नियम

डिपार्टमेंट ऑफ टेलिकॉम (डॉट) सॅटेलाईट फोन सेवा देण्यासाठी इच्छुक कंपन्यांना युनिफाईड परवान्यांतर्गत ग्लोबल मोबाईल पर्सनल कम्युनिकेशन बाय सॅटेलाईट सेवेचा (जीएमपीसीएस) परवाना देतो. हा परवाना सुरक्षा मंजुरीनंतरच दिला जातो.

2001 साली दिशानिर्देश

2001 साली यासंबंधी डॉटने दिशानिर्देश जारी केले होते. त्यावेळी कंपन्यांनी परवान्यासाठी अर्ज केला होता. परंतु फोन गेटवे भारतात निर्माण करण्याच्या अटीमुळे कोणालाही परवाना मिळू शकला नाही. सध्या देशात कोणतीही खासगी कंपनी सॅटेलाईट फोनची सेवा उपलब्ध करत नाही.

केवळ 4000 सॅटेलाईट फोन

देशात सद्यस्थितीत केवळ 4000 सॅटेलाईट फोनच असून कोणत्याही खासगी कंपनीने सध्या सॅटेलाईट फोन सेवेसाठी अर्ज केलेला नाही. देशात सॅटेलाईट कॉलचा दर अधिक असणे देखील यासाठी मोठा अडथळा मानले जातोय. ट्रायने प्रारंभी एक डॉलर प्रति मिनिटाच्या कॉलदराची सूचना केली होती. या सेवेचा विस्तार न होण्यामागे याला देखील एक मोठे कारण मानले जाते. सॅटेलाईट हँडसेट देखील तुलनेने महाग असून याची किंमत 40 हजार रुपयांपासून 70 हजार रुपयांदरम्यान असते.

Related posts: